पाकिस्तानमधील सत्तारुढ इम्रान खान यांच्या सरकारविरोधातील ठराव शुक्रवारी नॅशनल असेंब्लीत मांडण्यात येणार होता पण सभापती असाद कैसर यांनी सभागृहाचे कामका
पाकिस्तानमधील सत्तारुढ इम्रान खान यांच्या सरकारविरोधातील ठराव शुक्रवारी नॅशनल असेंब्लीत मांडण्यात येणार होता पण सभापती असाद कैसर यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित करत येत्या २८ मार्चला हा ठराव चर्चेस आणण्यात येईल असे स्पष्ट केले.
शुक्रवारी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल होणार म्हणून विरोधी पक्षाचे १५० हून अधिक सदस्य उपस्थित होते. एकूण सदस्यांची संख्या निश्चित कळाली नाही पण सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे वातावरण दिसत होते. सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी कुराणातील काही भागांचे वाचन झाले व त्यानंतर काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेल्या ख्याल झमान, माजी अध्यक्ष रफीक तरार, माजी सदस्य रेहमान मलिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नियमानुसार कामकाज बरखास्त करत २८ मार्च ही तारीख सभापतींनी जाहीर केली.
गेल्या ८ मार्चला विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारवर अविश्वास ठराव दाखल केला होता. ही प्रक्रिया ८ मार्चला नॅशनल असेंब्लीच्या प्रशासनाने पूर्ण केली होती. सत्तारुढ सरकारवर अविश्वासाचा ठराव दाखल झाल्यानंतर १४ दिवसांत सभापतींना नॅशनल असेंब्लीचे विशेष अधिवेशन बोलावावे लागते. पण सभापतींनी २१ मार्चपर्यंत अधिवेशन बोलावले नव्हते ते २५ मार्चला बोलावले. आता २८ मार्चला अविश्वास ठराव नॅशनल असेंब्लीत ठेवला जाईल. त्यानंतर त्यावर चर्चा होऊन मतदान घेतले जाणार आहे.
विरोधकांचा सभापतींवर आरोप
नॅशनल असेंब्लीचे सभापती कैसर यांनी २८ मार्चंपर्यंत संसद स्थगित केल्याने विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी सभापती इम्रान खान सरकारचे बाहुले असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांनी ८ मार्चला सरकारविरोधी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. त्यानंतर घटनेनुसार १४ दिवसांत त्यावर चर्चा करणे अनिवार्य होते पण सभापतींनी घटनेच्या नियमांची पायमल्ली केली असे शहबाज म्हणाले. तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांनी सभापतींनी मैदानावरून पळ काढल्याचा आरोप केला. आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आहोत असाही दावा त्यांनी केला. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणणे हा घटनात्मक अधिकार असून देशात पारदर्शी सार्वत्रिक निवडणुका व्हाव्यात अशी आमची मागणी आहे. सध्याच्या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असल्याची टीका भुत्तो यांनी केली.
COMMENTS