नवी दिल्लीः कोविड-१९ची लस घेतल्यानंतर मिळणार्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हे व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून व कोविड महासाथील
नवी दिल्लीः कोविड-१९ची लस घेतल्यानंतर मिळणार्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हे व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून व कोविड महासाथीला रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन व्हावे, याचे प्रबोधन करण्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिले.
काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी कोविड-१९ची लस घेतल्यानंतर दिल्या जाणार्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असणे हे अनिवार्य वा बंधनकारक का आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी लिखित स्वरुपात उत्तर दिले.
भारती पवार म्हणाल्या की कोविड-१९ प्रमाणपत्र हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असून त्याचे प्रारूप प्रमाणीकृत आहे. कोविड महासाथीच्या काळात योग्य सामाजिक व्यवहाराचे पालन करून या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी हा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे. पंतप्रधानांचे छायाचित्र हे जनतेमध्ये कोविड रोखण्यासाठी जागरुकता निर्माण करण्याचा संदेश देणारा आहे. सरकारची ही नैतिक व वैयक्तिक जबाबदारी असून असा संदेश जनतेवर प्रभाव टाकतो, असे पवार यांनी स्पष्टीकरण दिले.
देशात पूर्वी पोलिओ व अन्य रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत पंतप्रधानांचे छायाचित्र प्रसिद्ध केले जात नव्हते, तेव्हा या महासाथीला मोदी यांचे छायाचित्र सक्तीचे व अनिवार्य का केले आहे, असा एक अन्य प्रश्न कुमार केतकर यांनी विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर मात्र सरकारने दिलेले नाही.
मूळ बातमी
COMMENTS