नितीश कुमारांनी घेतली राहुल गांधींची भेट, ‘विरोधकांच्या ऐक्या’वर चर्चा

नितीश कुमारांनी घेतली राहुल गांधींची भेट, ‘विरोधकांच्या ऐक्या’वर चर्चा

बिहारचे मुख्यमंत्री मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ‘आप’चे अरविंद केजरीवाल, सीपीआय(एम)चे सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आयएनएलडी सुप्रीमो ओम प्रकाश चौटाला यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी देशातील सद्य राजकीय परिस्थिती आणि विरोधी पक्षांचे ऐक्य निश्चित करण्याच्या मार्गांवर चर्चा केल्याचे समजते.

नितीश कुमार यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष) प्रमुख एच.डी. कुमारस्वामी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या निवासस्थानी गांधी आणि कुमार यांच्यात जवळपास तासभर बैठक झाली. कुमार यांच्यासोबत बिहारचे जलसंपदा मंत्री आणि जनता दल (युनायटेड) नेते संजय कुमार झा होते. गांधी आणि कुमार यांच्यात बिहारमधील एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर आणि आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांच्या समर्थनासह ‘महाआघाडी’ सरकार स्थापन केल्यानंतर ही पहिली भेट आहे.

कुमार सोमवारी राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले. ते मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, सीपीआय(एम)चे सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आयएनएलडीचे प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.

कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना भाजपच्या विरोधात एकसंघ शक्ती म्हणून एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सामना करण्यासाठी जेडीयू नेते कुमार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

कुमार यांच्यावर टीका करताना, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) नेते आणि जमुईचे खासदार चिराग पासवान म्हणाले, की नोकरी शोधणाऱ्यांवर लाठीमाराचे आदेश देणारे मुख्यमंत्री पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेसह तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहेत.

बिहारच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते विरोधकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत, असे पासवान यांनी हिंदीतील ट्विटमध्ये म्हटले आहे आणि त्यात कुमार यांना टॅग केले आहे.

पासवान यांच्या पक्षानेही ट्विटमध्ये कुमार यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की, “बिहारमध्ये पूर आला आहे, पण मुख्यमंत्री बिहारपासून दूर आहेत”.

COMMENTS