निर्णायक क्षण

निर्णायक क्षण

विखारी विचारांची राजकीय व्यूहनीती नेहमीच ‘एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकून समाजात थोडा थोडा विखार पेरत तो सर्वमान्य आणि त्याचे सार्वत्रिकीकरण (नॉर्मलाईज) करत जाणे’ अशीच राहिलेली आहे.

वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोप निश्चित
विवेकवादी चळवळीचे होकायंत्र : ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

ज्येष्ठ पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी हल्लीच त्यांच्या एका लेखात साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून दिलेली उमेदवारी हा भाजपच्या हिंदुत्वाचा चेहरा समोर येण्यातला निर्णायक क्षण आहे असे म्हटले आहे. भोपाळसारख्या भाजपसाठी सुरक्षित जागेवर दिग्विजय सिंह यांच्या विरोधात लढायला शिवराजसिंह चौहान, उमा भारती अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांनी नकार दिल्यानंतर संघाकडून साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देण्याची सूचना करण्यात आली असंही त्यांनी त्याच लेखात पुढे म्हटले आहे. वास्तविक प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मालेगाव येथील दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सहभागाच्या आरोपाखाली खटला चालू असून त्या सध्या जामिनावर सुटून बाहेर आहेत. चतुर्वेदी जरी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीला निर्णायक क्षण म्हणत असल्या, तरी त्यांच्या उमेदवारीवर इतकी तीव्र प्रतिक्रिया आली नव्हती. मागाहून त्यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविरोधात केलेल्या अश्लाघ्य, आक्षेपार्ह वक्तव्यानंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटली, हा सूक्ष्म फरक आपण लक्ष्यात घ्यायला हवा.
हा सूक्ष्म फरक अशासाठी लक्ष्यात घ्यायला हवा की राजकारणात आपण समाज म्हणून काय चालवून घेतो याची झलक त्यातून दिसते. वास्तविक दहशतवादाच्या आरोपाखाली ज्यांच्यावर खटला चालू आहे, त्यांच्या उमेदवारीवरूनच देशात तीव्र प्रतिक्रिया उमटायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. त्यासाठी त्यांच्या अधिकाधिक वादग्रस्त विधानांची आपल्याला वाट पाहावी लागली आणि निवडणुका संपेपर्यंत त्यात भरच पडेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. विखारी विचारांची राजकीय व्यूहनीती नेहमीच एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकून समाजात थोडा थोडा विखार पेरत तो सर्वमान्य आणि त्याचे सार्वत्रिकीकरण (नॉर्मलाईज) करत जाणे अशी राहिलेली आहे. त्यामुळे स्वाती चतुर्वेदी यांचं निरीक्षण पूर्णतः अमान्य नसलं, तरी हा पहिला आणि शेवटचा निर्णायक क्षण नसेल ही खूणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे.
एक बरा चेहरा आणि एक खरा चेहरा अशा दोन चेहऱ्यांचं द्वंव्द उभं करून अधिकाधिक उग्र विचार हळूहळू भिनवत जाण्याचं हे तंत्र आहे. त्यामुळेच वाजपेयी चालतील, पण आडवाणी नकोत; आडवाणी चालतील, पण मोदी नकोत; मोदी परवडले, पण योगी म्हणजे अती झालं; योगी बरे म्हणायचे, साध्वी म्हणजे कठीण आहे, अश्या उग्रतेच्या चढत्या भाजणीने हा प्रवास होत असतो. यातलं प्रत्येक स्थित्यंतर त्या त्या वेळी निर्णायकच वाटत असतं. हे कुठवर जाईल याचं काही ठरावीक लक्ष्य असत नाही, हे आपण लक्ष्यात घ्यायला हवं. माझ्या कळत्या हयातीतच मागे वळून पाहिलं, तर –

  • १९९२ साली कारसेवकांनी बाबरी मशीद पाडणे हा या देशाच्या धर्मनिरपेक्ष संविधानाला आणि बहुसांस्कृतिक समाजवास्तवाला बसलेला जबर धक्का व निर्णायक क्षण होता. पण त्यातून देशाने कमंडलूचं राजकारण फेटाळून न लावता उलट आपलंसंच केलं, असंच आता मागे वळून पाहताना दिसतं. त्याला वाजपेयींचा उदार चेहऱ्याचा हातभार लागला.
  • २००२ च्या गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातेत उसळलेल्या दंगली हाही असाच निर्णायक क्षण होता. तेव्हा हतबल झालेले तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पदभ्रष्ट न करता फक्त राजधर्माची शिकवण देत होते. कालांतराने आडवाणी उपपंतप्रधान झाले. तेव्हा हा खरा चेहरा आहे आणि हे निर्णायक स्थित्यंतर झालं आहे असं कुणी म्हटलं असतं तर चुकीचं ठरलं नसतं, कारण आता आडवाणी बरे वाटावेत असा दुसरा चेहरा उदयाला आलेला होता. दुर्दैवाने आडवाणी पंतप्रधान होऊ शकले नाहीत, मात्र त्यांना मोदींचं नेतृत्व मान्य करावं लागलं.
  • २०१४ चं मोदींचं यश ‘सब का साथ सब का विकास’ अशा उदार जुमल्याच्या प्रचाराचं आणि ठरावीक प्रदेशात प्रत्यक्ष जमिनीवर समाजात जाणीवपूर्वक माजवल्या गेलेल्या दुहीचं एकत्रित यश होतं. अमित शाह यांच्यासारख्या गंभीर आरोप असणाऱ्या व्यक्तीला पक्षाध्यक्षपद देणं हेही हिंदुत्वाचा खरा चेहरा समोर येण्याच्या दृष्टीने निर्णायकच होतं, पण त्याची प्रतिक्रिया आली तशी निवळली.
  • दरम्यान अभिनव भारत, सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनांचं नाव हिंसक घटनांशी जोडलं जात होतं. डॉ. दाभोळकरांची हत्याही हबकवणारा निर्णायक क्षणच होता. पुढे कॉ. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा चार जणांच्या हत्या महाराष्ट्र-कर्नाटकात झाल्या. यादरम्यान गोरक्षकांनी लहानसान गावांत धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती आणि या क्षुल्लक घटनांचं भांडवल करून उगीच तुम्ही जातीयवाद फोफावतोय असं म्हणता आहात असा पवित्रा अनेक माध्यमांनी आणि शहाण्यासुरत्या लोकांनी घेतला होता.
  • मागाहून उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्याचा निर्णायक क्षण आला. मग त्यांनी स्वतःच स्वतःवरचे समाजात तेढ निर्माण करणारी भाषणं करण्यासंबंधीचे गुन्हे मागे घेतले आणि त्यांच्या रंगसफेदीचा एककलमी कार्यक्रम माध्यमांनी आरंभला. तरीही त्यांच्या अंगावरची भगवी कफनी पांढरी झाली नाही.

२०१४ साली ‘मी हिंदुत्वाच्या बाजूने नाही, माझं मत विकासाला आहे’ अशी भूमिका अनेक जण ठणकावून सांगत असत. त्यांनी येथपावेतो विकासाच्या मुद्द्यावर निवडलेल्या सरकारच्या हिंदुत्त्वाच्या अजेंड्याला आपण किती विरोध केला आणि त्याचं समर्थन किती केलं किंवा त्याकडे डोळेझाक किती केली हे स्वतःशीच पडताळून पाहण्याची गरज आहे. वास्तविक २०१९ सालच्या निवडणुकांना सामोरे जाताना जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेला युद्धज्वर; तो ओसरतो आहे हे लक्ष्यात येताच उपग्रह पाडण्याचं आणि त्याचं यश लाटण्याचं केलेलं एक चमत्कारिक थेर; आणि त्यानेही जमेना म्हणून आपल्या जाहीरनाम्यात प्रचारात धर्माधारित नागरिकत्वाचा कायदा, संविधानातील ३५अ ३७० कलम रद्द करणे, राममंदिराची निर्मिती हे असे मुद्दे मुख्यत्वाने प्रचारात आणले गेले तेव्हाच भाजपचा विकासाचा मुखवटा गळून हिंदुत्वाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. पण ध्रुवीकरणासाठी आता अधिक उग्र चेहरा हवा होता, तो साध्वीच्या रूपाने आता भाजपला मिळाला. त्यांच्या उमेदवारीचं समर्थन करून मोदींनीही आपला विचार काही वेगळा नाही, हे स्वतःच सिद्ध केलं आहे.
हा उग्रतेचा चढता आलेख लोकांना माहीत नाही असे नाही, पण आपण अनेकदा आपल्या समकालीन राजकारणाच्या मर्यादांत हा व्यापक पट लक्ष्यात घेत नाही. अनेक घटनांची संगती लावून संतत घडणाऱ्या एका प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही. अशी संगती लावण्याची कुवत कमावणे आपल्याला गरजेचे आहे. तसे सातत्याने करणाऱ्या विचारवंतांचे विचारही कान देऊन ऐकले पाहिजेत. मात्र देशाच्या धर्मनिरपेक्षतेला आव्हान देणाऱ्या या जहाल विचारांचा निकराने विरोध करत असतानाच आपल्याला मोठ्या लोकसंख्येच्या अस्तित्त्वाच्या मुद्द्याकडे डोळेझाक करून चालणार नाही.
ही ध्रुवीकरणाची नीती अवलंबण्याची वेळ सत्तापक्षावर आली आहे, हे विकासाच्या परिमाणांवर सरकारची कामगिरी समाधानकारक नाही याचे द्योतक आहे. नोटबंदीनंतर गमावलेल्या रोजगाराच्या संधी फिरून निर्माण झालेल्या नाहीत. शेती आणि शेतकऱ्यांवरचं संकट भीषण आहे. ते अनेक प्रकारे भारतीय संस्कृतीच्या अस्तित्त्वावरचं संकट आहे. बेरोजगारीचा दर गेल्या चारपाच दशकांतला सर्वाधिक आहे, असे काही अहवाल आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारीवरची आकडेवारीच सरकार उघड करू इच्छित नाही यातच काय ते आलं. ही सगळी चीड, रोष एकवटून ती ऊर्जा जर धार्मिक तेढ निर्माण करण्यात वापरली जाणार असेल, तर आपण विस्तवाशी खेळत आहोत याचे भान आपण राखले पाहिजे. कोणत्याही आत्यंतिक विचारांचा गुणधर्म हा असतो की तो त्यांच्या विरोधातील व्यक्तींनाही प्रतिक्रियावादी करत जातो. त्यामुळेच साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या निमित्ताने विखारी विचारांचा कणखर विरोध करून झाल्यावर त्यात गुरफटून न जाता आपली सहानुभूती बेरोजगार, संकटग्रस्त शेतकरी आणि वंचित समूहांकडे आपण वळवली पाहिजे. कारण उद्या हिंदुत्ववादी सरकार जनतेनं बदललं तरी हे प्रश्न रातोरात सुटणार नाहीत. आणि नव्या सरकारचा कारभारही या प्रश्नांवर त्या सरकारची कामगिरी कशी आहे यावरच जोखावा लागेल.
ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ मागे एका भाषणात म्हणाले होते की इजिप्तमधली हुकूमशाही उलथवणारी तहरीर चौकात झालेली क्रांती केवळ समाजमाध्यमांमुळे झाली, होऊ शकली, पसरली असं मांडणाऱ्यांनी त्या काळात इजिप्तमध्ये पावरोटीचे भाव कसे गगनाला भिडले होते याकडे दुर्लक्ष्य करू नये. आपणही मतदान करताना देशातील बेरोजगारी आणि कृषिअरिष्ट या अत्यंत गंभीर प्रश्नांचे भान ठेवले पाहिजे. अन्यथा असे निर्णायक क्षण पुढेही येतच राहतील आणि तेव्हा ते आतापेक्षा अधिक उग्र असतील.

निमिष साने हैद्राबाद येथे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतात. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0