पंतप्रधानपदाची उमेदवारी नाहीः नितीश कुमार यांची स्पष्टोक्ती

पंतप्रधानपदाची उमेदवारी नाहीः नितीश कुमार यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्लीः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत असून मंगळवारी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, माकप महासचिव सीताराम येचुरी, भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख ओम प्रकाश चौताला यांची भेट घेतली. पण या भेटीवर प्रतिक्रिया देताना नितीश कुमार यांनी आपण भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न करत असलो तरी पंतप्रधानपदाचे आपण दावेदार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बिहारमध्ये भाजपशी साथ सोडून राजदशी घरोबा मांडल्यानंतर नितीश कुमार यांची पहिलीच दिल्ली भेट असून या भेटीत ते अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत.

मंगळवारी नितीश कुमार यांनी येचुरी, केजरीवाल यांच्याव्यतिरिक्त समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव, त्यांचे सुपुत्र व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, भाकपचे महासचिव डी. राजा, राष्ट्रीय लोकदलचे ओम प्रकाश चौटाला यांची भेट घेतली. सोमवारी त्यांनी राहुल गांधी व जनता दल सेक्युलरचे प्रमुख कुमारस्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. ते अजून काही नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

काही राजकीय निरीक्षकांच्या मते नितीश कुमार यांच्या या भेटीगाठी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांत ते स्वतःला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणत असल्याचे प्रयत्न आहेत.

पण मंगळवारी डाव्या पक्षांच्या काही नेत्यांशी चर्चा केल्यानंतर नितीश कुमार यांनी माकपच्या अनेक नेत्यांशी आपल्या जुन्या ओळखी व मैत्रीचे संबंध असून एकेकाळी आपण दिल्लीत असताना या नेत्यांना भेटत असे. आज अनेक वर्षानंतर आम्ही एकत्र येत असून डावे पक्ष, प्रादेशिक पक्ष, काँग्रेस यांची एकजूट करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. हे सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नितीश कुमार म्हणाले. आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार अजिबात नाही व त्यासाठी इच्छुकही नाही, असेही त्यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. विरोधी पक्षांमध्ये एकजूट करणे यालाच आपले प्राधान्य आहे. सर्व पक्षच पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडतील. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे की नाही, हे सांगेन असेही नितीश कुमार म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS