नवी दिल्लीः २०१९मध्ये पोलंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विरोधी पक्ष नेते करजिस्तोफ ब्रेजा यांच्या मोबाइल फोनमध्ये पिगॅसस स्पायवेअरने ३३ वेळा घ
नवी दिल्लीः २०१९मध्ये पोलंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विरोधी पक्ष नेते करजिस्तोफ ब्रेजा यांच्या मोबाइल फोनमध्ये पिगॅसस स्पायवेअरने ३३ वेळा घुसखोरी केल्याचे दिसून आले आहे. ब्रेजा यांच्या एसएमएसमध्ये घुसखोरी करून हे मेसेज सरकारी टीव्ही चॅनल व अन्य प्रसार माध्यमांत दाखवण्यात आले होते.
या निवडणुकांत सत्तारुढ पक्ष लॉ अँड जस्टिस पार्टीला निसटता विजय मिळाला होता.
असोसिएट प्रेसने शुक्रवारी ब्रेजा यांच्या मोबाइल फोनमध्ये पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून घुसखोरी झाल्याचे वृत्त दिले. ही घुसखोरी इस्रायल कंपनी एनएसओने केल्याचा आरोप ब्रेजा यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात आपले मोबाइल फोन पिगॅससद्वारे हॅक झाल्याची तक्रार पोलंडमधील विरोधी पक्ष नेत्यांनी व एका व्यक्तीने केली होती. या सर्वांच्या तक्रारीची शहानिशा केली असता त्यांच्या फोनमध्ये घुसखोरी झाल्याचे असोसिएटेड प्रेस व टोरंटोस्थित सिटीझन लॅबच्या फोरेन्सिक तपासणीत निष्पन्न झाले आहे.
दरम्यान पोलंड सरकारच्या प्रवक्त्याने अशी कोणतीही घुसखोरी झालेली नसल्याचे सांगितले. सरकार कोणावरही पाळत ठेवण्यासाठी बाहेरच्या कंपन्यांना सांगत नाही. न्यायालयाने तसे आदेश असतील तर पाळत ठेवली जाते, असे या प्रवक्त्याने सांगितले. पिगॅसस मार्फत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवण्याचे काम आम्ही केलेले नाही, विरोधकांचा आरोप म्हणजे फेक न्यूज असल्याची प्रतिक्रिया पोलंडचे पंतप्रधान माटेउज मोराविएकी यांनी दिली आहे.
विरोधी पक्ष नेते ब्रेजा यांचा फोन २६ एप्रिल २०१९ ते २३ ऑक्टोबर २०१९ या काळात ३३ वेळा हॅक करण्यात आला होता. या हँकिंगमध्ये ब्रेजा यांच्या फोनमधील मेसेज सरकारी टीव्हीवर दाखवण्यात आले. या मेसेजमुळे विरोधी पक्षांची प्रचार यंत्रणा विस्कळीत झाली. जनतेमध्ये आपल्या पक्षाप्रती अफवा व दुष्प्रचार पसरवण्यात आला, असा आरोप ब्रेजा यांचा आहे.
पोलंडमध्ये १३ ऑक्टोबर २०१९मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांत ४३.६ टक्के मते मिळवून लॉ अँड जस्टिस पार्टीने पुन्हा सत्ता काबीज केली.
ब्रेजा यांच्या व्यतिरिक्त ईवा व्रजोसेक व रोमन गिर्टिंच या दोघांचे मोबाइल फोन पिगॅससमार्फत हॅक करण्यात आले होते. व्रजोसेक यांचा फोन हॅक होत असल्याचा इशारा त्यांना मोबाइल कंपनी ऍपलने दिला होता. तर रोमन गिर्टिच यांचा फोन २०१९च्या निवडणुकांत १८ वेळा हॅक करण्यात आला होता.
मूळ बातमी
COMMENTS