मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा

मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती व लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ (७६) यांना मंगळवारी पेशावर उच्च न्यायालयाने पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मुशर्रफ यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर पेशावर उच्च न्यायालयात २-१ असा निवाडा झाला.

२००७मध्ये परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानची राज्यघटना हटवून तेथे आणीबाणी लागू केली होती. त्याचबरोबर पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांसह अन्य न्यायाधीशांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी मुशर्रफ यांच्यावर २०१४ साली खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल मंगळवारी लागला. मुशर्रफ सध्या दुबईत उपचारासाठी गेले आहेत.

२००७मध्ये देशात आणीबाणी लागू केल्यानंतर ४२ दिवसानंतर मुशर्रफ यांनी आणीबाणी मागे घेतली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर महाभियोग प्रक्रिया सुरू केल्यानंतर एक वर्षांत मुशर्रफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मुशर्रफ यांनी आणीबाणीचे समर्थन करताना पाकिस्तानातील न्याययंत्रणेतील काही न्यायाधीश कार्यकारी मंडळाच्या विरोधात कारवाया करत असल्याचा आरोप केला होता.

२००९मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ यांच्या आणीबाणीच्या निर्णयाला घटनाबाह्य ठरवले होते व त्यांना आपला बचाव करण्याची एक संधी दिली होती. पण त्यावेळी मुशर्रफ देशाबाहेर पळून गेले होते. ते ब्रिटनमध्ये पाच वर्षे राहात होते. नंतर २०१३मध्ये त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू करण्यात आला होता. २०१४मध्ये मुशर्रफ पाकिस्तानात पुन्हा आले व त्यांनी सार्वत्रिक निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत व आपण निर्दोष असल्याचा बचावही सर्वोच्च न्यायालयात केला होता.

२०१६मध्ये ते दुबईमध्ये उपचारासाठी गेले होते व काही दिवसांतच आपण पुन्हा पाकिस्तानात येऊ असे आश्वासन त्यांनी सरकारला दिले होते. पण ते एका महिन्यात देशात परत न आल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते.

मूळ बातमी

COMMENTS