पद्मश्री मिळूनही हाताला काम नाही : दैतारी नायक यांची खंत

पद्मश्री मिळूनही हाताला काम नाही : दैतारी नायक यांची खंत

पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या हाताला आता काम मिळणे बंद झाले. आणि काम नसल्याने किड्या-मुंग्यांची अंडी खाण्याची वेळ त्यांच्यावर आली.

गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार
आसाम पीपीई घोटाळा: मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना किट्सच्या ऑर्डर
गरोदर भारतीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

भुवनेश्वर : काही महिन्यांपूर्वी ओदिशातील केओनझार जिल्ह्यातील खनिज संपन्न तालबैरणी गाव चर्चेत आले ते आदिवासी शेतकरी दैतारी नायक यांच्या श्रमाने. ७५ वर्षांच्या दैतारी नायक यांनी २०१० ते २०१३ या तीन वर्षांत गावानजीक एक डोंगर पोखरून सुमारे तीन किमी लांबीचा एक कालवा तयार केला आणि या कालव्याद्वारे आसपासची सुमारे १०० एकर जमीन सिंचनाखाली आणली.

तालबैरणी गाव खनिजसंपन्न असले तरी गावात दशकानुदशके पाण्याची तीव्र टंचाई होती. त्यामुळे शेतीतून उत्पन्न कमीच मिळे. या परिसराला पाण्यासाठी पावसाळ्याची प्रतिक्षा करावी लागे. हे प्रश्न लक्षात घेऊन दैतारी नायक यांनी आपल्या गावची जमीन सुपीक असावी या ध्यासातून तीन वर्षे अहोरात्र काम केले आणि कालवा खोदला.

दैतारी नायक यांच्या अविश्वसनीय कार्याने सर्वजण थक्क झाले होते. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गेल्या मार्चमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्य बदलेल असे दैतारी यांना वाटले होते. पण दुर्दैव असे की, पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या हाताला आता काम मिळणे बंद झाले. आणि काम नसल्याने किड्या-मुंग्यांची अंडी खाण्याची वेळ त्यांच्यावर आली.

सरकारने आपल्याला पुरस्कार दिला खरा पण माझे इतके हाल वाईट आहेत की हा पुरस्कार विकण्याचे माझ्या मनात येत असल्याचे दैतारी सांगतात. मला पद्मश्री पुरस्कार मिळाला पण त्याने मला गरीबीत ढकलले. पुरस्कार मिळण्यापूर्वी मी दैनंदिन रोजगारावर मजूर म्हणून काम करत होतो. पण लोक आता तुम्हाला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने काम करणे योग्य दिसत नाही म्हणून कामच देण्याचे टाळतात असे दैतारी यांनी सांगितले. जगण्याला आवश्यक असणारी रोजीरोटीच मिळत नसल्याने किड्यामुंग्यांची अंडी खाऊन जगत असल्याची खंत दैतारी बोलून दाखवतात.

हाताला काहीच काम नसल्याने दैतारी सध्या तेंदूची पाने व आंब्याचे पापड विकण्याचे काम करतात. त्यांना ७०० रुपयाची पेन्शनही आहे पण त्यातून कुटुंब चालवणे अशक्य झाले आहे. काही दिवसांपूर्वी दैतारी यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घर मिळाले होते पण ते अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे ते त्यांच्या पूर्वीच्या जीर्ण झोपडीत राहतात.

दैतारी यांचा मुलगा आलेख मजूर म्हणून काम करतो. आपल्या वडिलांचे कार्य तो वेगळ्या शब्दांत सांगतो. ओरिसात नव्या रस्त्यांच्या बांधणीमु‌ळे अनेक कालव्यांचे नुकसान झाले आहे आणि त्याने दुर्गम भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आपल्या लोकांना पिण्याचे पाणी व तेही शुद्ध मिळावे अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे पण ती पूर्ण होऊ शकत नसल्याने ते चिंतेत आहे असे आलेख सांगतो.

दैतारी नायक यांची कैफियत ऐकल्यानंतर क्योएंझार जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्ह्याचे कलेक्टर आशीष ठाकरे यांनी दैतारी यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे व त्यांनी पुरस्कार परत करू नये म्हणून विनंतीही करू असे सांगितले आहे.

 

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0