राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीतील निर्णय.
नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे काँग्रेस, तृणमूल कॉँग्रेस आणि समाजवादी पार्टीसह १३ विरोधी पक्षांचे एकमताचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उदयास आले आहेत. उमेदवारी ठरविण्यासाठी मंगळवारी येथे बैठक झाली.
“आम्ही (विरोधी पक्षांनी) एकमताने निर्णय घेतला आहे की यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे सर्वमान्य उमेदवार असतील,” असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले.
संयुक्त निवेदनात, विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना देखील सिन्हा यांना अध्यक्ष म्हणून पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. सिन्हा हे ज्येष्ठ नेते होते आणि २०१८ साली राजीनामा देईपर्यंत त्यांनी भाजपवर वारंवार टीका केली होती.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी संसदेच्या अॅनेक्समध्ये जमलेल्या विरोधकांनी सिन्हा यांच्या नावावर सहमती दर्शवली.
शरद पवार, गोपाळकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिन्हा यांचे नाव पुढे आले.
या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लीमीन, राष्ट्रीय जनता दल आणि भारत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या सर्व पक्षांचा या बैठकीत समावेश होता.
काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश, तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी, द्रविड मुन्नेत्र कळघमचे तिरुची शिवा, सीपीआय(एम)चे सीताराम येचुरी आणि सीपीआयचे डी. राजा या बैठकीत सहभागी झाले होते.
बॅनर्जी यांनी सिन्हा यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे.
ममता बॅनर्जींचे यशवंत सिन्हा यांनी आभार मानले आहेत.
तेलंगणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल, आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल आणि युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी, हे कोणाशीही संलग्न नसणारे पाच प्रादेशिक पक्ष मंगळवारच्या बैठकीपासून दूर राहिले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी बोलावलेल्या बैठकीपासूनही हे पक्ष दूर राहिले होते.
COMMENTS