अमेरिकेतील विषाणूचा उद्रेक

अमेरिकेतील विषाणूचा उद्रेक

अमेरिकेत उजव्या अतिरेकी संघटनांचा वाढत प्रभाव, ट्रम्प काळात झालेली त्यांची गतिमान वाढ आणि त्यांचा मागील निवडणुकीतील वाढलेला सहभाग यावरून असे दिसते की अमेरिकेतील जनतेचे रॅडिकलायझेशन वाढत जाणार आहे.

कित्येक वर्षे मधून मधून जागा होणाऱ्या, अमेरिकेतील कोव्हिडपेक्षा भीषण विषाणूच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. खुद्द प्रेसिडेंटच्या चिथावणीने गोऱ्या वर्ण वर्चस्ववादी, सशस्त्र प्रोटेस्ट करणाऱ्या गटाने (का दहशतवाद्यांनी) कॅपिटोलवर (अमेरिकेच्या संसद भवनावर) हल्ला चढवून इथे दोन्ही गृहांचे अधिवेशन चालू असताना काही काळ ताबा मिळवला. या प्रतिगामी चळवळीचा घटनाक्रम मागील नोव्हेंबर निवडणुकीच्या निकालापासून किंवा ब्लॅक लाईव्ह्स मॅटरची (BLM) प्रतिक्रिया इथं पासून चालू होत नाही. हा विषाणू कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. काही परिस्थितीत हा थोडीफार सारखी लक्षणे दाखवत उफाळून येतो.

ही लक्षणे म्हणजे – धार्मिक उन्माद, अल्पसंख्याकांचा द्वेष, नियंत्रणरहित आर्थिक व्यवस्था समर्थन, अतिरेकी स्वातंत्र्याच्या कल्पना, युद्धखोर राष्ट्रवाद, विज्ञानाला विरोध, श्रेष्ठत्वचा अहंकार आणि कसलातरी आपल्या विरुद्ध कट करत आहे अशी भीती, स्वतःला पीडित समजणे, वाईट परिस्थितीसाठी समाजातील कुठल्यातरी लोकांच्या गटाला जबाबदार ठरवणे इत्यादी. या यादीतील लक्षणे कशामुळे, कोणत्या परिस्थिती दिसतात हा प्रश्न २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून सर्वांना पडला आहे. परंतु हा विषय या लेखाच्या विषयाच्या बाहेर आहे.

इतिहास घडताना ही सर्व लक्षणे एकत्रित दिसतील असे नाही. परंतु यातील बरीचशी लक्षणे एकाचवेळी दिसतात. त्यांचा जोर सारखा असेल असे नाही. परंतु आर्थिक परिस्थिती ढासळली, बेकारी वाढली, पुरोगामी ग्रासरूट चळवळ वाढली की समाज ढवळून निघतो. अरिष्ठ निर्माण होते. जर हे सावरता आले नाही की हा रोग उफाळून येतो. उदा. हिटलर काळातील नात्झी पक्ष, अगदी नुकतीच झालेली अमेरिकेतील २००९ मधील टी पार्टी, २०२०मधील व्हाईट सुप्रमिस्ट संघटना, प्राउड बॉइस.

इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. केवळ परिस्थिती ढासळली की प्रतिक्रिया म्हणून पुरोगामी आणि प्रतिगामी शक्ती आपोआप निर्माण होतात किंवा त्यांच्या चळवळी सुरू होतात असे नाही. इतिहास हा आपोआप घडत नसतो, योग्य परिस्थितीत तो मानव घडवतो. त्यासाठी राजकीय पक्ष आणि करिश्मा असलेला नेता लागतो. उदा. ट्रम्पने ही कामगिरी चांगलीच निभावली. आणि अतिरेकी संघटना फोफावली. मात्र २००९ मधील टी पार्टीला असा करिश्मा असलेला नेता मिळाला नाही. ती चळवळ विरून गेली.

जेव्हा सर्व काही ऑल वेल असते तेव्हा हे अतिरेकी शांत असतात. पेट्रोल स्वस्त असते. टॅक्सेस कमी आहेत असे भासवले जाते. पण त्याहीपेक्षा श्रीमंत आणि मोठ्या कॉर्पोरेशन्स वर टॅक्स कमी आहेत हे माहीत नसते. अमेरिका ग्रेट असते. लष्करी सामर्थ्य एक नंबरी असते. अमेरिकेचे कुठेतरी युद्ध चालू असते. तिथे “स्वातंत्र्य”, “लोकशाही” आणली जात असते. आपल्याला “स्वातंत्र्य” म्हणून इतर देश, तेथील लोकं आपला दुस्वास करतात. अगदी तुटपुंजा पगार असला तरी काही हरकत नसते. जॉब असतो. पण स्वातंत्र्य आहे, म्हणून आपल्याला काहीही करता येईल हा विश्वास असतो. कष्ट करून श्रीमंत होऊ, घर बांधू, अगदी मोठा उद्योगपती होऊ अशी स्वप्न असतात. सार्वजनिक स्वस्त आरोग्य सेवा नसलेली चालते कारण सरकारवर विश्वास नसतो शिवाय टॅक्स वाढतील ही भीती. काळे आणि मेक्सिकन आपापल्या “पायरी”वर असतात.

मग मधेच आर्थिक अरिष्ट येते. जॉब जातात. अमेरिकन ड्रीममधून खाडकन जाग येते. कुणावर तरी खापर फोडावे लागते. त्यासाठी इमिग्रंट आहेत. फक्त काळ्यांना बेकारभत्ता मिळतो असा समज पसरवला जातो. त्यामुळे काळ्यांचा द्वेष. उदारमतवादी लोकांचा तिरस्कार शिकवला जातो. या सर्वांमुळे अमेरिका रसातळाला गेली असे वाटायला लागते. मग अमेरिकेला परत ग्रेट केली पाहिजे. ट्रम्पच्या रॅलीजमधील Make America Great Against या टोप्या आठवतात ना? मग USA, USA ओरडणे चालू होते. आपण विविध कटांचे बळी आहोत अशी भावना वाढते. पुरोगामी चळवळींनी सोडून दिलेली स्पेस अतिरेकी संघटना भरतात. यांना रिपब्लिक पक्षाचे समर्थन असते. ट्रम्प सारखा नेता मिळाल्यावर अशा संघटना भराभर वाढतात.

यांचा राजकीय पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष. यांचे मुख्यतः तीन भाग करता येईल. एक, काही गमावलेली, रस्त्यावर उतरू शकणारी. हीच ती रस्त्यावर USA, USA किंवा फ्रीडम फ्रीडम ओरडणारी. जनता. उघड उघड वंशवादी, शस्त्रधारी जनता. हिंसा करण्याकडे कल असतो. दोन, श्रीमंत मध्यमवर्गी. ही पण कट्टर असतात. पण उघडपणे दाखवत नाही. निवडणूकीत सक्रिय असतात. तीन, ही सर्व मंडळी वैयक्तिक पातळीवर उग्रपणा करत नाही. यातील एक भाग हा “उजवी सायलेंट मेजॉरीटी” असते. ही अल्पसंख्यांकांना उगाचच त्रास देणार नाहीत. ख्रिश्चन प्रणालीप्रमाणे लोकांवर प्रेम करतात. मदत करतात. वर्तणुकीत आदर्श नागरिक असतात. पण निवडणुकीत अतिरेक्यांना मतं देतात.

माझा शेजारी, जो तो अत्यंत उजव्या विचारांचा. ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास नाही. सरकारी आरोग्य सेवा नको कारण सरकारवर विश्वास नाही. बेरोजगारी, गरिबी ही स्वतःच्या अपयशाने असते. त्यामुळे त्यांना बेरोजगार भत्ता का? गरिबांना सबसिडी का? पण आमचा चांगला मित्र. चिक्कार दारू पितो. गप्पा हणतो. रात्री अपरात्री उठून मदत करणारा. भाविक ख्रिश्चन. त्याच्या मुलीच्या लग्नात आम्हाला बोलावले होते. भारतासारखे गठ्ठ्याने आमंत्रण देत नाही. मोजके नातेवाईक आणि मित्र असतात. अशा लग्नात आमचे चार जणांचे ब्राऊन रंगाचे कुटुंब. बरेच पाहुणे बुचकुळ्यात पडून बघत होते. असो. जो हा हाडाचा रिपब्लिकन. त्यांना कायम मत देणारा. निवडणुकीत ट्रम्पला मत देणारा. निवडणुकीच्या काळात त्याच्या अंगणात ट्रम्पची पाटी आणि माझ्या अंगणात बायडनची पाटी.

अशी माणसे हृदयाने सच्चे असतात. पण स्वतःला फसवणारे असतात. त्यांना वाटते की मला गोरा नसलेला मित्र आहे. मी गरिबांना मदत करतो. परोपकारी आर्थिक मदत करतो. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला मत दिल्याची यांना मनाला टोचणी लागत नाही. पण उपयोग काही. हृदयात काहीही असू देत. पण शेवटी त्यांची करणी ही वंशवादाला, धार्मिक अतिरेक्यांना, गरिबांविरोधी आर्थिक व्यवस्थेला मदत होते.

पोलीस, सैन्य, नोकरशाही, न्यायाधीश अशी शासकीय मंडळी त्यांचे स्वातंत्र्य जपतात. कुणाचेही, राजकारणी किंवा पैसेवाले यांचे दडपण सहसा मानत नाहीत. न्यायी असतात. कायद्याच्या वर कुणीही नसते. ही अभिमानाची गोष्ट आहे. हे मी स्वतः मानतो. दुर्दैवाने हा उजवा दहशतवादी, वंशवादी विषाणू अगदी थोड्या प्रमाणात इथे घुसला आहे. काळ्या गोऱ्यांना वेगळी वागणूक मिळते. आपण नुकतेच पाहिले आहे की काळ्यांना आणि हिस्पॅनिकांना त्यांच्या लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणात अटक होते. रस्त्यावर अटक करताना संशय आला तरी गोळी मारण्यात येते. (पण हे लक्षात घ्या की भारताच्या तुलनेने हे प्रमाण जवळपास शून्य आहे). कॅपिटोलमध्ये जाताना प्रत्येकाची कसून तपासणी होते. गन जाणे शक्य नाही. तरी सुद्धा इथे सशस्त्र लोकं ६ जानेवारीला आत सहजपणे जातात. अगदी केक वॉक. पोलीस कमी होते परंतु सशस्त्र होते पण त्यांनी बंदुका वापरल्या नाहीत, गोळीबार केला नाही. नॅशनल गार्ड यायला दोन तास लागले. एक क्षणभर कल्पना करा हा मॉब ब्लॅक आहे. तर तिथे कत्तल घडली असती. मागील उन्हाळ्यात ब्लॅक लाईव्ह्स मॅटरची (BLM) याच कॅपिटोल समोर निदर्शने झाली. लोक निःशस्त्र होती. नॅशनल गार्ड आधीपासूनच तयार होते. शांततामय लोकांना व्यस्त प्रमाणात लाठीमार केला गेला.

ही जी घटना घडली तो हिमनगाचा दिसणारे टोक आहे. रस्त्यावर निदर्शने करणारी, रॅलीजमध्ये निदर्शने करणारी ही लाख लोक असतील. पण त्यांच्या मागे रिपब्लिकन पक्ष, पोलीस आणि वर म्हटलेली सायलेंट मेजॉरिटी आहे. रिपब्लिकन पक्षाचे आणि ह्या उजव्या अतिरेकी संघटनांचे संबंध म्हणजे गुप्त प्रेमाचे आहेत. किती अतिरेकी होता येईल हे रिपब्लिकन पक्ष या संघटनेच्या मार्फत चाचणी करतो. जो प्रचार उघडपणे करता येणार नाही तो या संघटनांच्या मार्फत होतो. गेली काही वर्षे ट्रम्प या संघटनांचे प्रतिनिधित्व करतो हे ओपन सिक्रेट आहे. रिपब्लिकन पक्ष या संबंधी गप्प बसले. नुकत्याच घडलेल्या कॅपिटोल प्रकरणात शेवटी गळ्याशी आल्यावर रिपब्लिक पक्षाने या संघटनांचा निषेध केला. या संघटनांची पाळेमुळे लोकांत किती पसरली आहेत हे या निवडणुकीत स्पष्ट दिसले आहे. अमेरिकेत मतदानाचे प्रमाण फार कमी असते. परंतु मागच्या निवडणुकीत अभूतपूर्व प्रचंड प्रमाणात मतदान झाले. ब्लॅक लाईव्ह्स मॅटरच्या (BLM) चळवळी वेळी दोन संघटनांच्यामध्ये ज्या चकमकी घडल्या, त्यामुळे दोन्ही बाजूंनी मतदानात भाग घेतला. डेमोक्रॅटिक पक्षाचे बायडन जिंकले, सेनेटमध्ये जागा वाढल्या. इलेक्टोरल कॉलेज किंवा सिनेट यांची मते स्टेटची एकत्र (ऍग्रेगेट) मते असतात. त्यात स्थानिक पातळीवर काय असते ह्याचा भाग नसतो. मात्र हाऊसच्या (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) मतदार संघातून स्थानिक पातळीवर काय झाले याची कल्पना येते. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हाऊसमधील जागा कमी झाल्या आहेत. हे लक्षणीय आहे. म्हणजे या अतिरेकी संघटनांच्या निवडणुकीतील वाढत्या सहभागाने रिपब्लिकनने हाऊसमध्ये सीट वाढवल्या आहेत.

उजव्या अतिरेकी संघटनांचा वाढत प्रभाव, ट्रम्प काळात झालेली त्यांची गतिमान वाढ आणि त्यांचा मागील निवडणुकीतील वाढलेला सहभाग यावरून असे दिसते की अमेरिकेतील जनतेचे रॅडिकलायझेशन वाढत जाणार आहे. याचा राजकीय पक्षांना त्याचा फायदा होतो. समाजाच्या ध्रुवीकरणाने समाजातील शांतता, एकता आणि बंधुत्व कमी होते. लोकशाहीची घसरण होते. या पेक्षाही खूप वाईट म्हणजे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या म्हणजे बेकारी, कमी होणारी मिळकत आणि समृद्धी, आरोग्य, शिक्षण अशा गोष्टी मागे पडतात. १% जनतेची मिळकत आणि संपत्ती वाढते. विकसित श्रीमंत राष्ट्रांत अमेरिकेची परिस्थिती गंभीर आहे.

अमेरिकेतील उजव्या अतिरेकी संघटनांची वाढ, तिचा कळस म्हणजे नुकताच झालेला कॅपिटोलवर झालेला हल्ला याची विस्तृत माहिती मीडियामध्ये आली आहे. घटनांमध्ये काय झाले, कुणी केले, का केले, कसे केले. हे सर्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यावर सेमिनारमध्ये बोलणे, वृत्तपत्रात लिहिणे अश्या गोष्टींवर एवढ्यावरच थांबणे म्हणजे फक्त बुद्धिमत्तेचे प्रदर्शन आहे. काय केले पाहिजे हेही महत्वाचे आहे. उदारमतवादी प्रातिनिधिक लोकशाहीत आपण प्रतिनिधी निवडून देतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो की ते जनतेचे कल्याण करतील. मात्र इतिहासात असे दिसते की हे प्रतिनिधी श्रीमंत (ऑलिगॉर्क) आणि भांडवलदार यांचे खेळणे बनतात. निवडणुकीचा खर्च प्रचंड असतो. तो ही लोकं पुरवतात. त्यात प्रतिनिधी हे सुद्धा श्रीमंत (ऑलिगॉर्क) आणि भांडवलदार यांच्या विचारसरणीचे असतात. त्यांना समाजाच्या ध्रुवीकरणाने निवडणुकीत मदत होते, आर्थिक प्रश्नांवरून लक्ष उडाल्याने मदत होते.

अशा परिस्थितीत लोकांकडे दोन मार्ग आहेत. एक, लोकांनी त्यांचे हित सांभाळणारे, ऑलिगॉर्कवर अवलंबून नसणारे प्रतिनिधी पाठवणे. त्यासाठी स्वतःहून पैसे जमवून आपल्या प्रतिनिधीला निवडणूक जिंकायला मदत करणे. अश्या प्रतिनिधींना ध्रुवीकरणाची गरज नसेल. त्यांना जनतेच्या आर्थिक प्रश्नात खरोखरचा रस असेल. बर्नी सँडर्स हा प्रयत्न करीत आहे. अजून डेमॉक्रॅटिक पक्षात हे अजून रुजलेले नाहीये. दोन, संसदीय लोकशाही ही मोठे बदल आपणहून करत नाही. त्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागते. इतिहास याला साक्ष आहे. ब्लॅक लाईव्ह्स मॅटरच्या (BLM) जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा या उजव्या अतिरेक्यांना चाप लागतो हे दिसले आहे. परंतु BLMला मर्यादा आहेत. ती एक कलमी आहे, काळे सोडून इतर घटक मोठ्या प्रमाणात नाहीत. याही पेक्षा मोठ्या समूहाला सामावून घेणारी आर्थिक प्रश्नांची जाण असलेली रस्त्यावर उतरणारी संघटना हवी. तीच या उजव्या संघटनांना चाप लावू शकेल.

COMMENTS