महासंकट आणि हॉलीवूड

महासंकट आणि हॉलीवूड

जीवाणू वा विषाणूच्या संसर्गाने मानवजात ‘न भूतो ना भविष्यती’ अशा संकटात सापडली आहे हा हॉलीवूड चित्रपटांचा आवडीचा विषय. अशाच काही गाजलेल्या चित्रपटांची ओळख करून देणारा लेख.

कोरोनाः मजुरांच्या जप्त सायकली विकून २३ लाख कमावले
कोविडमुळे अनाथ बालकांना राज्याचे ५ लाखांचे अर्थसहाय्य
मुंबईत कोरोनाचा विस्फोटः २०,१८१ नवे रुग्ण आढळले

‘हात स्वच्छ धुवा’ हा संदेश करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कानावर पडत आहे. या सोप्या वाटणाऱ्या संदेशाचाही एक इतिहास आहे. १९३८ चा ऑस्कर पुरस्कार ‘दॅट मदर्स माइट लिव्ह’ या शॉर्ट फिल्मला मिळाला. ही फिल्म इग्नस सेमाल्वाईस या हंगेरीच्या डॉक्टरवर आधारित आहे, ज्याला ‘हात स्वच्छ धुवा’ हा संदेश देण्यासाठी छळ सहन करावा लागला.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या साथीने जगभर हाहाकार माजला आहे. भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून आहेत. मालिकांचे नवे एपिसोड्स, नवे चित्रपट सर्वच बंद आहे. अशावेळी ‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप मीडिया सर्विस’ हे मोठ्या प्रमाणात करमणुकीचं साधन ठरत आहे. या ‘ओटीटी’मध्ये सर्वांत अग्रेसर आहेत ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अॅमेझॉन प्राइम’. याशिवाय ‘झी स्टुडिओ’, ‘आयडिया मुव्हीज’, ‘मॅक्स प्लेअर’, ‘मुबी’ सुद्धा उपलब्ध आहेत. या सर्व ऑनलाईन माध्यमांवर सध्या महासाथीशी संबंधित चित्रपटांनी धुमाकुळ माजवला आहे.

महासाथीवर आधारीत चित्रपट हे विषाणूची लागण, प्रसार, मृत्य, लुटमार, भ्रष्टाचार, पॅनिक अशा नकारात्मक घटकांनी भरलेले असतात. आधीच घरी बसून नैराश्य, चिडचिड आणि विचित्र मानसिक अवस्था असताना असे चित्रपट पाहून पुन्हा ताप करून घेण्यास अनेकांचा नकार असेल. खरं आहे. हा धोका आहेच. पण करमणुकीचं साधन म्हणून जर अशा चित्रपटांकडं आपण पाहिलं , तर सोबत बरीच माहिती मिळू शकते आणि सध्याच्या परिस्थितीमागील गंभीरता लक्षात घेऊन वागण्यात अधिक जबाबदारपणा येऊ शकतो.

महासाथीवर आधारित चित्रपटांचे काही गुण दोष असतात शिवाय अनेक मर्यादाही असतात. कारण साथीचे रोग पसरल्यास उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग केले जाते. त्यामुळे एकटेपणा, नैराश्य, अमर्याद पोकळी आणि स्वतः स्वतःलाच सहन करत राहण्याचा जाच ही अवस्था अपरिहार्य असते. या अवस्था ‘हॅपनिंग’ नसतात. त्यांच्यात गती नसते. ही लक्षणं चित्रपटात प्रभावीपणे दाखवली तर चित्रपटाची गती कमी होते. अर्थात या प्रत्येक अंगांवर स्वतंत्र चित्रपट बनू शकतो किंवा सकारात्मक प्रेरणादायी कथाही निर्माण होऊ शकते. पण या सर्वच विषयांत गती कमी असणं आलचं. त्यामुळेच मग ‘झोंबी’ या विषाणू बाधित काल्पानिक म्युटंटचा आधार घेतला जातो. महासाथींवर अॅक्शनपट केला तर सत्य परिस्थितीशी नाळ गमावून बसण्याचा धोका असतो (उदा. ‘पँडेमिक’ हा चित्रपट.) कॉमेडी किंवा हलका पुलका चित्रपट बनवला (उदा. ‘द होस्ट’) तर त्यातील गंभीर आशय दुर्लक्षित होण्याची भीती असते. ‘झोंबीलँड’ सारखे चित्रपट करमणूक म्हणून ठीक असतात पण भविष्याशी त्यांची नाळ जोडण्यास प्रेक्षक तय्यार नसतो. एकंदरीत काय तर सत्य परिस्थितीत मंदावलेली अपरिहार्य गती मोठ्या पडद्यावर नीट दाखवता न येणे ही सर्वांत मोठी अडचण असते. अनेक चित्रपटांचा शेवट नकारात्मक असतो. पण काही चित्रपट हे आशावादावर सुद्धा आधारलेले असतात. ( उदा. ‘28 वीक्स’, ‘28 मंथ्स लॅटर’, ‘द ओमेगा मॅन’, इत्यादी)

महासाथीवर सर्व प्रथम आलेला चित्रपट म्हणजे १९३९ चा ‘पॅसिफीक लायनर’. कॉलरा झालेला एक माणूस सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या जहाजात चढतो आणि जहाजात बक्टेरियाचा फैलाव होतो. जहाजावर असलेल्या डॉक्टरला हे समजतं आणि तो विलगीकरण(quarantine) करण्यास सांगतो. पण जहाजावरील काही लोक त्याला विरोध करतात. डॉक्टर विरुद्ध सामान्य माणूस असा हा सिनेमा आहे. मात्र २०११ मध्ये आलेला ‘कंटॅजन’ हा चित्रपट सध्याच्या कोरोना संदर्भातील घटनांशी सर्वांत अधिक जुळणारा आहे. हाँगकाँगला गेलेल्या एका महिलेला कुठल्याशा नव्या विषाणूची लागण होते आणि तो अफाट वेगानं पसरत जातो. वर नमूद केलेल्या दोन्ही चित्रपटांचं वैशिष्ट्य असं की महासाथीवर आधारित सर्व चित्रपटांची तुलना करता या दोन चित्रपटांत बॅक्टेरिया किंवा विषाणूचा फैलाव कसा होतो, त्याला मनुष्य कसा प्रतिसाद देतो आणि डॉक्टरची लढाई कशी कठीण होत जाते हे ठळकपणे दाखवले आहे जे सद्यपरिस्थितीशी तंतोतंत जुळतं. त्यामुळेच ‘कंटॅजन’ सध्या सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरत आहे. शिवाय विषाणू कोणता आहे? त्याचं उगमस्थान कोणत? हे कसं ठरवलं जात? हे या चित्रपटातून कळतं.

मात्र या चित्रपटातही मेख आहेच. हवेतून पसरणारा हा विषाणू असतानाही डॉक्टर आणि संशोधक मास्क न लावता फिरताना दिसतात. त्यामुळेच मध्यावतीत महत्त्वाच्या डॉक्टरचा विषाणू संसर्गानं मृत्यू होतो. संसर्ग झालेल्या रुग्णाचा हात कुठेही लागून विषाणू पसरू शकतो हे माहीत असूनही संशोधक मुक्तपणे हात मिळवतात. प्रेक्षकाला हे खटकत राहतं कारण सध्या तो स्वत:ला त्या चित्रपटात पाहू शकतो, हा खरं तर सद्य परिस्थितीचाच परिणाम म्हणावा लागेल.

रिचर्ड मॅथ्सनच्या ‘आय अॅम द लिजंड’ या कादंबरीवर आधारित तीन चित्रपट येऊन गेले. १९६४ चा ‘लास्ट मॅन ऑन अर्थ’, १९७१ चा ‘द ओमेगा मॅन’ आणि २००७ चा ब्लॉकबस्टर हिट ‘आय अॅम द लिजंड’ ज्यात विल स्मिथ मुख्य भूमिकेत होता. यांपैकी ‘लास्ट मॅन ऑन अर्थ’ हा चित्रपट सर्वांत उत्तम मानला जातो. एकटाच वाचलेला हिरो दिवसा संसर्ग झालेल्या झोंबी सदृश्य लोकांना मारतो आणि रात्री त्यांच्यापासून लपतो. एकाकी माणसाचं चित्रण करणारे हे चित्रपट नेणिवेलाच हादरा देऊन जातात.

जॉर्ज रोमेरोनं १९६८ ते २००९ दरम्यान महासाथ आणि झोंबी या विषयाशी संबंधित ५ चित्रपट बनवले. त्याचा १९६८चा ‘नाईट ऑफ द लिव्हिंग डेड’ हा सिनेमा कल्ट क्लासिक मानला जातो. १९७३ मध्ये ‘द क्रेझिज’ हा सिनेमा आला. विलगीकरणाच्या प्रक्रियेत सरकारी यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील तणाव ही या चित्रपटाची मुख्य कथा आहे. एक लष्करी विमान जैविक शस्त्रास्त्र नेत असताना अपघातात एका तळ्यात पडते आणि पाण्यातून आसपासच्या गावात विषाणूचा संसर्ग पसरतो. तो थांबवण्यासाठी म्हणून सरकार रुग्णांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देते आणि रुग्णांना स्वत:चा जीव वाचविण्यासाठी दुहेरी संघर्ष करावा लागतो.

१९९५ मध्ये आलेला ‘आऊटब्रेक’ हा सिनेमा म्हणजे महासाथीचे संपूर्ण हॉलिवूडीकरण आहे. रिचर्ड प्रेस्टनच्या ‘द हॉट झोन’ या सत्यघटनांवर आधारित पुस्तकावर हा चित्रपट असला तरी क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली अनेक बदल मूळ कथेत करण्यात आले. त्यामुळे हा चित्रपट विश्वासार्हता गमावून बसला. आफ्रिकेतील झैरे देशातून कॅलिफोर्नियात आलेल्या एका माकडापासून मोताबा नावाचा आजार पसरत जातो. मार्शल लॉ लावल्यानं होणाऱ्या परिस्थितीचं वर्णन यात आहे. याच वर्षी ‘ट्वेल्व्ह मंकीज्’ हा साय-फायपट सुद्धा आला. यात २०३५ मध्ये जवळपास सगळीच मानवजात संसर्गामुळे नष्ट झाली आहे. काही शास्त्रज्ञ टाइम मशीनने मागे जाऊन विषाणूचं उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न करताना दाखविलेलं आहे. हा चित्रपट निर्मितीच्या सर्व अंगांनी उत्तम बनला आहे. ब्रॅड पिट या अभिनेत्याला पहिलं ऑस्कर नामांकन याच चित्रपटासाठी मिळालं होतं. (हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहता येईल.)

२०१९-२०२० हे वर्ष द कोरियाच्या ‘पॅरासाईट’ने गाजवलं. दिग्दर्शक बाँग जून हो चा ‘द होस्ट’ हा चित्रपट २००६ सालीच आला होता. मनुष्याची लालसा त्याला एक दिवस संपवेल असा संदेश देणारा हा चित्रपट. अमेरिकी शास्त्रज्ञ काही रसायने कोरियाच्या नदीत फेकतात. त्यातून काही कालावधीनंतर म्युटंट जन्मास येतो ज्याच्या शरीरात एक विषाणू देखील असतो. दिग्दर्शक बाँग जून हो ने ‘पॅरासाईट’ प्रमाणेच या चित्रपटातदेखील अप्रत्यक्षपणे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केलेले आहे. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे. H5N1 या विषाणू संसर्गावर आधारित ‘द फ्लू’ हा आणखी एक कोरिअन चित्रपट देखील पाहण्यासारखा आहे.
२०१९मध्ये आलेला ‘व्हायरस’ हा मल्याळम चित्रपट ‘अमेझॉन प्राईम’वर उपलब्ध आहे. २०१८ मध्ये केरळात पसरलेल्या निपाह विषाणू संसर्गाशी संबंधित सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे.

याशिवाय ‘इट कम्स अॅट नाईट’ (२०१७), ‘28 डेस् लॅटर’, ‘डाऊन ऑफ द डेड’ (१९७८), ‘इट स्टेन्स द सँड रेड’, ‘रॅबिड’, ‘ट्रेन टू बूसान’, ‘वर्ल्ड वॉर झेड’ हे चित्रपट संसर्ग आणि झोंबी या विषयाला धरून बनलेले आहेत.
या चित्रपटांचा अभ्यास केल्यावर एक लक्षात येतं की भविष्यवेधी, सर्जनशील कलावंत भविष्याचा विचार करतात. त्यामुळे संसर्ग होऊन गेल्यावर त्यावर चित्रपट निघण्याऐवजी येणाऱ्या संकटाचा वेध घेणारे चित्रपट अधिक बनवले जातात. एबोला, करोना यांसारखे विषय त्यांचा संसर्ग सुरू होण्याच्या कितीतरी आधी पडद्यावर आले. हीच दूरदृष्टी जर जगाच्या आणि समाजाच्या नियोजनात कामी आली असती तर आज हजारो निष्पाप जीव वाचले असते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: