पॅकेजमुळे तरुण आत्मनिर्भर होईल ?

पॅकेजमुळे तरुण आत्मनिर्भर होईल ?

गावात काम नाही म्हणून गावचा तरुण शहराची वाट धरणार नाही. स्किल इंडिया, आत्मनिर्भर भारत या योजनातून गाव खेड्यातील ते वाडी वस्तीवरील तरुण यांच्यासाठी या योजना कार्यान्वित झाल्या तर भारत आत्मनिर्भर होईल.

कोरोना व्हायसरमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने अर्थव्यवस्था पुरती  मंदावली आहे. कोरोनाशी लढतात लढता अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. कोरोनाच्या संकटाला संधी म्हणून पाहायचे आहे. आत्मनिर्भर भारत या अभियानामुळे देशभरात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. यासाठी त्यांनी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. या पॅकेजबद्दलची माहिती दुसर्‍या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विशेष आर्थिक पॅकेजमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ योजना जाहीर करण्यात आली. ही  योजना पाच खांबावर उभारली जाईल असे म्हटले गेले. यातील पहिला खांब अर्थव्यवस्था, दुसरा खांब इन्फ्रास्ट्राचर, तिसरा खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारित, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी, अशी घोषणा मोदींनी केल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटी रु.चे कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा केली. समाजातील अनेक घटकांशी संवाद साधून हे आर्थिक पॅकेज तयार करण्यात आले आहे. या पॅकेजद्वारे देशातील विकास वाढवण्याची योजना आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत योजना म्हटले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या व्याख्येत बदल करून त्यांच्या गुंतवणूक व वार्षिक उलाढालीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. या व्याख्येनुसार सूक्ष्म उद्योग १ कोटी रुपयांची गुंतवणूक व ५ कोटी रु.ची वार्षिक उलाढाल, लघु उद्योग १० कोटी रु. गुंतवणूक आणि ५० कोटी रु. उलाढाल तर मध्यम २० कोटी रु. गुंतवणूक १०० कोटी रु.ची उलाढाल अशी व्याख्या करण्यात आली आहे. तसेच ५० हजार कोटी रूपयांचा एक विशेष निधीही जाहीर करण्यात आला आहे. याचा फायदा त्या उद्योगांना होईल जे चांगली कामगिरी करत आहेत पण निधी अभावी त्यांना अडचणी येत आहेत. अशा उद्योगासाठी हा निधी वापरला जाईल.

सरकार यात १० हजार कोटी रु.ची गुंतवणूक करेल. या शिवाय एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे केल्या जाणार्‍या २०० कोटी रुपयापर्यंतच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर न काढण्याची घोषणा करण्यात आली.   लघु आणि कुटीर उद्योगांसाठी सहा मोठ्या योजना, लघु आणि कुटीर उद्योगांसाठी कोणत्याही गँरंटीशिवाय ३ लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार, ४५ लाख लघु उद्योगांना ३१ ऑक्टोबरपासून याचा फायदा मिळणार अशा प्रकारे ही माहिती देण्यात आली. अशा प्रकारे ही आत्मनिर्भर भारत योजना केंद्राने जाहीर केली आहे.

या योजनेमुळे उद्योगांना फायदा होईल किंवा कितपत फायदा होईल हा मुद्दा कोरोनानंतरचे कधी महिने मार्केट असे चालेल यावर अवलंबून आहे. सर्व व्यवसायामध्ये ई-प्रणालीचा वापर करावा लागेल. आपला व्यवसाय व्होकल ते लोकल आणि लोकल ते ग्लोबल होण्यासाठीचा हा कसोटीचा काळ असेल.  मार्केटमध्ये तुमचा माल खरेदी करण्यासाठी ग्राहकाच्या हातीही पैसा असणे आवश्यक असेल. आत्मनिर्भर योजनतेतून नवीन उद्योग सुरू होतील. बेरोजगार व्यक्तींना काम मिळेल पण कोणत्याही व्यवसायाचे साधे गणित आहे की, पहिली किमान दोन वर्ष तरी तुम्हाला व्यवसाय नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर करावा लागतो.

कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेता सध्या तरी पुढील काही महिने फिजिकल डिस्टन्सिंग, ई मार्केट प्रणाली, ऑनलाइन मार्केटिंग यागोष्टीवर भर द्यावा लागेल.  सातत्याने तुमचे प्रॉडक्ट इतरांपेक्षा वेगळे कसे आहे हे सांगावे लागेल तेव्हा हे उद्योग उभारी घेऊ शकतील. याशिवाय ऑनलाइन मार्केटिंग करतांना इन्फॉर्मेशन ही मिसइन्फॉर्मेशन होणार नाही याकडेही सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे.

कोरोनाच्या काळात आत्मनिर्भर भारत योजना आणि तरुण उद्योजकांना संधी म्हणून पाहिले तर नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली संधी आहे. पण कोरोनाच्या काळात भारतातच नव्हे तर आशिया पॅसेफिक देशात तरुण उद्योजकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. नव्याने सुरू केलेला व्यवसाय, त्यासाठी घेतलेले कर्ज, तयार झालेले उत्पन्न मार्केटमध्ये न पोहचल्यामुळे अंगावर पडलेले नुकसान, कामगारांचा पगार आणि लॉकडाऊनमुळे बंद झालेले मार्केट यामुळे नव्याने व्यवसाय, स्वत:च स्टार्टअप सुरू केलेल्या तरुणांपुढे पुन्हा बेरोजगारीचे संकट उभे आहे. यातून येणारे नैराश्य, मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि आपल्या व्यवसायातून यशाची पहिली पायरी गाठण्याआधीच पदरी पडलेले अपयश मनावर मोठा आघात करत आहे.

यूएनडीपीच्यावतीने, लॉकडाऊनच्या काळात आशिया पॅसेफिक खंडातील १८ देशातील तरुण उद्योजकांसोबत लॉकडाऊनचा त्याच्या व्यवसायावर कोणता  परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी सर्व्हे करण्यात आला.  या सर्व्हेचे निष्कर्ष पुढील प्रमाणे :

  • या ऑनलाइन सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ८६% तरुण उद्योजकांनी त्याच्या व्यवसायावर, स्टार्टअपवर लॉकडाऊनचा अत्यंत वाईट परिणाम झाल्याचे नोंद केले. ३ पैकी एका उद्योजकाचे प्रॉडक्ट तयार करण्याचे काम हे स्लोडाऊन झाले. तर ४ पैकी एका उद्योजकाचे काम हे पूर्णपणे ठप्प झाले.
  • ८८% ग्राहकांची मागणी घटली. ३४% उद्योजकांच्या सप्लाय चेन विस्कळीत झाल्या. २६% तरुण उद्योजकांनी सरकारच्या उद्योग धोरणावर व्यवसाय चालू शकत नाही असे मत व्यक्त केले.
  • ३५% उद्योजकांनी त्याचा स्टाफ आणि स्टाफचे कामाचे तास कमी केले. २५% गुंतवणूकदारांनी ऑर्डर कॅन्सल केल्या. २५% गुंतवणूकदारांनी पुढील गुंतवणूक थांबवली. २४% उद्योगजकांनी स्टाफच्या वेतनात कपात केली.
  • ८६% उद्योजकांनी लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार थांबवले.

ही आशियाई पॅसेफिक देशातील तरुण व्यावसायिक / उद्योजकांची स्थिती आहे.  केंद्राने जाहीर केलेले पॅकेज भारतासारख्या विकसनशील देशात नेमके कोणासाठी मिळणार हा खरा मुद्दा आहे.  योजना चांगली असली त्यातील आत्मनिर्भरता शब्द खेळी विचार करायला भाग पडत असली तरी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे, प्रामुख्याने ग्रामीण भागातील तरुणांकडे पोहचली त्याची अंमलबाजवणी झाली तर भारत आत्मनिर्भर होऊ शकतो. तीन दिवस उपाशी पोटी पायी चालून २१ वर्षाचा तरुण मुलाचा लॉकडाऊनने बळी घेतला आहे. आत्मनिर्भर योजना, यातील आकडे मोठे मोठे असले तरी खर्‍या अर्थाने तेव्हाच सार्थकी लागू शकतात तेव्हा ह्या योजना गाव पातळीवर राबविल्या जातील.

गावात काम नाही म्हणून गावचा तरुण शहराची वाट धरणार नाही. स्किल इंडिया, आत्मनिर्भर भारत या योजनातून गाव खेड्यातील ते वाडी वस्तीवरील तरुण यांच्यासाठी या योजना कार्यान्वित झाल्या तर भारत आत्मनिर्भर होईल.  लॉकडाऊनमुळे मजुरांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यावरून चालतात तेव्हा जगाच्या वेशीवर देशाची लक्तरे टांगली जातात. भविष्यात हे सगळे होऊन नये म्हणून २० लाख कोटी रु.च्या पॅकेजमधील आत्मनिर्भर भारत योजना अंमलात आणताना ह्या तरुणांना प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे.

COMMENTS