‘नमस्ते ट्रम्प’चे आयोजक कोण?

‘नमस्ते ट्रम्प’चे आयोजक कोण?

गूगलवर शोध घेतला असता गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या नावाचा उल्लेख करण्यापूर्वी ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ नावाच्या कोणत्याही संस्थेचा काहीही माग दिसत नाही.

ट्रम्प अहमदाबाद भेट : ४५ कुटुंबांना झोपड्या खाली करण्याचे आदेश
२५ वर्षे समाजासाठी खस्ता, मते फक्त १,२२४ मते?
अहमदाबादेतील व्हेंटिलेटरचे गौडबंगाल आणि भाजपचे लागेबांधे

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले, की गुजरातमधील ‘नमस्ते ट्रम्प’ या स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजक ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ नावाचा नव्याने तयार झालेला एक समूह आहे. हा समूह अचानक कुठून आला याबाबत काँग्रेसने प्रश्न उभे केले आहेत.

साप्ताहिक आढाव्यामध्ये, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, की ट्रम्प यांच्याकरिता मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ या नावाने जो स्वागतसमारंभ होणार आहे तो बराचसा ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमासारखाच असेल. मागच्या सप्टेंबरमध्ये मोदी आणि ट्रम्प हे ह्यूस्टन येथे ज्या कार्यक्रमात एकत्र आले होते त्याबाबतकुमार यांचे हे भाष्य होते.

ह्यूस्टन येथील कार्यक्रमात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षाचे नेते उपस्थित होते तसेच याही कार्यक्रमात विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाईल का या प्रश्नाबाबत रवीशकुमार यांनी थेट उत्तर दिले नाही, ते म्हणाले, हा प्रश्न आयोजकांना विचारला पाहिजे.

त्यानंतर त्यांनी सांगितले, की आयोजक गुजरात सरकार नसून एक नवीन खाजगी समूह आहे.

“’नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती आयोजित करत आहे. कुणाला आमंत्रित करायचे याबाबतचे सर्व निर्णय ही समिती घेत आहे,” ते म्हणाले.

तथापि, गूगलवर शोध घेतला असता गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या नावाचा उल्लेख करण्यापूर्वी ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ नावाच्या कोणत्याही संस्थेचा काहीही माग दिसत नाही. आत्तापर्यंत या संस्थेशी संबंधित कोणतीही वेबसाईट सापडली नाही, किंवा अगदी गुजरातमधीन प्रसारमाध्यमांमधूनही ही समिती कार्यक्रमाचे आयोजक आहे असा उल्लेख असणाऱ्या कोणत्याही बातम्याही मिळाल्या नाहीत.

‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम, त्याच्या वेबसाईटनुसारएका टेक्सस इंडिया फोरम नावाच्या संस्थेने आयोजित केला होता.

काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आर. एस. सुरजेवाला यांनी या समूहाचा उदय कसा झाला आणि त्याचे पदाधिकारी कोण असा प्रश्न विचारला. “गुजरात सरकार अशा अज्ञात खाजगी संस्थेद्वारे आयोजित ३ तासांच्या कार्यक्रमासाठी १२० कोटी रुपये का खर्च करत आहे?” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

एखादा समूह असा नव्याने तयार होणे हे काही नवे नाही असे म्हणत सूत्रांनी असा दावा केला की परदेशी नेत्यांच्या सार्वजनिक स्वागतसमारंभांमध्ये खाजगी समूह नेहमीच सामील असतात, फक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यांनी नेपाळ आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांची उदाहरणे दिली, जेव्हा भारतातील त्यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये नागरिकांनीही त्यांचे स्वागत केले होते. द इंडिया फाऊंडेशन ही संस्था २०१४ पासून बहुतांश वेळा अशा स्वागतसमारंभाचे आयोजक असते.

सूत्रांनी हेही सांगितले की समितीच्या पदाधिकाऱ्यांचे तपशील लवकरच जाहीर केले जातील.

अमेरिकेचे अध्यक्ष २४ फेब्रुवारी रोजी दुपारी अहमदाबाद येथे येतील आणि त्यानंतर एका मिरवणुकीतून मोटेरा स्टेडियमकडे जातील.

‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम अमेरिकन अध्यक्षांसाठी राजकीय व्यासपीठ म्हणून पाहिला जाईल का या प्रश्नावर उत्तर देताना कुमार म्हणाले, “मोदी आणि ट्रम्प यांचा हा एकत्रित कार्यक्रम थेटपणे कोणत्याही अंतर्गत राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्ही पूर्वीही असे सार्वजनिक कार्यक्रम केले आहेत, फक्त छोट्या प्रमाणात केले आहेत.”

सुमारे तीन तासांनंतर, अध्यक्षांचा लवाजमा आग्र्याकडे रवाना होईल. ते ४.३० वाजता आग्रा येथे पोहोचतील आणि सूर्यास्तापूर्वी ताजमहालच्या परिसरात फेरफटका मारतील.

दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनच्या समोरील प्रांगणात अधिकृत स्वागत समारंभ होईल.राजघाट येथे पुष्पचक्र अर्पण करून अमेरिकेचे अध्यक्ष औपचारिक चर्चांकरिता आणि करारांवर सह्या करिता हैद्राबाद हाऊस येथे जातील.

बुधवारी दिलेल्या बातमीप्रमाणे, कुमार यांनी अमेरिकेबरोबर कोणतेही लक्षणीय व्यापार करारांच्या शक्यता धूसर असल्याचे सांगितले. “आम्हाला घाईघाईने कोणताही करार करायचा नाही कारण अनेक निर्णयांचा लोकांच्या जीवनावर आणि दीर्घकालीन आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असल्यामुळे या सर्व गोष्टी जटिल आहेत. आम्हाला कृत्रिम मुदती घालून घ्यायच्या नाहीत,” ते म्हणाले.

या भेटीतून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतील असे विचारले असता कुमार म्हणाले, “ही भेट नात्यातील प्रगल्भतेचा विशिष्ट टप्पा गाठण्याच्या संदर्भात पाहिली पाहिजे. ही दोन लोकशाही राष्ट्रांच्या नेत्यांच्या नियमित भेटींपैकी एक आहे आणि ती आपल्या दोन देशांमधील सुसंवाद वाढत असल्याचे दर्शवते.”

कुमार म्हणाले, दोन्ही देशांमध्ये सहकार्याची क्षेत्रे वाढत असताना भारत हे संबंध आणखी दृढ होण्याची अपेक्षा करत आहे.“त्यामुळे सामायिक हितसंबंधांच्या बाबतीत प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील समस्यांवर मतांची देवाणघेवाण करण्याचीही संधी मिळेल. एकंदर पाहता आपली जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल,” असेही ते म्हणाले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0