केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर वाद

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर वाद

नवी दिल्लीः देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सहाय्य म्हणून  केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदाची नुकतीच शपथ घेतलेले प. बंगालमधील भाजपचे खासदार निसिथ प्रामाणिक यांच्या पदवीवर वाद निर्माण झाला आहे. प्रामाणिक यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली शैक्षणिक पात्रता संसदेमध्ये सादर केलेल्या शैक्षणिक पात्रता माहितीपेक्षा वेगळी असल्याचे आढळून आले आहे.

निसिथ प्रामाणिक हे कुचबिहारचे भाजपचे खासदार असून त्यांनी नुकतीच झालेली प. बंगालची विधानसभा निवडणूकही लढवली होती व ते कमी मतांनी निवडून आले होते. पण नंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकी कायम ठेवली होती.

त्यांनी विधान सभेसाठी १८ मार्च २१ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व लोकसभेसाठी २५ मार्च २०१९मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक पात्रता माध्यमिक शिक्षण असे नमूद केले होते.

मात्र लोकसभेच्या वेबसाइटवर त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता बॅचलर्स ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (बीसीए) अशी नोंद केलेली आढळून आली आहे. त्यांनी ही पदवी बालाकुरा ज्युनियर बेसिक स्कूल येथून मिळवली असून बीसीए हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या पदवीसाठी १२ वी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

प्रामाणिक यांनी संसद व निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात सादर केलेली शैक्षणिक पात्रतेविषयीची विसंगत माहितीवरून तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार उदयन गुहा यांनी टीका केली आहे. प्रामाणिक यांनी मार्चमध्ये माध्यमिक परीक्षा दिली होती व जुलै महिन्यात ते आपल्याकडे पदवी असल्याचे नमूद करत आहे. त्यांनी आपली उच्च माध्यमिक परीक्षा केव्हा उत्तीर्ण केली असा सवाल गुहा यांनी उपस्थित केला आहे.

प्रामाणिक यांनी लोकसभेला दिलेल्या माहितीत ते ज्युनिअर स्कूलमध्ये होते असे म्हणत आहेत, पण येथे असला कोणताही कोर्स उपलब्ध नसून या शाळेमध्ये ५ वी पर्यंत शिकणारे ज्युनियर स्कूल असा उल्लेख करतात. मग येथे पदवी कुठून मिळाली असाही प्रश्न गुहा यांनी उपस्थित केला आहे.

द वायरने गुहा यांच्या आरोपांची पुष्टी केलेली नाही. द वायरचा बालातुरा ज्युनियर बेसिक स्कूलच्या प्रशासनाशी संपर्क होऊ शकलेला नाही. द वायरने प्रामाणिक यांना इमेलद्वारे काही प्रश्न पाठवलेले असून त्यांची उत्तरे अद्याप आलेली नाही. ती आल्यास या वृत्तात बदल केले जातील.

कुचबिहारचे तृणमूलचे माजी खासदार पार्थ प्रतिम रॉय यांनीही प्रामाणिक यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

निशिथ प्रामाणिक हे कुचबिहारमध्ये पूर्वी तृणमूल काँग्रेसचे युथ विंगचे नेता होते. २०१८मध्ये त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. नंतर ते मुकुल रॉय यांच्या सोबत भाजपमध्ये गेले. भाजपने प्रामाणिक यांना लोकसभेचे तिकिट दिले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत प्रामाणिक यांनी मोठा विजय मिळवला होता. पण नंतर भाजपने विधानसभा निवडणुकांत त्यांना दिनहाटा जागेचे तिकिट दिले. हा विजय मात्र त्यांनी निसटता मिळवला.

मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकही पक्षात परत जातील अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. पण प्रामाणिक यांनी विधानसभेत जाण्याऐवजी लोकसभेत राहणे पसंद केले व आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

२०१९च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रामाणिक यांनी आपल्यावर ११ पोलिस खटले आहेत असे नमूद केले होते. नंतर २०२१मध्ये विधानसभा निवडणुकांत त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्यावर खून, दरोडा, चोरी व स्फोटके ठेवणे अशा स्वरुपाचे १३ खटले असल्याचे नमूद केले होते.

मूळ बातमी

COMMENTS