हाथरस घटनेने व्यथित २३६ जणांचा बौद्ध धर्म प्रवेश

हाथरस घटनेने व्यथित २३६ जणांचा बौद्ध धर्म प्रवेश

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्य प्रशासनाने ज्या पद्धतीने हा विषय हाताळला त्याचा निषेध करत गाजियाबादनजीक करहैडा गावातील २३६ दलितांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोमवारी हे धर्मांतर झाले.

हाथरस घटनेनंतर दलित व उच्चवर्णिय असा भेदभाव दिसून आला होता. गाजियाबादमध्ये एका घरात मदतनीस म्हणून काम करणार्या सुनीता (४५) यांना त्या दलित असल्याने त्यांना पिण्याचे पाणी वेगळ्या पेल्यातून देण्याची घटना घडली. त्या म्हणाल्या, माझा पेला स्वयंपाक घरात वेगळा ठेवला जायचा. मी वाल्मिकी समाजाची असल्याने मी ज्या घरात काम करते तेथे मला अशीच वागणूक दिली जाते.

२००९मध्ये सुनीता यांचा मोठा मुलगा पवन एका आलिशान अपार्टमेंटमध्ये नोकरीसाठी गेला होता पण ते वाल्मिकी समाजाचे असल्याचे कळल्याने त्यांना साफसफाईचे काम देण्यात आले. पवन यांनी नोकरीच्या अर्जात साफसफाई उल्लेख केला नव्हता पण त्यांना पैशाची निकड होती. त्यामुळे साफसफाईचे काम स्वीकारावे लागले. सामाजिक भेदभाव आम्ही अनुभवलाय आमच्या अनेक पिढ्यांनी अनुभवलाय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भविष्यात आपल्या दोन मुलांना भेदभावाचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबरला बौद्ध धर्मात समावेश केला, असे त्यांनी सांगितले.

बौद्ध धर्म स्वीकारण्यात दिल्लीतील शाहदरा भागात मॅकेनिकचे काम करणारे इंदर राम (६५) हेही आहेत. त्यांनी हाथरसच्या घटनेनंतर अत्यंत उद्वेगातून आपला धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धर्मात कोणत्याही जाती नाहीत. तेथे ठाकूर वा वाल्मिकी नाहीत. तेथे फक्त माणूस नावाची जात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लॉकडाऊनच्या अगोदर कचरा गोळा करण्याचे काम करणारे कमलेश (५०) यांनी हाथरस घटनेनंतर बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्धार केला. अन्य कोणतेही धर्म स्वीकारणे सोपे नाही. जुन्या रितीपरंपरा सोडल्या जात नाहीत, त्याला आम्ही कंटाळलो आहोत. आता आम्ही वाल्मिकी नाही तर बौद्ध आहोत असे कमलेश म्हणाले.

सफाई कर्मचारी तारा चंद (७०) यांनीही बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्मात कोणताही उपवास केला जात नाही. मूर्तीपूजन केले जात नाही. माझ्या वडिलांशी भेदभाव केला गेला, माझ्यासोबतही असेच झाले. माझ्या मुलांशी व नातवांशीही तेच सुरू आहे. हा भेदभाव संपणार कधी, आपण केव्हा प्रगती करणार, असे सवाल त्यांनी केले.

त्यांचे एक मित्र श्रीचंद (७०) यांनी, या देशात रोज दलितांवर अत्याचार केले जात आहेत. आमच्या मुलांच्या मनात यामुळे भय निर्माण झाले आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मूळ बातमी

COMMENTS