मुस्लिम पक्षकारांचा कोणत्याही मध्यस्थीला नकार

मुस्लिम पक्षकारांचा कोणत्याही मध्यस्थीला नकार

नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यात सुन्नी वक्फ बोर्डाने वादग्रस्त जमिनीवरील आपला दावा सोडण्यासाठी ‘सेटलमेंट अग्रीमेंट’ दाखल करणार असल्याची भूमिका घेतली असली तरी त्या भूमिकेला आमचे कोणाचेही समर्थन नाही असे अन्य मुस्लिम पक्षकारांनी स्पष्ट केले आहे. या सर्व पक्षकारांनी सुन्नी वक्फ बोर्डाचे मध्यस्थीच्या प्रश्नाशी आमचा काही संबंध नाही, त्यामध्ये आमचे प्रतिनिधीच नाही असा पवित्रा घेतला आहे. जर हिंदु पक्षकारांकडून कोणतीच मध्यस्थीची भूमिका येत नसेल तर आणि ते जाहीरपणे कोणत्याही मध्यस्थीला नकार देत असतील तर अशा परिस्थितीत मध्यस्थीचा पर्याय मान्य करणे शक्य नसल्याचे सर्व मुस्लिम पक्षकारांनी स्पष्ट केले आहे. तसे पत्रच या मुस्लिम पक्षकारांनी काढले आहे.

हे पत्र इजाझ मकबूल, शकील अहमद सैद, एम. आर. शमशाद, ईर्शाद अहमद व फुजैल अहमद अय्युब्बी, शाहीद रिझवी या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पक्षकारांच्या वतीने दाखल केले आहे.

या सर्व पक्षकारांनी प्रसारमाध्यमात ‘सेटलमेंट अग्रीमेंट’ची वृत्ते कुठून आली असा सवाल करत या बातम्या मध्यस्थी करणाऱ्या समितीकडून अथवा या समितीतून काही सदस्यांकडून आल्या असतील, असा आरोप केला. अशी वृत्ते येणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचेही मुस्लिम पक्षकारांनी म्हटले आहे.

सुन्नी वक्फ बोर्डाने रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमिनीवरील आपला हक्क सोडल्याच्या बदल्यात अयोध्येत असलेल्या २२ मशिदींची जबाबदारी व त्यांचे संरक्षण सरकारने आपल्या हाती घ्यावे अशी अट सेटलमेंट करारात घातली आहे.

मूळ बातमी

COMMENTS