आंबेडकरी पक्षांच्या राजकीय धोरणाच्या अनुषंगाने ते सातत्याने आपली भूमिका व्यक्त करत होते. रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणावर त्यांनी परखड लेखन केलेले आहे. ‘रिपब्लिकन पक्ष विशिष्ट जाती धर्मासाठीच आहे काय?’ असाही प्रश्न त्यांनी चर्चेला घेतला होता. आंबेडकरवादी राजकारण हे ‘जात, वर्ग, आणि स्त्रीदास्याच्या अंताची भूमिका घेणारे असावे अशी मांडणी विलास वाघ यांनी सातत्याने केली आहे.
विलास वाघ सरांची आणि माझी पहिली भेट झाली ती पुणे विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर शिक्षण व ज्ञानविस्तार विभागामध्ये. विद्यापीठीय शिक्षणाचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा संवाद वाढावा, प्रबोधनात्मक कार्यक्रम उभे राहावे, ज्ञानात्मक आधार प्रदान व्हावे, या उद्देशाने विद्यापीठाच्या कार्यकक्षेत विविध उपक्रमांद्वारे समन्वय साधला जात होता. यासाठी अनेक सामाजिक भान असणारे अभ्यासक या विभागात काम करत होते त्यात प्रा. विलास वाघ हेही कार्यरत होते. डॉ. भालचंद्र फडके हे त्यावेळी या विभागाची धुरा सांभाळत होते. शालेय जीवनात मी माझ्या कथांची हस्तलिखिते डॉ. फडके सरांना वाचनासाठी पाठवून देत असे. मी पाठवलेल्या कथा वाचून ते त्यासंदर्भात मला मार्गदर्शन करत असत. कधी ते पत्रव्यवहार करत तर कधी मी कोरेगाव, सातारा येथून त्यांना भेटायला येत असे. असाच एकदा अकरावीला असताना मी त्यांना भेटायला पुणे विद्यापीठात आलो होतो. तेव्हा डॉ. फडके सरांनी माझी प्रा. विलास वाघ यांच्या बरोबर ओळख करून दिली. स्वच्छ साधेपणात, खुबिदार हसण्याची ठेवण असलेल्या प्रा. विलास वाघ सरांबरोबर स्नेहबंध सुरू झाला तो तेव्हापासून. त्यांच्या मृदू स्वभावाने ते समोरच्याला सहज आपलेसे करत असत. माणूस जोडत असत. विलास वाघ म्हणजे माणूस प्रिय असलेल्या माणूस. माणसांचा समूहच बरोबर घेऊन जगणारा. सरांच्या बरोबर अनेक माणसांचा गोतावळा आहे हे हळूहळू जाणवत गेले. तसेच त्यांच्या व्यक्तित्वातील अनेक कंगोऱ्यांचा परिचयही होऊ लागला. मी पाहिलेला त्यांचा हा प्रवास माणसामाणसांच्या जोडणीतून वाढत गेलेला. एक सामान्य व्यक्ती ते समाजाचा जेष्ठ मार्गदर्शक म्हणून व्यामिश्र होत गेलेले त्यांचे व्यक्तित्व होते.
धुळे येथून जवळच असलेल्या मोराणे गावात त्यांचे बालपण गेले. जातिव्यवस्थेतील शोषणाचे चटके बसलेले, दारिद्र्य हाल अपेष्टा यात बालपण गेलेले प्रा. विलास वाघ सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाकडे निरंतर आणि रचनात्मक कामाकडे वळले ते त्यांच्या बालपणीच्या पार्श्वभूमीमुळे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केवळ वैचारिक वारसाच लाभलेले असे नाही तर त्यांच्या स्पर्शाची श्रद्धेने जपणूक करणारे एक व्यक्तित्व म्हणजे वाघसर. धुळे येथे आपले प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या एस पी कॉलेज मधून पदवी प्राप्त केली. आपल्या उपजिविकेसाठी त्यांनी प्रारंभी कोकणातील नरवडे गावात शिक्षकाची नोकरी स्वीकारली आणि त्यानंतर पुणे येथील अशोक विद्यालयात ते नोकरी करू लागले. पुणे येथे शिक्षकाची नोकरी करत असताना विलास वाघ यांच्या जीवनाची जडणघडण सुरू झाली. सामाजिक बांधिलकीचा विचार त्यांच्या मनात रुजला तो याच काळात. पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपला हस्तक्षेप सुरू केला. सर्वात महत्वाचे म्हणजे परिवर्तनवादी चळवळीच्या ते संपर्कात आले. एका बाजुला आंबेडकरी सामाजिक चळवळीचा ते भाग होते तर दुसऱ्या बाजुला समाजवादी विचारसरणीबरोबर त्यांची वीण घट्ट होत होती. आंबेडकरी चळवळीच्या प्रभावातून सामाजिक कार्याशी जोडले गेलेले विलास वाघ रचनात्मक कार्याच्या अनुषंगाने समाजवादी चळवळीचे अविभाज्य भाग झाले. पुणे शहरातील बदलत्या सांस्कृतिक वातावरणात समाजवादी विचारधारेच्या बरोबर विलास वाघांनी स्वतःला जोडून घेतले. फुले-आंबेडकरी चळवळीबरोबर समाजवादी चळवळीचा समन्वय साधला पाहिजे ही भूमिका विलास वाघांनी कृतीमध्ये प्रारंभापासून आणली. त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या ध्येयाची आखणी केली.
सुगावा नियतकालिक
आंबेडकरी चळवळीतील वेगवेगळ्या नियतकालिकांनी स्वतःच्या वैचारिक व्यक्तित्वाचा ठसा मराठी साहित्य आणि संस्कृतीवर उमटवला आहे. ‘सुगावा’ हे आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र म्हणून उभे राहत गेले. स्फुट, बातम्या, प्रासंगिक लेख, पुस्तक परिक्षण, याच बरोबर काही ललितलेखन यांचाही समावेश ‘सुगावा’त झाला. धम्मचक्र परिवर्तन विशेषांक ही सुगावा नियकालिकाची विशेष ओळख सांगता येईल. वैचारिक भूमिका अधोरेखित करण्यासाठी ‘सुगावा’ने प्रारंभी केलेले काम हे अतिशय महत्त्वाचे आहे. ‘सुगावा’ या नियतकालिकातून परिवर्तनवादी आंबेडकरी चळवळीचा विचार अधोरेखित केला गेला. अनेक नवे लेखक ‘सुगावा’तून लिहिते झाले. वैचारिक नियतकालिक ही ‘सुगावा’ची ओळख दृढ होऊ लागली. आंबेडकरी समाजाच्या भावभावना साहित्याच्या माध्यमातून प्रस्थापित साहित्यव्यवहारातून व्यक्त होत होत्या, पण वैचारिक अभिव्यक्तीची उणीव नियतकालिकांच्या पातळीवर होती. त्यातही पुणे शहरातून अथवा पश्चिम महाराष्ट्रातून जाणवणारा हा रिता अवकाश ‘सुगावा’ने भरून काढला. जनसंपर्क, प्रकाशनाचे सातत्य, वैचारिक स्पष्टता यामुळे ‘सुगावा’चे नियतकालिक म्हणून महत्त्व नोंदले गेले. ‘सुगावा’ नियतकालिकाच्या जोडीला सुगावा प्रकाशनाने साहित्यव्यवहारात आणि साहित्याच्या सांस्कृतिक राजकारणात जाणीवपूर्वक हस्तक्षेप करायला प्रारंभ केला. तो प्रयत्न अधिक प्रभावी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या दलित साहित्याच्या ललित शैलीतील साहित्य प्रकारांना प्रस्थापित मराठी प्रकाशकांनी रुचीपालट म्हणून स्वीकारले होते. काही मोजक्याच नाकारलेल्या वर्गाच्या प्रकाशन संस्था या व्यवसायात होत्या. परंतू प्रकाशन व्यवसायाची चळवळकेंद्री नैतिकता सुगावा प्रकाशनाने यशस्वीपणे मांडली. कोणत्याही परिवर्तनवादी चळवळीला समाजमाध्यमाची आणि माध्यम प्रसाराची आवश्यकता असते. त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते ते सुगावाने केले आणि यासाठी विलास वाघ आणि त्याहीपेक्षा अधिक उषा वाघ यांनी स्वीकारलेली मूल्यव्यवस्था महत्त्वाची होती. सुगावाच्या पुस्तक निर्मितीमध्ये प्रथमपासूनच एक वैचारिक भूमिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा लोकशाही समाजवादी पाया महत्त्वाचा मानून तो जात वर्ग स्त्रीदास्यांताच्या समग्र परिवर्तनाकडे नेणे हे ध्येय त्यामागे होते. त्यामुळेच सुगावा प्रकाशनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. अनेक लोकांना लिहिते केले. ते त्याचे हक्काचे प्रकाशक झाले. कवितासंग्रह, कथासंग्रह, नाटक, चरित्र, आत्मकथन, कादंबरी, या साहित्य प्रकारांची पुस्तके प्रकाशित करणारे सुगावा प्रकाशन असे स्वरूप असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचे चांगदेव खैरमोडे लिखित तसेच बी. सी. कांबळे लिखित चरित्र खंड यांनी एक भक्कम पाया भरणी केली. याच बरोबर प्रासंगिक पुस्तिका प्रकाशन करणारे, समीक्षा ग्रंथ आणि वैचारिक वाङमय प्रकाशित करणारे सुगावा प्रकाशन हे चळवळीचे महत्त्वाचे केंद्र केंद्र झाले. ललित साहित्याऐवजी वैचारिक साहित्य निर्माण करून प्रकाशकीय व्यवस्थापन निर्माण केले. दलित साहित्यासंदर्भात मराठी प्रकाशकांची असणारी प्रस्थापित ओळख सुगावाने बदलली. दलित साहित्य, आंबेडकरी साहित्याचा एक स्वतःचा सांस्कृतिक अवकाश निर्माण केला. उषाताई वाघांच्या नेटक्या व्यवस्थापनातून सुगावाने प्रकाशन व्यवस्था, वितरण व्यवस्था उभी केली. आपल्या विचारधारेप्रमाणे सुगावाने विविध टप्प्यांमध्ये पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशकाची वैचारिक भूमिका आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात केवळ आत्मोन्नतीचा स्वर न ठेवता आत्मटीकेचा प्रखर स्वर सुगावाने निर्माण केला. चिकित्सा आणि खंडन-मंडन ही प्रबोधन चळवळीतील भूमिका सुगावाने घेतली. केवळ व्यवसाय नव्हे सांस्कृतिक भांडवल निर्माण केले. यापाठीमागे प्रा. विलास वाघ यांची वैचारिक दृष्टी पहायला मिळते. ऐंशी नव्वदीच्या दशकात निर्माण झालेला आंबेडकरी शिक्षित नवमध्यमवर्ग या वैचारिक ज्ञानव्यवहाराचा सांस्कृतिक भाग झाला. त्या पिढीने आंबेडकरी वाचन संस्कृतीचा चेहरा बदला. विलास वाघ सर प्रकाशक म्हणून त्याला नेमकेपणे न्याहाळत होते.
रचनात्मक कार्य
पुणे येथे अशोक विद्यालयात नोकरी करत असताना विलास वाघ यांचा समाजवादी चळवळीबरोबर अधिक संपर्क आला. कार्यकर्ता म्हणून प्रा. विलास वाघांनी रचनात्मक कार्य उभे करण्यास प्रारंभ केला. कोणत्याही कामाला प्रारंभ करण्यापूर्वी त्यासंदर्भात बारकाईने जाणून घेणे हे विलास वाघ सरांचे वैशिष्ट्य होते. शिक्षण आणि जातीनिर्मूलन, यासंदर्भात रचनात्मक कार्य उभे करण्यासाठी त्यांनी पुणे येथे वडारवाडी भागात बालवाडी सुरू केली. त्यांनी सर्वेषां सेवा संघामार्फत देवदासींच्या मुलांमुलींसाठी वसतिगृह सुरू करून परिवर्तनाच्या नव्या कार्यास सुरुवात केली. मी ‘गाभारा’ या चित्रपटाचं लेखन करत असताना विलास वाघ सरांशी या विषयासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली होती. त्यावेळेस त्यांनी देवदासींच्या मुलांसंदर्भात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आणि विशेषत पुण्यातील विविध संस्थांचा, शासन व्यवस्थेचा दृष्टिकोन, विद्यार्थ्यांच्या सामाजिक सांस्कृतिक विकासातील अडचणींचा एक पट उलगडून दाखवला होता. नेमकेपणा, बारकाव्याने केलेली मांडणी आणि कामाच्या मागची तळमळ हे वैशिष्ट्य एक गंभीर रचनात्मक कार्याला वाहून घेतल्याने त्यांच्याकडे होते. ते कार्यकर्ता म्हणून भरभरून बोलत होते. परित्यक्ता स्त्रियांच्यासाठी त्यांनी असेच संस्थात्मक काम उभे केले. त्यांनी समता शिक्षण संस्थेच्या वतीने महिलांसाठी वसतिगृह, मुलांमुलींसाठी वसतिगृह, भटके आणि विमुक्त मुलांच्यासाठी आश्रम शाळा आदी संस्थात्मक कामांना महत्त्व दिले. यातून उपेक्षेत नाकारलेल्या समूहगटांचे ते आप्त झाले. वंचितांचा आधारवड झाले. त्यांच्या संस्थांमधील सर्वांचे ते पालक झाले. ममत्वाने त्यांना बिलगणारी मुले मी नेहमी पाहत होतो. मी ‘पाऊलखुणा’ या माहितीपटाचे चित्रिकरण करत असताना तळेगाव ढमढेरे येथे गेलो होतो. वाघ सर तिथे येताच तेथील मुले मुली किती जिव्हाळ्याने आभाळ कवेत घ्यावे तशी धावत होती. मी बाहेरचं ढगाळ आकाश आणि तो मायेचा कालवा एकत्र चित्रित करण्यासाठी धावाधाव करत होतो.
जाती अंताचा प्रश्न
सुगावाच्या प्रारंभीच्या काळातच शिक्षणाबरोबर आणि प्रा. वाघ सर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात काम सुरू केलं होतं. त्यासाठी त्यांनी कालांतराने एक लक्षवेधी पुस्तिकाही निर्माण केली. ‘आता जातीचा अभिमान नको’, ‘जातीच्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे’ किंवा ‘जाती मोडण्याचा खरा खरा उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह’, ‘जातीशी द्रोह केला पाहिजे’ ही भूमिका सातत्याने आपल्या कृती आणि युक्तीतून विलास वाघांनी अधोरेखित केली. आंतरजातीय विवाह होणे ही जाती अंताच्या लढ्याची सुरुवात म्हणून पाहत होते. ‘सुगावा’ने सुरू केलेला हा उपक्रम पुढे ‘परिवर्तन मिश्र विवाह संस्था’ या नावानं सुरू राहिला.
आंबेडकरवादी समाजवादी
पुणे विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा देऊ विलास वाघ पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्यांची आणि कार्याची व्याप्ती वाढली. सुगावाच्या बरोबर राष्ट्रसेवा दलाच्या शिक्षण विभागाशी जोडले गेलेले वाघ सर, समाज प्रबोधन संस्थेच्या कामात सहभागी झाले. ‘समाजप्रबोधन पत्रिके’चे ते प्रकाशक आणि मुद्रक होते. त्यांनी केवळ पुणे शहराच्या परिसरात आपले कार्यक्षेत्र ठेवले नाही तर त्याशिवाय धुळे येथेही शैक्षणिक काम उभे केले. मोराणे येथे भटक्या विमुक्त जमातीच्या मुलांसाठी आश्रम शाळा, समाजकार्य महाविद्यालय, यासारख्या संस्थात्मक कामात त्यांनी विशेष लक्ष घातले. संस्थात्मक काम हे प्रबोधनाचे खरे काम आहे हे हे त्यांचे ब्रीद होते. त्यांनी पुणे येथे ‘सिद्धार्थ सहकारी बँके’च्या स्थापनेत पुढाकार घेतला. या बँकेचे ते दोन वेळेस अध्यक्ष झाले. बँकेद्वारे पुणे शहरातील सामान्य कष्टकरी माणूस त्यांनी नव्या दलित मध्यमवर्गाशी जोडून घेतला. अनेक स्वयंरोजगार आणि व्यवसाय करणारे लोक या बँकेच्या सहाय्याने उभे राहिले यामागे केवळ विलास वाघ सरांची दृष्टी आहे असे म्हणता येते. बौद्ध समाजाला सांस्कृतिक भान देण्यासाठी विलास वाघ सरांनी अनेक उपक्रमातून सहभाग घेतला. शासकीय पातळीवरील नवबौद्ध मध्यमवर्गाला आणि उच्च मध्यमवर्गाला या सांस्कृतिक बंधांना जोडण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न होता. यातूनच विविध उपक्रमांचा आणि बौद्ध परिषदांचा ते भाग झाले. आंबेडकरवादी दैनिकाचा प्रयत्न होणे आवश्यक आहे यासाठी ‘बहुजन महाराष्ट्र’ या दैनिकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली. सामाजिक चळवळी, राजकीय कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या साह्याने सांस्कृतिक क्षेत्रात नवी बांधणी करता येते का याचा प्रयत्न ते करत होते.
विद्यार्थी चळवळींचा मार्गदर्शक
प्रा. विलास वाघ हे प्रारंभापासून आंबेडकरवादी चळवळीचा एक अविभाज्य भाग होते. ते विद्यार्थी चळवळीमध्ये विविध पातळ्यांवर सक्रिय होते. विविध वैचारिक गटांच्या विद्यार्थ्यांना शिबिरांमध्ये जातीनिर्मूलानाचा कृतीकार्यक्रम सांगत होते. आंबेडकरवादाची मांडणी करत होते. वैयक्तिक आणि पुरोगामी चळवळीच्या लढ्यातील प्रत्येकाला ते मार्गदर्शन करत होते. सर्व चळवळींबरोबर स्वतःला जोडून घेत होते. गेले चार पिढ्या ते मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांच्या बरोबर उभे राहात होते. नव्वदीच्या दशकापासून विद्यार्थ्यांच्या चळवळींबरोबर उभे असणारे विलास वाघ सर कार्यकर्त्यांचे विद्यार्थ्यांचे केंद्र होते. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन असो अथवा संत जनाबाई वसतीगृहातील विद्यार्थिनींचे आंदोलन असो, त्या आंदोलनात ते सक्रिय होते. विद्यार्थ्यांच्या मधूनच नवीन समाजाची निर्मिती होऊ शकते, हे त्यांना ज्ञात होते. त्यामुळे विविध पातळ्यांवरील विविध विद्यार्थी संघटनांशी त्यांचा नजीकचा संबंध होता, मग ही विद्यार्थी संघटना पुणे विद्यापीठातील ‘पुसू’ असो, ‘डाप्सा’ असो अथवा सत्यशोधक विद्यार्थी संघटना असो. विलास वाघ हे विद्यार्थ्यांच्या लढ्यात सक्रिय सहभागी होते. युवक चळवळींशी असलेला त्यांचा अनुबंध हा तेवढाच महत्त्वाचा आहे. सातत्याने विविध पातळ्यांवर युवकांच्या चळवळींशी आणि परिवर्तनवादी चळवळींबरोबर संबंधित असणारे विलास वाघ हे युवकांचे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते.
आंबेडकरी राजकारण आणि आत्मटीका
आंबेडकरी पक्षांच्या राजकीय धोरणाच्या अनुषंगाने ते सातत्याने आपली भूमिका व्यक्त करत होते. रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणावर त्यांनी परखड लेखन केलेले आहे. ‘रिपब्लिकन पक्ष विशिष्ट जाती धर्मासाठीच आहे काय?’ असाही प्रश्न त्यांनी चर्चेला घेतला होता. आंबेडकरवादी राजकारण हे ‘जात, वर्ग, आणि स्त्रीदास्याच्या अंताची भूमिका घेणारे असावे अशी मांडणी विलास वाघ यांनी सातत्याने केली आहे. ‘आंबेडकरवाद्यांनी क्रांतिकारी भूमिका घेण्याची गरज आहे’, असे विचार ते आपल्या व्याख्यानातून आणि लेखनातून व्यक्त करत होते. समग्र समाज परिवर्तन हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे असं ते मानत. म्हणूनच सातत्यानं आत्मपरीक्षण करत. अगदी प्रारंभी ‘जातीचा अभिमान नको असं’ ते म्हणत असत. आणि अगदी अखेरीस ही जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह यांची आवश्यकता आहे ही त्यांची भूमिका ते अधोरेखित करत होते. समाज व्यवस्थेतून मुक्त होण्यासाठी ज्ञानाच्या सर्व शक्यतांचा विचार हा त्यांचा महत्त्वाचा विचार होता.
सांस्कृतिक राजकारण
वाघ सातत्याने साहित्य व्यवहाराचा आणि संस्कृती व्यवहाराचा अविभाज्य भाग बनले होते. त्यांनी गं. बा. सरदार अध्यक्ष असलेल्या बार्शी साहित्य संमेलन विषयक लेखन केले. त्यांनी ‘अस्मितादर्श’च्या पुण्यातील १९८४ च्या मेळाव्याचे संयोजन केले होते. दलित रंगभूमीच्या अनेक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. १९९० मध्ये ‘दलित नाट्य महोत्सव आयोजित केला तेव्हा ते संयोजन समितीचे एक भाग होते आणि भि. शि. शिंदे, मी आणि रामनाथ चव्हाण मुख्य संयोजक होतो. गेल्या दहा वर्षांपासून पुण्यात सुरू असलेल्या ‘सम्यक साहित्य संमेलना’चे ते एक संयोजक होते. या संमेलनास मार्गदर्शन करत होते. विलास वाघ हे आंबेडकरी सांस्कृतिक राजकारणाला दिशा देऊ पहात होते. ही दिशा अर्थातच समाजवादी लोकशाहीच्या चौकटीमध्ये होती. त्यांचा समाजवादी परिवर्तन यावर ठाम विश्वास होता.
प्रागतिक विचारांशी साथ
ते अनेकदा समाजवादी राजकारणामध्ये जसजसे बदल होत गेले त्याच्याशी जोडून घेत होते. आंबेडकरवादी विचारव्युहाच्या दृष्टीने विलास वाघ त्यांचा सभोवताल पाहात होते. समाजवादी विचारधारेत जातीय शोषणाला नाकारणारा, मूलतत्ववादी विचारांना नाकारणारा, जातीय वर्चस्व झुगारून देणारा असा जो गट निर्माण झाला होता, तो धर्म केंद्री जनसंघाच्या विचारांना झुगारून देणारा होता. त्यात विलास वाघ एक होते. तो गट जात वर्ग आणि स्त्रीदास्य अंताविषयी भूमिका घेत होता. म्हणून विलास वाघ आंबेडकरवादी असूनही समाजवादी मंडळीत बरोबर राहिले. ते डाव्या मार्क्सवादी मंडळींच्या बरोबर राहिले. विविध वयाच्या, पुरोगामी विचारसरणीच्या अनेक व्यक्ती आणि संस्था, संघटना गट यांच्या बरोबर ते कायम राहिले आणि त्यांनी आपली आंबेडकरी विचारधारा अग्रक्रमाने पुढे नेली.
विलास वाघ यांच्या जाण्याने एक निष्ठेने रचनात्मक कार्य करणारा, आंबेडकरवादी मार्गदर्शक गेला. तसेच त्यांच्या जाण्याने, त्यांच्यासारखा समविचारी मंडळी, समाजवादी वा इतर प्रागतिक राजकीय पक्षांशी संवाद साधणारा कोण आहे? हा ही प्रश्न निर्माण झाला आहे.
डॉ. अनिल सपकाळ, हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक असून, मुंबई विद्यापीठाच्या फुले-आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक आहेत.
COMMENTS