रात्रीत बदल : शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता

रात्रीत बदल : शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजपने दुपारी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांना बसवल्यानंतर रात्री उशिरा शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे गटालाच मान्यता दिल्याचे स्पष्ट झाले.

रात्री उशिरा महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना पत्र दिले. शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती रद्द केली असून, सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून मान्यता रद्द करून भरत गोगवले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

शिवसेनेने २२ जूनला अजय चौधरी यांना गटनेतेपदी आणि सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून नियुक्त केल्याचे पत्र विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले होते. त्याला झिरवळ यांनी मान्यता दिली होती. ती मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटालाच शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता दिल्याचे दिसत आहे.

विधिमंडळ सचिवालयाच्या या कारवाईला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. हा लोकशाहीचा खून असल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे. देश हुकूमशाहीकडे चालल्याची टीका शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केली. या कारवाईला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असे सांवत म्हणाले.

उद्या  विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाने व्हीप बजावल्यास त्यानुसार मतदान न केल्यास मूळ शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची कारवाई होऊ शकते.

रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्याने, न्यायालयात जाण्यासाठी वेळ मिळू नये, असा हेतू असल्याचे जाणकारांचे मत आहे.

COMMENTS