चिदंबरम २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत

चिदंबरम २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना विशेष सीबीआय न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आह

सह्याद्री आणि हिमालय…!
निवडणूक पालिकेची, प्रचारात राष्ट्रीय नेते!
प्रसिद्ध गायक टीएम कृष्णा, सिद्धार्थसहित ६०० जणांवर गुन्हे

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना विशेष सीबीआय न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

बुधवारी रात्री मोठ्या नाट्यानंतर चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते व नंतर त्यांची रवानगी सीबीआय मुख्यालयात केली होती. गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयात चिदंबरम यांना आणण्यात आले. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आयएनएक्स मीडिया घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून या प्रकरणाचे कट कारस्थान खणून काढण्यासाठी चिदंबरम यांची चौकशी करणे गरजेचे आहे पण ते सीबीआयला मदत करत नसून त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांना सीबीआय कोठडी मिळणे गरजेचे आहे, असे न्यायालयाला सांगितले.

यावर चिदंबरम यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी आयएनएक्स प्रकरणात आरोपी हा कार्ती चिदंबरम असून त्यांना नुकताच जामीन मिळालेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील आणखी आरोपी  चार्टर्ड अकाउंटंट भास्कर रामन यांना जामीन मिळाला आहे तसेच पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी यांनाही जामीन मिळालेला असल्याने चिदंबरम यांना सीबीआय कोठडीत ठेवण्याची सरकारची मागणी गैर असल्याचा युक्तिवाद केला.

या प्रकरणातील पहिली फिर्याद १० वर्षांपूर्वी नोंद झाली होती व चिदंबरम यांनी आपली चौकशी कधीही चुकवलेली नाही, असे सिबल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांना १२ प्रश्न विचारले होते त्यापैकी सहा प्रश्नांची उत्तरे चिदंबरम यांनी यापूर्वीच दिलेली आहेत. तपास यंत्रणांना कोणते प्रश्न विचारायचे आहेत ते माहीत नसल्याचे सिबल यांनी न्यायालयास सांगितले.

चिदंबरम यांची बाजू ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंघवी यांनीसुद्धा मांडली. ते म्हणाले, आयएनएक्स प्रकरणात इंद्राणी मुखर्जी यांची जी साक्ष सीबीआयने घेतली आहे त्यावर हे सगळे प्रकरण उभे केले गेले आहे. इंद्राणी मुखर्जी यांना सरकारी साक्षीदार म्हणून उभे करण्यात आले आहे. पण या प्रकरणात चिदंबरम यांनी कोणतेही पुरावे नष्ट केलेले नाहीत व तसे सीबीआयने म्हटलेलेही नाही. त्यामुळे या प्रकरणात काहीच घडलेले नसल्याने चिदंबरम यांना परिस्थितीजन्य माहितीवर जामीन द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

यावर सॉलिसिटर तुषार मेहता, यांनी कायद्यापुढे सर्व समान असतात, असे सांगत चिदंबरम हे अत्यंत हुशार असून त्यांच्याकडे सहकार्य न करण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यांच्याकडे त्यांची बाजू मांडणारे सर्व वकील निष्णात आहेत. त्यामुळे या विषयाच्या खोलात शिरायचे असल्यास चिदंबरम यांना कोठडी देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: