एनआयएचा चुकीचा तपास; मुस्लिम कुटुंबाची परवड

एनआयएचा चुकीचा तपास; मुस्लिम कुटुंबाची परवड

कोल्हापूर : येथून जवळ असलेल्या रेंदाळ या गावात शौकत शेख यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला. शौकत शेख यांचा म

महासंकट आणि हॉलीवूड
महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन
डीजे, लाउडस्पीकर दणक्यात लावा – प्रज्ञा ठाकूर

कोल्हापूर : येथून जवळ असलेल्या रेंदाळ या गावात शौकत शेख यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला. शौकत शेख यांचा मुलगा इर्शाद हा दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून मुंबई व दिल्लीच्या एनआयए पथकाने रविवारी मध्यरात्री तीन साडेतीनच्या सुमारास शौकत शेख यांच्या घरावर छापा टाकला व या कुटुंबातील शौकत, त्यांचा मुलगा इर्शाद, अल्ताफ व सून झोया या सदस्यांची चौकशी सुरू केली. त्यांच्या घरातील प्रत्येक वस्तूंची तपासणी केली. कागदाचा चिटोराही एनआयएने सोडला नाही. ही तपासणी सकाळी साडेआठपर्यंत सुरू होती. या काळात शौकत यांच्या कुटुंबियांना घराबाहेर जाण्यास व एकमेकांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रेंदाळ गावात छाप्याची बातमी पसरली व इर्शाद याला दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या कारणावरून एनआयएने ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू झाली तेव्हा घराबाहेर गर्दी जमा होऊ लागली.

सकाळी साडेनऊच्या सुमारास इर्शाद व त्याचा भाऊ अल्ताफ हे एनआयएच्या पथकासोबत कोल्हापूरला रवाना झाले. त्या दरम्यान ही बातमी सर्वदूर पसरली होती. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जमा झाले, काही संघटनांचे संतप्त कार्यकर्ते शौकत यांच्या घराबाहेर जमा झाले. पोलिसांनी या काळात शौकत यांच्या कुटुंबियांना संरक्षण दिले होते. जमावाची पोलिस समजूत काढत होते. पण संतप्त जमावाने पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत इर्शाद चालवत असलेल्या संस्थेचे कार्यालयही फोडले.

याच दरम्यान दुपारी बातमी पोलिसांपर्यंत पोहचली ही अटक झालेल्या इर्शादचा कोणत्याही दहशतवादी गटाशी संबंध नाही व दोघा भावांना एनआयए पथकाने सोडून दिले.

केवळ एनआयएच्या तपासातील गंभीर चुकीमुळे इर्शाद व त्याच्या कुटुंबियांवर संकट कोसळले. त्यांना काहींच्या रोषाला सामोरे जावे लागले.

एनआयएच्या तपासात गंभीर त्रुटी

ज्या संघटनेच्या तपासासाठी एनआयएचे पथक रेंदाळमध्ये पोहचले ती संघटना इर्शाद चालवत होता. इर्शादच्या संस्थेचे नाव ‘लबैक इमदाद फाउंडेशन रेंदाळ’ असे असून या संस्थेमार्फत गोरगरीब विद्यार्थ्यांना, अंध, अपंग व गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यात येते.

एनआयएने नामसाधर्म्यावर भरवसा ठेवत इर्शादवर दोन महिने देखरेख सुरू केली होती. एनआयएच्या रडारवर दहशतवाद्यांना मदत करणारी ‘एतेहिद लब्बेक फाउंडेशन’ ही संघटना होती. या संशयावरून एनआयएचे पथक रेंदाळमध्ये इर्शाद याच्या घरापर्यंत पोहचले होते व त्यांनी इर्शादच्या कुटुंबियांची सखोल चौकशी केली.

वास्तविक इर्शादचे कुटुंबिय चांदी कारागीर आहे. त्याचे स्वतःचे शिक्षण ८ वी पर्यंत झाले असून तो गरीबगरजू मुलांना आपल्या एका संस्थेतर्फे साह्य करत असतो.

जेव्हा इर्शादच्या घरासमोर तो दहशतवादी असल्याच्या संशयावरून जमाव जमला तेव्हा इर्शादचे कुटंबिय अत्यंत घाबरले होते. त्याचे आईवडिल व अन्य नातेवाईक, लहानमुले जमावापुढे धाय मोकलून रडत होते. इर्शाद व त्याच्या भावाचा दहशतवादी संघटनांशी संबंध नसल्याचे सांगत होते. त्यांच्या आक्रोशाकडे जमावाचे लक्ष नव्हते, जमावाने मुस्लिम व दहशतवादी या धारणांवर विसंबून इर्शादच्या कार्यालयाचे नुकसान केले. हे नुकसान जमावाकडून भरून मिळेल याची कोणतीही शक्यता नाही.

मूळ वृत्त आणि छायाचित्र पुढारी या दैनिकातील असून त्यामध्ये संपादकीय संस्करण करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0