‘न्यूजलाँड्री’चा ‘सकाळ’ समूहावर छळाचा आरोप

‘न्यूजलाँड्री’चा ‘सकाळ’ समूहावर छळाचा आरोप

नवी दिल्ली: ‘सकाळ’ माध्यम समूहातील नोकरकपातीबद्दल बातमी दिल्याप्रकरणी गेल्या मार्चपासून समूहासोबत कायद्याची लढाई लढत असलेला पत्रकार प्रतीक गोयल याचा प

केजरीवालांचे तीर्थक्षेत्रांचे राजकारण
स्क्रिपालचा खून आणि बेलिंगकॅट
२१ जूनपासून सर्वांना मोफत लस; केंद्राचे धोरण बदलले

नवी दिल्ली: ‘सकाळ’ माध्यम समूहातील नोकरकपातीबद्दल बातमी दिल्याप्रकरणी गेल्या मार्चपासून समूहासोबत कायद्याची लढाई लढत असलेला पत्रकार प्रतीक गोयल याचा पुणे पोलिस छळ करत आहेत, अशा आशयाचे वृत्त ‘न्यूजलाँड्री’ने दिले आहे.

‘सकाळ’ माध्यम समूह पवार कुटुंबाशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे अभिजित पवार समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर बंधू प्रताप पवार संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. या मंडळावर खासदार सुप्रिया सुळे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत.

‘न्यूजलाँड्री’तील बातमीनुसार, गोयल यांना या प्रकरणात ३० ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विश्रामबाग पोलिस ठाण्यात (फिर्यादीची नोंद याच ठाण्यात आहे) पोलिसांनी आपल्याला धमकावल्याचा दावा गोयल यांनी केला आहे.  ‘तुम्ही ‘सकाळ’चे काय नुकसान करणार? ते तुमच्यासारख्या ५० पत्रकारांना विकत घेऊ शकतात. ‘न्यूजलाँड्री’ हे साधे वृत्तपत्रही नाही, ऑनलाइन पोर्टल आहे. ‘सकाळ’चा लोगो एकदा वापरून तर बघा, तुम्हाला लॉकअपमध्ये टाकतो’ अशा शब्दांत स्टेशन हाउस अधिकारी दादासाहेब चुडाप्पा यांनी धमकावल्याचा दावा गोयल यांनी केला आहे.

मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ‘सकाळ टाइम्स’मधील १५ कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची बातमी गोयल व त्यांचे एम्प्लॉयर ‘न्यूज लाँड्री’ने दिली होती. साथीच्या काळात कर्मचाऱ्यांना कामावरून न काढण्याच्या सरकारच्या निर्देशांचे हे उल्लंघन होते, असे  ‘न्यूजलाँड्री’चा बातमीत म्हटले होते.

महाराष्ट्राच्या गृहखात्याने दबाव आणल्यामुळे आपण फिर्याद दाखल करत आहोत, असेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. राज्याचे गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. १ नोव्हेंबर रोजी आपल्याला पोलिसांनी लॅपटॉप सादर करण्यास सांगितले असेही गोयल यांचे म्हणणे आहे. लॅपटॉप जप्त करण्यासाच्या आदेशाची प्रत मागितली असता, तोंडी आदेश पुरेसा आहे असे पोलिसांनी सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

‘सकाळ टाइम्स’मधील १५ पत्रकारांना कामावरून कमी करण्याची बातमी दिल्यानंतर दोन-अडीच महिन्यांतच या कंपनीच्या ५०-६० कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे, असा दावा ‘न्यूजलाँड्री’च्या बातमीत करण्यात आला आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाने या प्रकरणात ‘न्यूज लाँड्री’वर ६५ कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. हे वृत्त बनावट आहे असा आरोप ‘सकाळ’ समूहाने केला आहे.

कर्मचारी कपातीच्या बातमीनंतर ‘सकाळ’ समूहाचा खुलासा प्रसिद्ध करण्याची तयारीही आपण दाखवली होती पण सकाळ’ माध्यम समूहाने खुलासा न देता गोयल यांच्याविरोधात फिर्यादच केली, असे पोर्टलचे म्हणणे आहे.

गोयल यांनी “धूर्तपणे” ‘सकाळ’ समूहाचा लोगो बातमीत परवानगीशिवाय वापरला, असे या फिर्यादीत म्हटले आहे. गोयल यांच्या बातमीमुळे समूहाला मोठा आर्थिक तोटा झाला, कर्मचारी-समभागधारकांच्या विश्वासाला तडा गेला, असेही फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीची प्रतही आपल्याला देण्यात आलेली नाही, असा गोयल यांचा आरोप आहे. आता ‘न्यूजलाँड्री’ने फिर्याद रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर २४ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0