ख्रिश्चन व मुस्लिमांनी शांतता प्रस्थापित करावी आणि यादवी व अस्थिर परिस्थितीत दोन्ही समुदायांनी सलोखा, सहचर्य ठेवावे असा संदेश देत पोप फ्रान्सिस यांची
ख्रिश्चन व मुस्लिमांनी शांतता प्रस्थापित करावी आणि यादवी व अस्थिर परिस्थितीत दोन्ही समुदायांनी सलोखा, सहचर्य ठेवावे असा संदेश देत पोप फ्रान्सिस यांची ४ दिवसांची इराक भेट सोमवारी आटोपली. पोप फ्रान्सिस यांचा हा पहिलाच इराक दौरा असल्याने त्याला राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक महत्त्व आले होते. इराकमधून इसिसला हुसकावून लावले असले तरी तेथे काही शहरांमध्ये ख्रिश्चन व मुस्लिम अशी यादवी सुरू आहे. अशा अस्थिर वातावरणात शांततेचा व सलोखा संदेश देण्यासाठी पोप स्वतःहून इराक दौर्यावर आले होते. पोप फ्रान्सिस यांनी इसिसच्या प्रभावात असलेल्या उद्ध्वस्त मोसूल शहरालाही भेट दिली.
पोप यांचा दौरा असल्याने सगळीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नजाफ व मोसूलच्या रस्त्यांवर रणगाडे तैनात करण्यात आले होते.
आपल्या तीन दिवसांच्या इराक भेटीत पोप फ्रान्सिस यांनी पवित्र शहर समजल्या जाणार्या नजाफ या शहरांत जाऊन प्रेषित अब्राहिम यांच्या ऊर येथील जन्मस्थळाला भेट दिली. ज्या पवित्र भूमीत प्रेषितांचा जन्म झाला त्या भूमीत ईश्वरनिंदा वाढीस लागली आहे. ती कायमस्वरुपी नष्ट करण्यासाठी प्रेषित अब्राहिमच्या शिकवणीचा सर्व धर्माच्या बंधुभगिनींनी स्वीकार करावा असे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केले. शत्रूत्व, कट्टरता व हिंसा ही कोणत्याही धर्माचीची मूलतत्वे नाहीत तर ती धर्माला कलंकित करतात. आपण सर्वांनी अशा कोणत्याही कट्टरता हिंसा, दहशतवादाविरोधात मौन बाळगून बसता कामा नये, आपल्यातील गैरसमज दूर करायला हवे, असे पोप म्हणाले. पोप यांनी यावेळी यादवीत मुस्लिमांनी ख्रिश्चन समुदायाच्या केलेल्या संरक्षणाचाही आदरपूर्वक उल्लेख केला.
पोप यांच्या या भाषणावेळी मुस्लिम, ख्रिश्चन व याझिदी धर्माचे नेते उपस्थित होते. पण ज्यू धर्माचे धर्मगुरू उपस्थित नव्हते. वास्तविक ऊर हे स्थळ ख्रिश्चन, मुस्लिम व ज्यू धर्मांसाठी पवित्र मानले जाते.
नजाफच्या दौर्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी इराकमधील सर्वात शक्तीशाली समजले जाणारे शिया धर्मगुरू अयातोल्ला अली अल-शिस्तानी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. शिस्तानी हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय नेत्याची वा व्यक्तीची भेट घेत नाहीत पण त्यांनी या प्रथेला फाटा देत पोप फ्रान्सिस यांना भेटायचे कबूल केले व त्यांना स्वतःच्या घरी बोलावले. शिस्तानी नजाफ शहरातील इमाम अली मशिदीच्या नजीक एका अत्यंत साध्या घरात वास्तव्य करतात. त्यांना भेटण्यासाठी पोप फ्रान्सिस चालत गेले.
शिस्तानी यांनी या प्रसंगी जगातील सर्व धर्मगुरुंनी आपापल्या समुदायाला शांतता राखण्याचे आवाहन करावे व यादवी संपवावी असे आवाहन केले. इराकमधील यादवीत लाखो ख्रिश्चनांना देश सोडून जावे लागले आहे, या पार्श्वभूमीवर शिस्तानी यांनी इराकमधील ख्रिश्चनांनी या देशाचे नागरिक समजून शांततेत व सौहार्द ठेवत राहावे असेही सांगितले.
२०१४ ते २०१७ या दरम्यान खिलाफत राष्ट्र उभे करण्याच्या दृष्टीने इसिस या कट्टर दहशतवादी संघटनेने संपूर्ण इराकमध्ये हिंसाचार सुरू केला होता. या काळात इसिसने उत्तर इराक काबीज करून तेथे खिलाफत स्थापन केले होते. या यादवीत हजारो ख्रिश्चनांबरोबर मुस्लिमांनाही प्राण गमवावे लागले होते. २०१४च्या आसपास इराकमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या १० लाख होती ती नंतर ४ वर्षांत ३ लाख इतकी घसरली. लाखो ख्रिश्चनांनी या यादवी दरम्यान पलायन केले होते. पण नंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर व इसिसची राजवट उलथवून टाकल्यानंतर इराकमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मूळ बातमी
COMMENTS