प. बंगाल ८ जणांचे हत्याकांड; तृणमूलच्या नेत्याला अटक

प. बंगाल ८ जणांचे हत्याकांड; तृणमूलच्या नेत्याला अटक

नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात बिरभूम जिल्ह्यातील ८ जणांना जिवंत जाळण्याच्या प्रकरणावरून केंद्र सरकार व प. बंगाल सरकार यांच्यामधील तणाव वाढला असताना गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी व स्थानिक तृणमूल काँग्रेसचा नेता अनारुल हुसेन शेख याला अटक केली. अनारुल शेख हा तृणमूलचा पंचायत स्तर पातळीवरचा अध्यक्षही आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी घटनास्थळाचा दौरा केला होता, त्यानंतर अनारुल शेखला अटक करण्यात आली. अनारुलला कोणत्याही परिस्थितीत अटक व्हायला पाहिजे वा त्याने आत्मसमर्पण करायला हवे असे वक्तव्य बॅनर्जी यांनी केल्यानंतर २४ तासात अनारुल पोलिसांच्या ताब्यात आला.

गेल्या आठवड्यात सोमवारी बिरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट या गावात तृणमूल काँग्रेसचे पंचायत समिती नेते भाडू शेख यांची हत्या करण्यात आली होती. भाडू शेख हे या भागातील प्रभावशाली नेते असून त्यांच्या हत्येनंतर एका जमावाने ८ हून अधिक घरांना आगी लावल्या. यात ८ हून अधिक जण होरपळले त्यात दोन मुलांचा समावेश आहे. पण काही स्थानिकांच्या मते मृतांचा आकडा ८ पेक्षा अधिक आहे.

भाडू शेख याची झालेली हत्या हा एक व्यापक कट असल्याचे विधान ममता बॅनर्जी यांनी केले. या संदर्भातील दोषींना अटक व्हायला पाहिजे व ती होईल असेही त्या म्हणाल्या.

या एकूण प्रकरणानंतर रामपुरहाट गाव व नजीकच्या भागातील ६९ जणांनी पलायन केले आहे. फोरेन्सिक रिपोर्टनुसार होरपळलेल्यांना जबर मारहाण करण्यात आली होती व नंतर त्यांना जाळून टाकण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी २० जणांना अद्याप ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणानंतर प. बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून माकप, अन्य डावे पक्ष व काँग्रेसने राज्यात राज्यपाल राजवट आणावी अशी विनंती केंद्राकडे केली आहे. गुरुवारी संसदेतही हा मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांकडून उचलला गेला. काही नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या घटनास्थळी भेट देण्याच्या निर्णयावरही टीका केली. कलंकित झालेली स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा दौरा असल्याचा आरोप माकपचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी केला.

तर काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांना पोलिसांनी बोगताई येथे रोखून धरले. चौधरी यांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवले. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध म्हणून चौधरी यांनी रस्त्यावरच ठाण मांडून राज्य सरकारविरोधात निदर्शने केली.

मूळ बातमी

COMMENTS