हिंदू मंदिरावरील हल्ले; पाकिस्तानात अल्पसंख्याक भयभीत

हिंदू मंदिरावरील हल्ले; पाकिस्तानात अल्पसंख्याक भयभीत

कराचीः पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात भोंग येथे एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्याची दखल पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने घेतली असली आणि न्यायालयाने स्थान

जम्मू-काश्मीर, उ. प्रदेश, म. प्रदेशात पत्रकारांवर अधिक हल्ले
आर्थिक त्सुनामीसाठी सज्ज राहा – राहुल गांधी
ट्रम्प यांचा दौरा आटोपला, सीएएवर भाष्य नाही

कराचीः पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात भोंग येथे एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्याची दखल पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने घेतली असली आणि न्यायालयाने स्थानिक पोलिसांवर अशा घटना रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला असला तरी पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजामध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

४ ऑगस्टला पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग येथील गणेश मंदिरात सुमारे अडीचशे जणांचा जमाव घुसला व त्यांनी मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. एवढेच नव्हे तर या गावातील राहणार्या काही हिंदू कुटुंबांना गाव सोडून जाण्यास या जमावाने प्रवृत्त केले.

एका स्थानिक हिंदू लहान मुलाने मदरशाचा अवमान केला, म्हणून जमाव खवळला असे सांगितले जाते.  पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. पण या मुलाला नंतर जामीनावर सोडल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

भोंग येथील हिंदू मंदिरावरचा हल्ला हा गेल्या १८ महिन्यात अनेक मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांपैकी एक घटना आहे. गेल्या दीड पावणेदोन वर्षांत पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याकाविरोधात कट्टरतावादी अधिक आक्रमक झाले असून अशा सातत्याने घडणार्या घटना पाकिस्तानातील धर्मांधता व असहिष्णुता वाढत असल्याचे लक्षण असल्याचे मत पाकिस्तानातील एक प्रसिद्ध स्तंभकार व माजी लोकप्रतिनिधी अफ्रसैब खट्टक यांनी व्यक्त केले.

तर असे हल्ले वाढत गेले तर धर्मांधतेचा जो आगडोंब उसळेल त्यात आपण सर्वच जण होरपळून जाऊ अशी भीती पाकिस्तान हिंदू पंचायतचे सरचिटणीस रवी दावानी यांनी व्यक्त केली आहे.

नेमके काय घडले?

४ जुलै २०२१मध्ये ८ वर्षांचा एक हिंदू मुलगा मशिदीला लागून असलेल्या एका मदरशामध्ये अनाहूतपणे गेला आणि ते मौलवी हफीज मोहम्मद इब्राहिम यांनी पाहिले. आपल्याला पाहिल्यामुळे त्या मुलाने घाबरून लघवी केली असे सांगितले जात आहे. झालेल्या घटनेबद्दल त्या मुलाच्या वडिलांनी मुस्लिम समुदायाची माफी मागितली. आपला मुलगा गतीमंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

पण दुसर्या दिवशी त्या लहान मुलाच्या विरोधात मौलवींनी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली. मात्र तो मुलगा अल्पवयीन असल्याने अशी फिर्याद दाखल करणे मानवाधिकाराचा भंग ठरला.

या मुलाला पोलिसांनी अटक केली की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

पुढे २८ जुलैला स्थानिक न्यायालयाने मुलाला तो अल्पवयीन असल्याने जामीन दिला.

नंतर अब्दुल रझाक सोमरू या व्यक्तीने या घटनेबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यानंतर ४ ऑगस्टला त्या गावाजवळून जाणार्या महामार्गावर जमाव जमला व त्याने गावातले गणेश मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

या तोडफोडीचा व्हीडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. या व्हीडिओत मंदिराची मोठ्या प्रमाणात जमावाकडून तोडफोड, नासधूस केली जात असल्याचे दिसून येते. या घटनेला धर्मांधतेचा स्वरुप येत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले व परिस्थितीवर नियंत्रण आणले.

पाकिस्तानातले अल्पसंख्याक भयभीत

तहरीक-इ-इन्साफ व पाकिस्तान संसदेतील मानवाधिकार समितीचे सरचिटणीस लाल चंद मल्ही यांनी पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ही घटना चिघळली असा आरोप केला. भोंगमधील घटना वेळीच आवरता आली असती, जमाव महामार्गावर उतरून हिंदूंविरोधात निदर्शने, घोषणाबाजी करत होता, त्याकडे पोलिसांनी डोळेझाक केले असे त्यांचे म्हणणे आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर ६ ऑगस्टला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर या प्रकरणातील बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला. अल्पवयीन मुलावर फिर्याद दाखल करण्याची पोलिसांची कृती व जमावाला न रोखल्यामुळे न्यायालयाने पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असली तरी पाकिस्तानातील हिंदू व अन्य अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. पंजाब प्रांतातील एकाही मंत्र्याने भोंग गावाचा दौरा केलेला नाही. मिली याकजेहती परिषद व त्यांच्याशी संलग्न २२ धार्मिक संघटनांनी मंदिराच्या तोडफोडीचा साधा निषेधही केलेला नाही.

गेल्या १८ महिन्यात केवळ हिंदूच नव्हे तर पाकिस्तानातील ख्रिश्चन, अहमदी, हजारा व शिया धर्मिय यांच्यावर वरचेवर हल्ले केले जात आहेत. काही ठिकाणी सक्तीने धर्मांतरणही केले जात आहे. शिया-सुन्नी वाद पुन्हा पेटू लागला आहे.

एक उदाहरण द्यायचे झाल्यास सिंधमधील थारपारकर येथे २६ जुलै २०२१मध्ये एक घटना घडली. येथील थर कोळसा प्रकल्पात काम करणार्या एका हिंदू मुलाला अब्दुल सलाम अबू दाऊद याने अल्ला हू अकबरच्या घोषणा देण्यास लावल्या व काही हिंदू देवतांना उद्देशून अपशब्द वापरले.

या घटनेनंतर दाऊदला अटक करण्यात आले. त्याने झालेल्या प्रकरणाची माफीही मागितली. पण या घटनेनंतर आम्हा हिंदू समाजात भीतीचे वातावरण पसरल्याचे मल्ही यांनी सांगितले. आमचा समाज हिंसेला हिंसेने उत्तर देत नाही, आमचा समाज शांतता जपणारा असल्याचे त्यांनी सांगितले. भोंग येथील घटना नेमकी काय झाली याबद्दलही स्पष्टता नाही, असेही त्यांचे म्हणणे होते.

ज्या भोंग येथे गणेश मंदिराची तोडफोड केली, त्याच गावात जमावाने एका शिया इमामबरगाहची तोडफोड केल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. या घटनेनंतर शिया समाजातही संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे.

८ मंदिरांवर हल्ले

गेल्या १८ महिन्यात पाकिस्तानात ८ हिंदू मंदिरावर हल्ले झाले आहेत. २६ जानेवारी २०२०मध्ये सिंधमधील छाचरू येथे माता राणी मंदिरावर हल्ला झाला. ४ जुलै २०२०मध्ये इस्लामाबादमध्ये कृष्ण मंदिरावर हल्ला झाला. १७ जुलै २०२०मध्ये सिंधमध्ये ल्यारी येथे हनुमान मंदिरावर, १० ऑक्टोबर २०२०मध्ये सिंधमधील करिओ घानवर येथे श्री राम देव मंदिरावर, २४ ऑक्टोबर २०२०मध्ये सिंधमधील नागारपारकर येथे माता रानी भातीयानी मंदिरावर, ३० डिसेंबर २०२०मध्ये खैबर पख्तुनख्वा येथे तेरी मंदिरावर, २८ मार्च २०२१मध्ये रावळपिंडी येथे सुमारे १०० वर्षे जुन्या मंदिरावर आणि आता ४ ऑगस्टला गणेश मंदिरावर हल्ले झाले आहेत.

या ८ हल्ल्यांपैकी केवळ २ हल्ल्यांची – तेरी मंदिर व भोंगमधील गणेश मंदिर- राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली आहे. अन्य ६ हल्ल्यांची कुणाला फारशीही माहिती नाही.

सर्वोच्च न्यायालयाने भोंग घटनेबाबत पोलिसांनी १३ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहेत. पोलिसांनी या घटनेसंदर्भात कोणतीही माहिती उघड केलेली नाही.

मूळ बातमी

विनगास या पाकिस्तानस्थित पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0