स्टॉकहोम: आर्थिक धोरण किंवा अन्य घटनांमागील कार्यकारण परिणाम समजून घेण्यासाठी "नैसर्गिक प्रयोग” पद्धतीचा पाया घालणारे अर्थतज्ज्ञ डेव्हिड कार्ड, जोशुआ
स्टॉकहोम: आर्थिक धोरण किंवा अन्य घटनांमागील कार्यकारण परिणाम समजून घेण्यासाठी “नैसर्गिक प्रयोग” पद्धतीचा पाया घालणारे अर्थतज्ज्ञ डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गिदो इम्बेन्स या अर्थतज्ज्ञांना २०२१ सालासाठीचे अर्थशास्त्र विभागातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
नैसर्गिक प्रयोगांमध्ये वास्तव आयुष्यातील परिस्थितींचा उपयोग जगावरील प्रभाव समजून घेण्यासाठी केला जातो. हा दृष्टिकोन अन्य क्षेत्रांमध्येही वापरला जाऊ लागला आहे व अनुभवजन्य संशोधनात त्यामुळे मोठी क्रांती घडून आली आहे.
कॅनडात जन्मलेले अर्थतज्ज्ञ कार्ड यांनी अमेरिकेतील न्यू जर्सी या राज्यामध्ये किमान वेतनात वाढ करण्याचा प्रयोग १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला केला होता. अनेक संशोधकांना, अशा प्रकारच्या वेतनवाढीमुळे रोजगारात नेहमी घटच होते, या मताचे फेरपरीक्षण करणे, या निर्णयामुळे भाग पडले होते.
“नैसर्गिक प्रयोग सर्वत्र असतात,” असे आल्फ्रेड नोबेल मेमोरिअल पारितोषिकाच्या अर्थशास्त्र विभागाचे समितीच्या सदस्य इव्हा मॉर्क यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही पद्धत सामाजिक शास्त्रांच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रभावी ठरली आहे, असेही त्या म्हणाल्या.
पूर्वीपासून अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकांवर अमेरिकेतील संस्थांचे वर्चस्व आहे आणि यंदाचे वर्षही अपवाद नव्हता. कार्ड सध्या बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात काम करतात; अँग्रिस्ट कॅम्ब्रिजमधील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये काम करतात आणि जन्माने डच असलेले इम्बेन्स स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत शिकवतात.
“मला तर हा टेलिफोन कॉल आल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला. मग मी बातमी ऐकून थरारूनच गेलो,” इम्बेन्स यांनी स्टॉकहोममधील वार्ताहरांना सांगितले. हे पारितोषिक दोन चांगल्या मित्रांसह मिळाले आहे याचा आनंदच वेगळा आहे, असेही ते म्हणाले. अँग्रिस्ट इम्बेन्स यांच्या लग्नसोहळ्यात त्यांचे बेस्ट मॅन होते.
या पारितोषिकाला पूर्वी स्वेरिजेस रिक्सबँक पारितोषिक म्हटले जायचे. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक दिले जाते. यंदाच्या नोबेल पारितोषिकांमधील हे अखेरचे पारितोषिक होते. अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांना १० दशलक्ष स्वीडिश क्राउन्सचे पारितोषिक (१.१४ दशलक्ष डॉलर) विभागून प्राप्त होणार आहे.
यापैकी पारितोषिकाचा निम्मा भाग कार्ड यांना “कामगार अर्थशास्त्रातील त्यांच्या प्रयोगात्मक योगदाना”बद्दल दिला जात आहे. अँग्रिस्ट व इम्बेन्स यांना पारितोषिकाचा उर्वरित अर्धा भाग त्यांच्या “कार्यकारण नातेसंबंधांच्या विश्लेषणातील पद्धतींच्या स्वरूपातील” योगदानाबद्दल विभागून जाहीर झाला आहे.
स्वीडनमधील, डायनॅमाइटचा शोध लावणारे तसेच धनाढ्य व्यावसायिक, अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार विज्ञान, साहित्य, शांतता आदी क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हे प्रतिष्ठेचे पारितोषिक दिले जाते. त्यासाठी निधीही अल्फ्रेड नोबेल यांनीच मागे ठेवला आहे.
१९०१ सालापासून नोबेल पारितोषिके दिली जात आहे. मात्र, अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देण्याची सुरुवात स्वीडनमधील मध्यवर्ती बँकेच्या ३००व्या वर्धापनदिनानिमित्त करण्यात आली. हा पुरस्कार प्रथम १९६९ मध्ये देण्यात आला.
अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यापूर्वी जाहीर होणाऱ्या साहित्य व शांतता क्षेत्रातील नोबेल पारितोषिकांच्या छायेत काहीसे झाकोळले जाते. तरीही ऑस्ट्रियन-ब्रिटिश अर्थतज्ज्ञ फ्रेडरिक ऑगस्ट व्हॉन हायेक आणि अमेरिकन अर्थतज्ज्ञ मिल्टन फ्राइडमन यांसारख्या अत्यंत प्रभावी अर्थतज्ज्ञांना गेल्या काही वर्षांत हे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे.
(लेखाचे छायाचित्र डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गिदो इम्बेन्स )
COMMENTS