रामदेवबाबांचा गोलमाल, भूलला ‘भक्त’जन

रामदेवबाबांचा गोलमाल, भूलला ‘भक्त’जन

आयुर्वेदिक औषधांच्या बाजारात एक बडी कंपनी असलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने मंगळवारी एका पत्रकार परिषदेत कोविड-१९वर औषध शोध

कोरोनाचे औषध नव्हे, केवळ बनवाबनवी!
तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा
कोरोना औषध : रामदेव, बाळकृष्णवर फिर्याद दाखल

आयुर्वेदिक औषधांच्या बाजारात एक बडी कंपनी असलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने मंगळवारी एका पत्रकार परिषदेत कोविड-१९वर औषध शोधल्याचा दावा केला. हा दावा करताना रामदेव बाबा यांनी या औषधाच्या चाचण्या पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये घेतल्या असल्याचे सांगितले. याच कंपनीचे एक संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी कोरोनावरचे कीटही पत्रकार परिषदेत दाखवले. या कीटमध्ये ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ अशी दोन औषधे असतील व त्याची किंमत ५४५ रु. असेल असे ते म्हणाले.

या औषधाची माहिती देताना रामदेव बाबा व त्यांच्या कंपनीच्या एकाही प्रतिनिधीने आपल्या औषधामागील पुरावे, त्याच्या क्लिनिकल ट्रायल यांची माहिती दिली नाही. मॉडर्न मेडिसीनमध्ये अशा क्लिनिकल ट्रायल व संशोधन जगापुढे दाखवावे सादर करावे लागतात. त्याचे पुरावे दाखल करावे लागतात मग दावा करता येतो. पतंजलीने असे कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.

त्यामुळे या औषधाची बातमी वार्यासारखी पसरताच आयुष मंत्रालयाने पतंजलीला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले व त्यांच्या औषधाचा प्रसार व प्रचार करण्यास मनाई केली. पतंजलीने आपल्या औषधाची जाहिरात करताना आयुष मंत्रालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जारी केलेल्या निर्देशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून आले. या निर्देशांत कोणत्याही आजारावर वा रोगावरील उपचाराची आयुर्वेद, सिद्ध व युनानी उपचार पद्धतीने तयार केलेल्या औषधांची जाहिरात करण्यास मनाई केलेली आहे.

पतंजलीने आपल्या औषधांची माहिती देताना जयपूरमधील निम्स विद्यापीठात औषधाच्या चाचण्या घेतल्याचे सांगितले. या चाचण्यांमध्ये १०० कोरोना रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. पण त्यापैकी ९५ रुग्ण चाचण्यांमध्ये सामील झाले. त्यातील ६९ टक्के कोरोना रुग्ण ३ दिवसांत व सर्व रुग्ण एकूण ७ दिवसांत बरे झाले, असे म्हटले होते.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार ९५ रुग्णांमधील ४५ रुग्ण हे ट्रिटमेंट ग्रुपमध्ये होते तर अन्य ५० रुग्ण प्लॅसेबो ग्रुपमध्ये होते.

पतंजलीने दिलेल्या माहितीवरून क्लिनिकल ट्रायलची संपूर्ण माहिती मिळत नाही. त्याचबरोबर चाचण्यांचा एकूण कालावधी, रुग्ण स्त्री की पुरुष, प्रत्येक रुग्णाचा क्लिनिकल रिपोर्ट (ज्या मध्ये रुग्णाला अन्य आजार, रोग आहेत का याची माहिती), सुरक्षा अभ्यास, चाचण्यांची तपशीलवार माहिती, चाचण्यांच्या निकालाचा सांख्यिकी अभ्यास, साइड इफेक्ट्स, रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांचा केलेला अभ्यास व अन्य तपशील यांची माहिती पतंजली कंपनीने दिलेली नाही.

पतंजलीने आपल्या औषधावरचा एकही संशोधन प्रबंध जाहीर केलेला नाही. तो कोणत्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेला नाही व तसा तो वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनाही आढळलेला नाही. त्यामुळे आयुष मंत्रालयाने ही सर्व माहिती पतंजलीकडे मागितली आहे.

क्लिनिक ट्रायल्स रिजस्ट्री ऑफ इंडियाकडे झालेल्या नोंदीत ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ असे उल्लेख केलेले नाहीत. पतंजलीला कोरोनावरील औषध विकसित करण्यासाठी दोन महिन्यांचा काळ लागला. या औषधामधील घटक शुद्ध अश्वगंगा, ५०० मिलिग्रॅम गुळवेल अर्क, १००० मिलीग्रॅम शुद्ध तुळस अर्क, अणु तेल चार थेंब, श्वासरी रस २ ग्रॅम असे आहेत. ही औषधे कोरोना रुग्णाला देऊन ७ व १४ दिवसांनी त्यांच्या तपासण्या केल्या व नंतर १४ व ३० दिवसांनी पुन्हा तपासण्या केल्या, असे त्यांचे म्हणणे आहे.

पण त्यांच्या माहितीत सुसूत्रता नाही. कारण त्यांनी २९मे रोजी त्यांनी रुग्णांची नोंद केली आहे, म्हणजे त्यांच्या माहितीनुसार क्लिनिकल ट्रायल करण्याअगोदर पतंजलीने बाजारपेठेत औषध आणण्याची घोषणा केली आणि आजही कोरोनाग्रस्त रुग्ण या औषधांची चाचणी स्वतःवर करून घेण्यासाठी या कंपनीकडे नोंद करू शकतो.

पतंजलीने आपल्या औषधाचा अभ्यास निम्स विद्यापीठासोबत केल्याचे म्हटले आहे. या विद्यापीठात त्यांनी ९५ रुग्णांवर आपल्या औषधाच्या चाचण्या केल्याचे म्हटले आहे. पण हे सांगत असताना त्यांनी दिल्ली, अहमदाबाद, व अन्य शहरात २८० कोरोना रुग्णांवर चाचण्या केल्याचे म्हटले आहे. एक शक्यता अशी गृहित धरता येते की, एकापेक्षा अधिक क्लिनिकल ट्रायल केल्या गेल्या असतील. पण CTRI च्या साइटवर शोधल्यास याबाबत पूरक माहिती मिळत नाही.

या औषधाच्या दुसर्या टप्प्यात कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण ते लक्षणे नसलेला रुग्ण, सी-रिअक्टिव्ह प्रोटीनमधील कमतरता, ESR व IL-6 हेमॅटोलॉजिकल पॅरामीटर्समधील सुधारणा, याची माहिती मिळत नाही. ट्रायल फेज व पब्लिकेशनच्या रकान्यात NIL असे नमूद करण्यात आले आहे.

पतंजलीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये कोरोनील व श्वासरी संदर्भात पुढील प्रमाणे माहिती दिली आहेः कोरोना विषाणूचा मानवी शरीरात प्रवेश झाल्यानंतर तो श्वसनमार्गात जातो तेथे तो अल्वेओईलवर हल्ला करून तो निकामी करतो, त्यानंतर हा विषाणू मानवी शरीरातील अन्य भागात उपद्रव देऊ लागतो. आमचे वर उल्लेख केलेले औषध विषाणूंना रोखते व शरीरात विषाणूंवर हल्ला करणार्या पेशींची संख्या वाढवून हा आजार रोखते.

असा दावा रोगप्रतिकारक औषधांमध्ये सर्रास आढळतो. आणि पतंजलीने कोणत्या पेशींची संख्या वाढते त्याचा उल्लेख केलेला नाही.

थोडक्यात पतंजलीच्या औषधांची चाचणी एक हजार नव्हे, १०० नव्हे तर केवळ ९५ रुग्णांवर झाली आहे.

भारतात अश्वगंधा, गुळवेल हे प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी सर्रास घेतले जाते. त्यामुळे पतंजली औषध विकसित केलेय या दाव्यातून त्यांनी कोणताही वैज्ञानिक शोध लावला आहे, असे दिसत नाही.

या संदर्भात या औषधांच्या चाचण्यांवर देखरेख करणार्या गणपत देवपुरा व अभिषेक शर्मा यांना इ-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला पण त्यांचे उत्तर अद्याप आलेले नाही.

एखाद्या आजारावर औषध विकसित केल्याचे दावे करण्याचा पतंजलीचा हा पहिला प्रयत्न नाही. त्यांनी पूर्वीही आपण शास्त्रीय संशोधनाच्या माध्यमातून औषधे विकसित करत आहोत असा दावा केला आहे. २०१६मध्ये वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन पतंजलीने आपले आयुर्वेदिक मिशन हे संशोधनावर आधारित असून गेली २५ वर्षे सुमारे १ कोटीहून अधिक लोकांवर आमच्या संस्थेने संशोधन केल्याचा दावा केला होता.

यावर हैदराबादस्थित, सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीच्या माजी संस्थापक, अध्यक्ष पुष्पा भार्गव यांनी

The Wire:मध्ये एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी पतंजली गेली २५ वर्षे सखोल संशोधन करत असेल तर ते संशोधनकार्य देशातील वैज्ञानिक संस्थामध्ये, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन नियतकालिकांमध्ये का प्रसिद्ध झालेले दिसत नाही, असा सवाल केला होता. पतंजलीची औषधे तयार करणारे कोण शास्त्रज्ञ, कोण डॉक्टर आहेत, त्यांची शैक्षणिक पात्रता काय, हे संशोधन कोणत्या संस्थांमध्ये चालते, त्याचे पत्ते काय, कोणती संशोधन पद्धती यासाठी वापरली गेली याची माहिती कुठे आहे, असे प्रश्न विचारले होते. जर देशातल्या १ कोटी लोकांवर उपचार केले असतील तर प्रत्येक रुग्णावरच्या उपचारावरचे १ पान गृहित धरले तर १ कोटी पानांची माहिती उपलब्ध असली पाहिजे, ही माहिती कुठे प्रसिद्ध झाली आहे, हे रामदेव बाबा सांगतील का असे प्रश्न भार्गव यांनी उपस्थित केले होते.

पतंजली आयुर्वेदचे संचालक बाळकृष्ण यांनी फेब्रुवारीमध्ये सोरायसीस या त्वचेच्या आजारावर अश्वगंगाच्या बिया गुणकारी ठरतात व त्यावर संशोधन केल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात या औषधाची चाचणी उंदरांवर केल्याची माहिती पुढे आली होती व त्यांनी लिहिलेला संशोधन प्रबंध संस्कृतमध्ये होता. जर संशोधन प्रबंध संस्कृतमध्ये लिहिला असेल तर त्याची सत्यता कोण तपासणार हा प्रश्न उपस्थित होतो.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0