बिहारच्या विकासासाठी प्रशांत किशोर यांचे व्यासपीठ

बिहारच्या विकासासाठी प्रशांत किशोर यांचे व्यासपीठ

पाटणा: देशातील आघाडीच्या राजकीय पक्षांसाठी पडद्यामागून काम करणारा  व्यूहरचनाकार ही जबाबदारी अनेक वर्षे निभावल्यानंतर आता आपल्या स्वत:च्या बिहार राज्या

बिहारमध्येही आमचं ठरलंय, महगठबंधनचं जमलंय?
नाराज नीतीश कुमार
बिहार, उ.प्रदेश, म. प्रदेश सर्वात गरीब राज्ये

पाटणा: देशातील आघाडीच्या राजकीय पक्षांसाठी पडद्यामागून काम करणारा  व्यूहरचनाकार ही जबाबदारी अनेक वर्षे निभावल्यानंतर आता आपल्या स्वत:च्या बिहार राज्याच्या कायापालटासाठी समविचारी लोकांचे व्यासपीठ विकसित करण्याची इच्छा आहे, असे राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी गुरुवारी, ५ मे रोजी, स्पष्ट केले.

नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याच्या बातम्या किशोर यांनी फेटाळून लावल्या आणि आपल्याला बिहारच्या विकासासाठी काम करायचे आहे असे स्पष्ट केले. अर्थात आपल्या या नवीन विकासात्मक व्यासपीठाचे रूपांतर पुढे राजकीय पक्षात करण्याचा पर्याय त्यांनी खुला ठेवला आहे.

“बिहारच्या कायापालटासाठी एक नवीन विचार आणि प्रयत्न आवश्यक आहे,” असे किशोर म्हणाले. त्यांनी ‘जनसुराज’ या अभियानाचा प्रस्ताव मांडला. दोन वर्षांपूर्वी संयुक्त जनता दलातून काढून टाकले गेल्यानंतर त्यांनी ‘बात बिहार की’ नावाचे अभियान सुरू केले होते. हे नवीन अभियानही याच धर्तीवर आहे.

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण ३००० किलोमीटरच्या पदयात्रेचा आरंभ करणार आहोत, अशी घोषणा किशोर यांनी केली. या व्यासपीठात सहभागी होण्यासाठी आपण १७,५००-१८००० व्यक्ती निश्चित केल्या आहेत आणि पुढील काही महिन्यांत या सर्वांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“बिहारसाठी नवीन विचाराची गरज आहे असे यातील ९० टक्के लोकांना वाटते. पुढील तीन-चार महिन्यांत मी शक्य होईल तेवढ्या लोकांना प्रत्यक्ष भेटणार आहे,” असे किशोर यांनी सांगितले.

आपले मागील अभियान जोर धरू शकले नाही, कारण, ते सुरू केल्यानंतर लगेचच कोविड साथीचा उद्रेक झाला आणि सर्व सार्वजनिक उपक्रम थांबवावे लागले, असे त्यांनी नमूद केले.

आपण निवडणूक लढवू इच्छित नाही असे किशोर यांनी स्पष्ट केले. आपल्या राज्यात नवीन ‘सुरुवात’ करणार असल्याचे सांगून २ मे रोजी किशोर यांनी सर्वांमध्ये उत्कंठा निर्माण केली होती.

“लोकशाहीत अर्थपूर्ण सहभाग घेण्याचा आणि जनताकेंद्री धोरणांना आकार देण्याचा माझा शोध खूपच चढउतारांतून गेला! त्यामुळे आता वेळ आली आहे ती खऱ्या मालकांपर्यंत अर्थात जनतेपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांच्या समस्या अधिक चांगल्या समजून घेण्याची. जनसुराज अर्थात जनतेच्या भल्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रशासनाकडे जाण्याचा हाच मार्ग आहे,” अशा आशयाचे ट्विट किशोर यांनी केले होते आणि त्याला ‘शुरुआत बिहार से’ (बिहारपासून सुरुवात) असा हॅशटॅगही दिला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: