बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी गेल्या सोमवारी फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब आदी आभासी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समार्फत ‘निश्चय संवाद’ हे पहिले निवडणूक प्रचार अभियान घेतले आणि तेथे त्यांना प्रचंड ‘डिसलाइक्स’ मिळाले.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी गेल्या सोमवारी घेतलेल्या आभासी निवडणूक प्रचारफेरीमध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या मागील भागात कमालीचे साम्य आहे. दोन्ही नेत्यांची संबोधने ‘लाइक्स’च्या तुलनेत विक्रमी ‘डिसलाइक्स’ची धनी झाली.
नीतीश कुमार यांनी फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब आदी आभासी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समार्फत ‘निश्चय संवाद’ हे पहिले निवडणूक प्रचार अभियान घेतले. या अभियानाला ९,९३१ लाइक्स, तर २७,३४२ डिसलाइक्स आल्याचे बिहारमधील न्यूज वेबसाइट firstbihar.com.च्या बातमीत म्हटले आहे. हे भाषण तब्बल २.५३ तास लांबीचे होते. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर ते प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक यूजर्सनी यावर अत्यंत खरमरीत प्रतिक्रिया दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’ हे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण आणि त्यांना राज्यपालांना उद्देशून केलेल्या भाषणालाही अलीकडेच लाइक्सच्या तुलनेत अधिक डिसलाइक्स बघाव्या लागल्या होत्या.
एकंदर नेटिझन्समधील मोदी यांचा प्रभाव कमी होत चालल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. अर्थात या दोघांमधील फरक म्हणजे मोदी यांच्या गळ्यात सत्तेची माळ गेल्याच वर्षी पुन्हा एकदा पडली आहे, तर नीतीश कुमार यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीला तोंड द्यायचे आहे. अशा वेळी लोकप्रियतेत झालेली घट ही नीतीश व त्यांच्या पक्षासाठी चिंतेची बाब ठरू शकते. नीतीश यांच्या व्हर्च्युअल अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अद्याप पक्षाने कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलेले नाही.
नीतीश यांना मिळालेल्या डिसलाइक्सचा विधानसभा निवडणुकांच्या निकालावर नेमका काय परिणाम होईल याचा आडाखा बांधणे कठीण आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ठोस विचार व निश्चितता यांची कमतरता नक्कीच होती आणि त्यांनी एकूण जे मानक राखणे मानांकित होते ते राखले गेले नाहीत हेही नक्की.
‘लालू-राबडी यांच्या सत्तेखालील १५ वर्षांचा (११९०-२००५) काळ’ विरुद्ध ‘एनडीएचा १५ वर्षांचा (२००५-२०२०) काळ’ ही नीतीश कुमार यांच्या पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची थीम आहे. त्यानुसार नीतीश, लालूप्रसाद यादव यांना झोडपत राहिले. वास्तविक लालू यांना चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्यामुळे निवडणुका लढवण्यास बंदी आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात कुठेच नाहीत. न्यायालयीन कोठडीत असताना सार्वजनिक विधाने करण्यासही त्यांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नीतीश यांच्या आरोपांपासून ते स्वत:चा बचावही करू शकत नाही. राज्याच्या दूरवस्थेबाबत लालूंवर टीकास्त्र सोडत नीतीश यांनी बिहारला ‘अंधाराच्या खाईत’ ढकलण्यासाठी त्यांना जबाबदार धरले. २०१५ मध्ये नीतीश लालू यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) समावेश असलेल्या ग्रॅण्ड अलायन्सचेच मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आले होते याकडे मात्र त्यांनी काणाडोळा केला. या आघाडीत राजदच्या ८० जागा, तर संयुक्त जनतादलाच्या ७१ जागा होत्या. तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हे लालू यांचे दोन मुलगे या सरकारमध्ये दीड वर्षांहून अधिक काळ अनुक्रमे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री होते.
तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्या या मंत्रिमंडळातील कामगिरीमधील चुका नीतीश यांनी दाखवल्या असत्या तर ते सयुक्तिक ठरले असते. मात्र, नीतीश यांनी गेली १५ वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या लालू-राबडी यांच्या कारभारावर टीका करण्याकडेच लक्ष केंद्रित केले. तेजस्वी आज प्रत्यक्षात नीतीश यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे अधिक तर्कशुद्ध आणि वैध ठरले असते. तेजप्रताप व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यांच्यातील वैवाहिक बेबनावावर हल्ला चढवून नितीश यांनी लालूप्रसाद यांच्या कौटुंबिक बाबी सर्वांसमोर आणल्या. बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राई यांच्या नातीचा (ऐश्वर्या) लालू यांच्या कुटुंबाने अनादर केल्याची टीका त्यांनी केली. लालू यांच्या कुटुंबावर टीका करून नीतीश यांनी आपल्या नेहमीच्या सभ्यपणापासून फारकत घेतली असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. “बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी लालू यांच्यावर व्यक्तिगत स्तरावर घसरून टीका करणे आश्चर्यकारक आहे. नीतीश यांचा स्वभाव बघता हे धक्कादायक आहे,” असे पाटण्यातील ज्येष्ठ पत्रकार कन्हैया भेलारी म्हणाले.
नीतीश यांनी “थ्रीसीज’’ हा आपला आवडता वाक्प्रचार पुन्हा एकदा वापरला. “क्राइम (गुन्हे), करप्शन (भ्रष्टाचार) आणि कम्युनॅलिझम (सांप्रदायिकता) या तीन ‘सीं’च्या विरोधात शून्य सहिष्णुता’ या धोरणाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्यक्षात मुझफ्फरपूर निवाराघरातील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व त्यांच्या हत्यांसारख्या नृशंस कांडामुळे नीतीश यांचा कार्यकाळ बिहारच्या इतिहासात कायमस्वरूपी ओळखला जाईल हे वास्तव आहे. न्यायालयाने सीबीआयच्या आरोपपत्रावरून या कांडातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर आणि अन्य काही जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ब्रजेश यांच्यावर वरदहस्त धरणाऱ्या बिहारमधील सत्ताधारी तसेच राजकारणातील व नोकरशाहीतील बड्या धेंडांची चौकशीही सीबीआयने केलेली नाही. ब्रजेशच्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या वर्तमानपत्रासाठी बिहार सरकारने दर महिन्याला ३० लाख रुपये दिले आहेत याची नोंद आहे. बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या या प्रकरणातील सहभागाची पुष्टी या नोंदीमुळे होत आहेत.
त्याचबरोबर नीतीश यांच्या कार्यकाळात कुख्यात सृजन घोटाळा घडला. यामध्ये भागलपूर कोषागारातून अनेक वर्षांत २,००० कोटी रुपयांची रक्कम सृजन महिला विकास समिती या मनोरमा देवी यांच्या संस्थेच्या खासगी खात्यावर वर्ग करण्यात आली होती.
नीतीश यांचे अत्यंत लाडके असलेले भागलपूरचे माजी जिल्हाधिकारी व जेडीयूचे नेते के. आर. रामय्या यांच्यावर सीबीआयने आरोप दाखल केले आहेत. रामय्या यांच्या पाठीमागील राजकारण्यांची चौकशीही सीबीआयने अद्याप केलेली नाही आणि सृजन घोटाळ्याचा तपासही संथगतीने सुरू आहे.
याच महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर नीतीश यांनी ग्रॅण्ड अलायन्सला डच्चू देऊन भाजपच्या तंबूत प्रवेश केला होता. या घोटाळ्यातील नीतीश यांच्या सहभागाबाबत तेजस्वी आणि राजदचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी आरोप केले आहेत.
धर्मांधता खपवून घेणार नाही हा त्यांचा दावाही पोकळ आहे. नीतीश यांच्या पक्षाने संसदेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा दिला आहे. आरएसएस-भाजपने देशभरात अल्पसंख्याकांना लक्ष्य करून चालवलेल्या कारवायांना त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे. राज्यात मुस्लिमांविरोधात विष ओकणाऱ्या गिरीराज सिंह आणि अश्विनी चौबे या खासदारांबद्दल नीतीश कधी एक शब्दही बोललेले नाहीत. सध्याच्या धृवीकरणाच्या वातावरणातही बिहारमध्ये अल्पसंख्याकांविरोधात गुन्हे घडलेले नसले, तर त्याचे श्रेय नीतीश यांच्या सरकारला नव्हे, तर जनतेच्या सामाजिक वर्तनाला व आचाराला दिले पाहिजे.
नलिन वर्मा, हे ज्येष्ठ पत्रकार असून, गोपालगंज टू रायसी: माय पोलिटिकल जर्नी या लालूप्रसाद यादव यांच्या आत्मचरित्राचे लेखक आहेत. बिहारमधील काही उत्तम लोककथांचे लेखन त्यांनी केले आहे.
COMMENTS