एक दिवस पाणवठ्यावरचा…

एक दिवस पाणवठ्यावरचा…

तुम्ही जेव्हा निसर्गाशी तादात्म्य पावता तेव्हा निसर्ग तुम्हाला त्यातली वेगवेगळी गुपिते उघडी करून दाखवत असतो...फक्त तुम्ही निसर्गाशी एकरूप होण्याची गरज असते.

गेल्या २५ वर्षांमध्ये जेव्हापासून मी वन्यजीव व निसर्ग संवर्धनात आलो व निसर्गात फिरायला लागलो तेव्हापासून मी भारतातल्या आणि भारताबाहेरच्या अनेक जंगलांमध्ये भटकलो…अनेकदा हिरवाईच्या, निसर्गाच्या शोधात, प्राण्यांचा, पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी… त्यासाठी मग मी अनेकदा जंगलांमध्ये दिवस दिवस राहिलो, कधी पाणवठ्याच्या काठी बसलो तर कधी पाणवठ्याकाठच्या लपणांमध्ये बसून निसर्ग आणि निसर्गातले वन्यजीवन अनुभवले…

बांधवगढचे जंगल असेल किंवा कान्हा, रणथंभोरचे जंगल असेल किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातले फणसाचे पाणी, ५२ नंबरचा पाणवठा असेल किंवा ३६ नंबरचा पाणवठा असेल अशा किंवा राजबाघ तलाव असेल… अशा अनेक पाणवठ्यांच्या काठी मी बसलो आणि जंगल अनुभवले… परंतु या सर्वांमध्येही माझ्या मनात कायम कोरला गेला तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या “सती बागेच्या” जवळचा अगदी रस्त्यापासून जवळ असलेला परंतु तरीही कोणालाही न दिसणारा असा एक सुंदर आणि वनसंपदेने समृद्ध असलेला पाणवठा.. ह्या पाणवठ्याकाठी मी अनेकदा बसलोय…इथे खरेच निसर्गाची कमाल दिसून येते.. तुम्ही फक्त निसर्गाशी एकरूप व्हायला हवे. माझ्या आयुष्यातले अनेक अविस्मरणीय क्षण मी इथे अनुभवलेत.. त्यामुळेही हा पाणवठा माझ्या जवळचा आहे..

बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिरलात की तुम्ही वन खात्याच्या ऑफिस मागून हळुहळू जसे व्याघ्र विहाराच्या बस सुटतात, तसेच हल्ली जिथे पर्यटकांसाठी पर्यटक निवास बनवलेले आहेत त्याच्या पाठीमागच्या बाजूच्या मैदानाकडून पुढे जाऊ लागता तसे तिथे सती बागेचे मंदिर दिसू लागते.. तिथे तुम्ही रस्त्यावर जरी उभे राहिलात तरी त्या मंदिराच्या पलीकडचा झाडांच्या दाटीत दडलेला पाणवठा तुम्हाला दिसून येत नाही. जसे जसे तुम्ही सती मंदिराच्या प्रांगणात जाऊन पोहोचता तसे तुम्हाला मागचा अर्जुन, वावळा, वड, पिंपळ, कुसुम्ब, काटेसावर, पांगारा हे वृक्ष आणि बांबूच्या राईत दडलेला पाणवठा दिसून येतो…जर तुम्ही खरे निसर्गप्रेमी असाल तर पहिल्याच दृष्टीक्षेपात तुम्हाला तिथे जाऊन बसावे असे वाटू लागते..

खरेतर इथे वर्षाच्या कुठल्याही दिवसांमध्ये बसावे आणि जंगल अनुभवावे… परंतु इथे साधारण फेब्रुवारी महिना सुरू झाला की जंगल आणि निसर्ग, वन्यजीव संपदा अनुभवण्याची मजाच काही और आहे…हा पाणवठा “दहिसर नदी” जी पूर्वी पूर्ण बोरिवली आणि दहिसर परिसराची जीवनदायिनी होती तिच्या वरच तयार झालेला आहे. इथे फेब्रुवारीच्या दरम्यान खूप कमी पाणी उरलेले असते आणि त्यामुळे त्या नदीच्या पात्रातल्या खोलगट भागात पाणी साठून हा पाणवठा तयार झालेला आहे… ह्या पाणवठ्यात वर्षानुवर्षे अनेक मोठ्या शिळा वाहत येऊन असंख्य लहानमोठ्या शिळांमुळे एखाद्या वन्यजीव अभ्यासकाला बसण्यासाठी निसर्गतःच अनेक जागा तयार झालेल्या आहेत.. त्या मोठाल्या शिळांच्या मागे लपून बसून तुम्ही निसर्गाचे, जंगलाचे निरीक्षण व्यवस्थित करू शकता..

ह्या वेळचा फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि मी ह्या पाणवठ्यावर जाऊन बसायला सुरुवात केली.. निदान आठवड्यातून एकदातरी ह्या पाणवठ्यावर जाऊन बसायचे आणि पाणवठ्यावरचे जग काय असते ते व्यवस्थित अनुभवायचे हे मी ठरवूनच टाकले होते… परवाच ह्या पाणवठ्यावर जाऊन बसलो.. सकाळची साधारण ११ ची टळटळीत वेळ असेल.. मी माझ्या पाठीवरच्या पिशवीत प्यायला पाणी, भूक लागली तर खायला थोडा सुका खाऊ तसेच त्याबरोबरच पक्षी दिसले किंवा कुठले प्राणी आले तर त्यांचे प्रकाशचित्रण करण्यासाठी कॅमेरा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस घेऊन मी सतीबागेकडे पोहोचलो… मंदिरातल्या मूर्तीला मनोभावे नमस्कार केला आणि तिला मनोमन विनवले की आजच्या माझ्या ह्या दिवसभराच्या निरीक्षणात मला अविस्मरणीय असे वन्यजीवन आणि निसर्ग आणि जंगल मनमुराद अनुभवता येवो… आणि मग हळूच त्या पाणवठ्यात डोकावलो, पाणवठ्यात कोणी प्राणी तर नाहीत ना हे एकदा बघून घेतले आणि नेहमीप्रमाणे आत शिरलो.

पाणवठ्याच्या काठावरच्या कुसुम्ब, पळस, पांगारा, काटेसावर ह्या वृक्षांना छान पालवी आणि फुले आली होती त्यामुळे आता तिथे खऱ्या अर्थाने रंगोत्सव सुरू झाला होता.. मी माझ्या कॅमेऱ्यात काही प्रकाशचित्रे टिपून घेतली आणि मग पुढे सरकलो…

आता मी पूर्णपणे शांत झालो होतो आणि माझे मन आणि चित्त आणि डोळे आणि कान हे पूर्णपणे निसर्गाशी आणि तिथल्या शांततेशी एकरूप झाले होते… मी आत शिरलो तेव्हा पाणवठ्यात सकाळची वेळ असल्यामुळे बाजूच्या झाडांच्या आणि बांबूच्या राजीतून येणाऱ्या किरणांनी फेर धरला होता आणि पाणवठ्यात उरलेले पाणी हे त्यातल्या पानगळीमुळे गळून पडलेल्या सुक्या पानांमुळे काहीसे वेगळेच भासत होते. मला एकक्षण वाटले की “रझा, गायतोंडे, हुसेन” या जगप्रसिद्ध चित्रकारांप्रमाणे निसर्गानेही एखादे अमूर्त शैलीतले चित्र रंगवले आहे की काय??? बाजूला पडलेल्या असंख्य शिळा त्यांचे विविध आकार आणि त्यावरून पाणी गेल्यामुळे त्यांना मिळालेले विविध आकार आणि ह्या सर्व शिलांमध्येच एका खोलगट भागात साचलेले पाणी आणि त्यात पानगळीमुळे पडलेल्या पानांमुळे त्या सर्वच पाणवठ्याला एक वेगळेच परिमाण लाभले होते… त्या साचलेल्या पाण्यावर पाणकिडे मस्तपैकी विहार करत होते त्यांच्या वावरण्यामुळे आणि मधेच येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीमुळे त्या पाण्यावर मस्त तरंग उमटत होते तसेच आजूबाजूच्या झाडांचे प्रतिबिंबही त्यावर पडले होते. आता मी माझ्या पिशवीतून कॅमेरा काढून त्या अमूर्त शैलीतल्या पेंटिंग वाटणाऱ्या भागाचे प्रकाशचित्रण केले. आता मी मनात ठरवले होते की अगदी संध्याकाळ होईपर्यंत, अगदी सूर्याची शेवटची किरणे या भागावरून जाईपर्यंत इथून उठायचं नाही… मग मी तो पाणवठा एकदा शांतपणे निरखून घेतला आणि एका मोठ्या शिळेच्या मागे जाऊन बसलो..

काहीवेळ असाच शांततेत गेला, साधारण एक वाजला असावा आता त्या पाणवठ्यावर माकडांची एक टोळी हळुहळू यायला लागली होती.. माकडचं ती, ती कसली शांतपणे येताहेत. त्यांनी त्या पाणवठ्याच्या बाजूच्या झाडांवरून मस्ती करत एका फांदीवरून दुसर्या फांदीवर उड्या मारत पण तेवढ्याच हुशारीने त्या पाणवठ्यात कोणते मोठे जनावर नाही हे पाहत ती हळूच पाणवठ्यात उतरली… आणि मग पहिल्यांदा त्यातल्या हुप्प्याने चहूकडे पाहून घेतले आणि तिथे काही धोका नाही हे पाहून हळूच तो स्वतः पुढे होऊन पाणी प्यायला मग बाकीची माकडे, माकडिणी त्यांची छोटी पिल्ले अशी सर्व हळूहळू पाणवठ्याच्या काठावर उतरली आणि पाणी पिऊ लागली. ते दृश्य एवढे सुंदर होते. त्या पाण्यात त्या रांगेने पाणी पिणाऱ्या माकडांचे प्रतिबिंब पडले होते.. ते खूपच सुंदर वाटत होते.. तेव्हा माझ्या मनात ही गोष्ट आली की निसर्गातल्या सर्व गोष्टींमध्ये, घटकांमध्ये किती शिस्तबद्धता असते. ती माकडे थोडावेळ मग तिथेच बागडली आणि मग एकमेकांच्या खोड्या काढत आली तशीच परत एकदा बाजूच्या अर्जुन वृक्षाच्या आणि वावल्याच्या झाडावर चढली आणि एकमेकांच्या खोड्या काढू लागली..

छोटी पिल्ले आता एकमेकांशी कसरती केल्याप्रमाणे खेळात होती तर टोळीतल्या हुप्प्यांबरोबर त्यांच्या माकडिणी ह्या झाडाच्या मोठ्या फांद्यांवर बसल्या होत्या आणि आता त्या माकडिणी आपल्या हुप्प्याची सेवा करू लागल्या होत्या, काही जणी आपल्या आपल्या नराच्या अंगावरच्या उवा काढण्यात दंग होत्या, तर काही आपल्या हुप्प्याशी क्रीडा करण्यात मग्न होत्या.. तर टोळीतले एकटे नर आणि त्या टोळीचा मुख्य नर हे आता झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसले होते आणि जसे माणसे रेलून गादीवर झोपतात त्याप्रमाणे झाडाच्या फांद्यांवर रेलून झोपी गेली होती.. थोडा वेळ छोट्या पिल्लांची गडबड आणि किचकिचाट सुरू होता. परंतु जसे त्या टोळीच्या मुख्य हुप्प्याने एकचं इशारा दर्शक आवाज केला तसे सर्व शांत झाले.. आता तीही पिल्ले आपल्या आईला बिलगली होती आणि तीही हळूहळू परंतु अगदी सावधपणे झोपी गेली..
या माकडांच्या टोळीत एक नेहमीच दिसून येते आणि ते म्हणजे ह्या टोळीत जो कोणी मुख्य हुप्प्या असेल त्याची दहशत आणि त्याचा हुकूम चालतो.. आणि तो त्या टोळीच्या रक्षणासाठीही नेहमीच सक्रिय असतो.. हा हुप्प्या, ही माकडे जेव्हा दुपारी आणि रात्री झाडावर चढून झोपतात तेव्हाही सावध असतात आणि नेहमीच झाडाच्या शेंड्यावर जाऊन कोणी बिबट्यासारखे मोठे जनावर पाणवठ्यावर येतेय का किंवा बिबट्यासारखे जनावर झाडावर चढून तर येत नाहीय ना ह्यावरही लक्ष ठेवून असतात.
थोड्यावेळाने पाणवठ्यावर सर्वच शांत झाले.. जवळपास दीड एक तास गेला असावा खूपच शांतता जाणवत होती.. आता मलाही चांगलंच उकडू लागले होते परंतु वन्यजीव अभ्यासक म्हणून खूप वर्ष काम केल्यामुळे एका जागी खूपवेळ कधीकधी २-२ दिवस बसण्याची सवय होती त्यामुळे मी शांतपणे बसून होतो.

आता वाऱ्याच्या झुळकीने मधेच एखादे झाडाचे वाळलेले पान खाली गाळून पाण्यात पडत होते त्यामुळे होणारा छोटासा आवाजही जाणवत होता…तर मधेच येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने आता थोडे थोडे थंड वाटत होते. तरीही वरती सूर्यदेव आग ओकत होते… मधेच – ४ स्वोर्ड टेल फुलपाखरांचा एक थवा उडत उडत आला आणि त्या पाणवठ्याजवळच्या सुकलेल्या भागात खाली उतरला… मला लगेच लक्षात आले की त्या अर्धवट सुकलेल्या जागी असलेल्या जमिनीत ह्यांना असलेल्या क्षारांची कुणकुण लांबूनच लागली असावी आणि क्षार ग्रहण करण्यासाठी ती फुलपाखरे आता तिथे आली होती या क्रियेला मराठीत “फुलपाखरांचे चिखलपान” असेही म्हटले जाते. आणखीन दहाएक मिनिटे गेली असतील आणि तिथे आणखीन काही त्याच जातीची फुलपाखरे येऊ लागली.. आणि थोड्याच वेळात मला दिसून आले की तिथे निदान ५०० ते ६०० तरी फुलपाखरे येऊन बसली असावीत. मी हे सर्व दुरूनच पाहत होतो.

हे चिखलपान हे मी पूर्वीही फुलपाखरांवर अभ्यास करत असतानाही अनुभवले असल्यामुळे मला त्यांचे प्रकाशचित्रण करण्याची इच्छा असूनही मी माझ्या जागेपासून उठलो नाही. फक्त माझ्या “दोन डोळ्यांच्या” कॅमेऱ्यामध्ये मी तो क्षण टिपून घेतला.. आता ती फुलपाखरे अगदी शांतपणे जमिनीवर बसून जमिनीतल्या क्षारांचे पान करू लागली होती… थोडावेळ गेला असेल आणि माझ्या पाठीमागच्या बाजूच्या बांबूंच्या राईतून खसखस ऐकू येऊ लागली तसे मला लक्षात आले की आता ह्या बांबूंच्या राईमध्ये बांबूची कोवळी पालवी खाण्यासाठी आता हरणांचा मोठा कळप तिथे अवतरला होता… त्यांच्यासाठी खाद्य आणि त्यांना पिण्यासाठी पाणी हे दोन्हीही उपलब्ध होते… ती हरणे संध्याकाळपर्यंत तिथेच चरणार होती आणि संध्याकाळ होता होता कधीतरी पाणवठ्याच्या पाण्यावर पाणी पिण्यासाठी उतरणार होती..

मी आता आणखीन काय दिसणार म्हणून सरसावून बसलो होतो..खरेतर कितीही सवय असली तरी आता दगडाच्या प्रचंड शिळेपाठीमागे दडून बसल्यामुळे आणि उन्हामुळे अंगाला घाम फुटला होता आणि पायांना रग लागली होती. तर तिथे असणारी छोटी छोटी केमरे आता माझ्या चेहऱ्यापुढे येऊन तोंडावर नाचू लागली होती… तरीही मला जर चांगले वन्यजीवन अनुभवायचे असेल तर शांत बसण्याशिवाय आता गत्यंतरच उरले नव्हते…मी थोडावेळ तसाच बसून राहिलो. आणि काही वेळाने माझ्या मागून हळूच एक पांढऱ्या शेपटीचा पक्षी हळूहळू समोरच्या झाडाच्या फांदीवर येऊन बसला.. आणि माझ्या नजरेत अचानक तजेला आला आणि आनंदही झाला.. कारण तो पक्षी होता स्वर्गीय नर्तक म्हणजेच Paradise Flycatcher आणि हा पक्षी स्वर्गीय नर्तकाचा नर होता… हा पक्षी खरेतर मुठीत मावेल एवढा पण त्याला असणारी हातभार लांब पांढऱ्या रंगांची शेपूट आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारा डोळ्याभोवतीचा काळा पट्टा ह्यामुळे तो खूपच छान दिसतो. शिवाय तो नर्तन केल्याप्रमाणे ह्या झाडावरून त्या झाडावर किंवा ह्या फांदीवरून त्या फांदीवर करत असतो… त्यामुळे त्याच्या हालचाली अगदी स्वर्गीय भासतात म्हणूनच त्याला मराठीत  “स्वर्गीय नर्तक” असेही म्हटले जाते. आता ह्या स्वर्गीय नर्तकाने समोरच्या पाणवठ्याच्या पाण्यात मधेच सूर मारणे सुरू केले. हे एवढे सुंदर होते कि ते मी माझ्या दोन डोळ्यांच्या कॅमेऱ्यात साठवून घेऊ लागलो. स्वर्ग नाचणाच्या करामती बघून झाल्या.

आता जवळपास संध्याकाळचे साडेचार वाजू लागले होते..आणि माझ्या समोरचा पाणवठा हळूहळू सायंप्रकाशाने उजळू लागला होता..त्यातच समोरच्या वावल्याच्या झाडावर पोपटांचे काही थवे येऊन बसले त्या सुंदर प्रकाशात त्यांचे पंख आणि त्यांचा तो हिरवा रंग आणि लाल चोची उठून दिसत होत्या.. तेवढ्यात समोरच्या पाणवठ्याच्या पाण्यात एक पाणकावळा येऊन उतरला आणि तो त्या पाण्यात सूर मारू लागला तर त्याचवेळी एक भारद्वाजाची जोडी हळूहळू त्यांच्या दुडक्या चालीने लाजत लाजत झाडावरून खाली उतरली आणि हळूच पाणवठ्यावर येऊन उतरली. आणि त्यांनी आपल्या चोची पाण्यात बुडवून पाणी प्यायला सुरुवात केली थोडावेळ त्यांनी पाणी प्यायले. आपले पंख बुडवून खडबड केली आणि मग ते आल्यापावली उडून गेले…

आता जवळपास संध्याकाळ होऊ घातली होती आणि संध्याकाळची सोनेरी किरणे सर्व ठिकाणी दाटून अली होती त्यात समोरच्या पाणवठ्यावर एक रानधोबी पक्ष्याची जोडी आली… आणि पाणी पिऊन इथेतिथे करून निघून गेली. आता पाळी होती ती मोठे प्राणी येण्याची.. जवळपास संध्याकाळचे साडेपाच वाजले असावेत आणि बाजूच्या बांबूच्या राजीत खसखस वाढू लागली. तिथे चरणार्या हरणांचा कळप हळूहळू पाण्यावर येऊ लागला होता. त्यांच्या कळपाचा म्होरक्या म्हणजेच एक शिंगवाला कुर्रेबाज नर हळूच समोरच्या बांबूच्या राजीतून बाहेर आला आणि त्याने हळूच पाणवठ्यांचा कानोसा घेतला, दुसरे कोणते प्राणी तिथे आहेत का? वगैरे पहिले आणि मग हळूहळू करून एक एक हरणे खाली उतरू लागली. संध्याकाळच्या सोनप्रकाशात ती हरणे आणि त्यांच्या अंगावरची सोनेरी लव आता उठून दिसत होती. त्यांचे प्रतिबिंब त्या पाणवठ्याच्या प्रकाशात पाण्यात पडले होते… आणि मला माझ्या डोळ्यांमध्ये किती साठवू आणि काय करू असे झाले होते…

त्याचवेळी समोरच्या काठावर कावळ्यांची एक टोळी येऊन उतरली आणि हळूहळू करून तेही आता पाण्यात उतरले.. आणि आपले पंख पाण्यात बुडवून आणि खडबडून अंघोळ करू लागले होते.. हे दृश्य मी याआधीही अनुभवले होते की कावळा हा एकमेव पक्षी दिवसाची सुरुवात आणि शेवट व्यवस्थित अंघोळ करून करतो.. कदाचित ह्या त्यांच्या स्वच्छ राहण्याच्या सवयीमुळेच आपण त्यांना आपल्या पूर्वजांचे पितरांचे स्थान दिले असावे..

पाणवठ्याच्या आजूबाजूच्या झाडांवर आतापर्यंत झोपलेल्या माकडांची टोळी आता हळूहळू जागी होऊ लागली होती… जणू त्यांची दुपारची वामकुक्षी पूर्ण झाली होती आणि ताजीतवानी झालेली माकडे एखाद्या माणसाप्रमाणेच आळस देत होती. आता हळूहळू आधी झाडांवरून त्या टोळीचा मुख्य हुप्प्या खाली आला आणि त्याने एकंदरच पाणवठ्यांचा अंदाज घेतला आणि मग एक एक माकड खाली उतरू लागले, आधी मोठी एकांडी माकडे खाली आली, मग हुप्पे आणि त्यांच्या माकडिणी खाली आल्या आणि मग सर्वात शेवटी पिल्ले खाली आली आता ती माकडे रंगात आली होती एवढावेळ मी त्या पाणवठ्यातच मोठ्या शिळेच्या मागे बसूनही अजिबात हालचाल न केल्याने आणि तिथल्या निसर्गाशी एकरूप झाल्याने ह्या सर्व प्राणीजगताला माझे अस्तित्वच कळले नव्हते…परंतु आता त्या पाणवठ्यावर हरणांचा कळप, इथे तिथे बागडणाऱ्या माकडांची टोळी तर पाण्यात उतरून अंघोळ करणारे कावळे अशी दाटी झाली होती. जो तो आपल्या सोयीप्रमाणे त्या पाणवठ्याचा वापर करत होता. तर समोरच्या बांबूच्या राजीमध्ये सोनेरी सूर्यप्रकाशाची दाटी झाली होती त्या सूर्यप्रकाशात सन बर्ड्सची धावपळ चालू होती.

बाजूच्या जंगलातून जशी संध्याकाळ दाटू लागली तसे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज दाटू लागले होते.. बाजूच्याच जंगलातून मला एकाच वेळी भारद्वाजाचा आवाज तर तांबटाचा आवाज शिवाय ड्रोनगो ह्या पक्ष्याचे आवाज तर मधेच समोरच्याच झाडावर बसलेल्या पोपटांचे आवाज असे एकाच वेळी येत होते.. खरेच ही म्हणजे एक पर्वणीच होती… आता हळू हळू तो हरणांचा कळप पाणवठ्यापासून दूर जाऊ लागला आणि मी जिथे बसलो होतो त्या मोठ्या दगडाकडे येऊ लागला होता.. आता मला पूर्ण खात्री होती की हरणांपैकी एखादे हरीण मला पाहणार आणि मग तो पूर्ण कळप उधळणार.. झालेही तसेच त्यातल्या एकांड्या शिंगवाल्या नराने मला पाहिले आणि तसा तो सावध झाला आणि त्याने २ मिनिटे थांबून आपल्या पायाने आणि तोंडाने “कुक कुक” असा धोक्याचा इशारा दिला.. एवढा वेळ स्तब्ध बसलेल्या मला पाहून त्यांना जणू काही एखादा त्यांचा शत्रूच आला असावा हे वाटून आता तो कळप आल्यापावली उधळला.. आणि पाणवठ्याच्या काठावरून बांबूच्या राजीत शिरला त्यांचे हे राजीत शिरतानाही त्यांच्यात प्रचंड शिस्तबद्धता होती.. आधी लहान पिल्ले शिरली मग माद्या आणि मग नर आत शिरले.
ही धावपळ पाहून आता एवढावेळ गडबड गोंधळ माजविणाऱ्या माकडांच्या टोळीलाही लक्षात आले होते की समोरच्या दगडामागे कोणीतरी आहे.. त्यातल्या मोठ्या हुप्प्याने हळूच माझ्या समोरच्या झाडावर चढून माझा मागोवा घेतला आणि मग त्याला लक्षात आले की हा तर आपलाच भाऊबंद असावा… त्याच धुंदीत त्याची गडबड पुन्हा सुरु झाली… माझ्या मनात विचार आला की त्या हुप्प्याच्या मनात हरणांबद्दल विचार आला असावा की किती मूर्ख आणि घाबरट प्राणी आहेत हे एका साध्या माणसाला घाबरले आणि पळून गेले??? परंतु त्याचबरोबर माझ्या मनात हाही विचार आला की “मानवाचे पाऊल आणि वाळवंटाची चाहूल” असे म्हटले जाते ते हरणांना कळले असावे का?

परंतु हे सर्व विचार आणि संध्याकाळ दाटून आली असतानाच मी त्या पाणवठ्यातून उठायचे ठरवले. आजचा माझा पाणवठ्यावरचा दिवस खूपच सार्थकी लागला होता..मला हवेतसे मनसोक्त वन्यजीवनाचे, निसर्गाचे, जंगलाचे त्यातल्या विविध घटकांचे निरीक्षण करता आले होते.. बऱ्याच नवीन गोष्टी, घटना डोळ्यासमोर घडल्या होत्या. तेच क्षण मी मनात साठवत त्या पाणवठ्यातून उठून बसलो, सकाळपासून एकाच जागेवर बसल्यामुळे पाय आखडले होते, कंबर आता आहे हे जाणवून देत होती. परंतु मनात मात्र एक वेगळीच उर्मी होती तीच साठवत मी पाणवठ्यातून बाहेर आलो.

ह्या सर्व अनुभवातून एक मात्र मला ठामपणे लक्षात आले ते म्हणजे तुम्ही जेव्हा निसर्गाशी तादात्म्य पावता तेव्हा निसर्ग तुम्हाला त्यातली वेगवेगळी गुपिते उघडी करून दाखवत असतो…फक्त तुम्ही निसर्गाशी एकरूप होण्याची गरज असते.

सौरभ महाडिक, हे वन्यजीव अभ्यासक व संशोधक आहेत.

COMMENTS