पाक लष्करप्रमुखांचा वाढीव कार्यकाल रोखला

पाक लष्करप्रमुखांचा वाढीव कार्यकाल रोखला

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाल तीन वर्षांनी वाढवण्याचा इम्रान खान सरकारच्या निर्णयाला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे राजकीय अडचणीत आलेल्या इम्रान खान सरकारने आपल्या मंत्रिमंडळाची तत्काळ बैठक घेत बाजवा यांच्या मुदतवाढीसंदर्भात काढलेली अधिसूचना मागे घेतली आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात क्षेत्रीय सुरक्षिततेचे कारण देऊन पंतप्रधान इम्रान खान यांनी बाजवा यांना लष्करप्रमुखपदी राहण्यासाठी आणखी तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती, आणि तशी अधिसूचना काढली होती.

बाजवा येत्या २९ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते पण त्यांच्या सेवा मुदतवाढीविरोधात रईज राही या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर बुधवारी निर्णय देताना न्यायालयाने, बाजवा यांना मुदतवाढ देण्याचा अधिसूचनेवर मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली नव्हती. त्यामुळे नियमांचे पालन न झाल्याचा ठपका ठेवला. लष्करप्रमुखांच्या सेवेची मुदतवाढ करताना मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन पुढे हा प्रस्ताव पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या सल्ल्याकडे जातो अशी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया उलट्या क्रमाने करण्यात आली असे न्यायालयाने म्हटले.

२०१६मध्ये तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या काळात बाजवा यांना लष्करप्रमुखपदी नेमण्यात आले होते.

२०१०मध्ये तत्कालिन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या सल्ल्याने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी असलेल्या जनरल अशफाक परवेज कयानी यांचा कार्यकाल तीन वर्षांनी वाढवला होता. त्यानंतर इम्रान खान सरकारने हा प्रयत्न केला.

मूळ बातमी

COMMENTS