नवी दिल्लीः पोर्तुगालमध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका गरोदर भारतीय महिलेला वेळीच प्रसुती उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर देशातील
नवी दिल्लीः पोर्तुगालमध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका गरोदर भारतीय महिलेला वेळीच प्रसुती उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर देशातील आरोग्य यंत्रणेवर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांना मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार २७ ऑगस्ट रोजी ३४ वर्षांची एक गरोदर भारतीय महिला पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे पर्यटनास आली होती. पण तिची प्रकृती बिघडल्याने तिला लिस्बनमधील सांता मारिया या रुग्णालयात नेण्यात आले. पण या रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने तिला अन्य रुग्णालयात नेत असताना हृदयविकाराचा झटका आला. अशा गंभीर परिस्थितीत या महिलेला अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे सिझेरियन ऑपरेशन करून मुलाला वाचवण्यात आले मात्र या दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर पोर्तुगालमधील आरोग्यमंत्र्यांच्या वादग्रस्त निर्णयावर चोहोबाजूंनी टीका झाली व सरकारने महिलेच्या मृत्यूची चौकशीचे आदेश दिले.
आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी काही दिवसांपूर्वी आपत्कालिन प्रसूती उपचार सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे अत्यवस्थ झालेल्या गर्भवती महिलांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेणे जोखीम घेण्यासारखे होते. भारतीय पर्यटक महिलेला या निर्णयाचा फटका बसल्याने पोर्तुगालमध्ये आरोग्यमंत्र्यांविरोधात संताप उफाळून आला.
पोर्तुगालमध्ये या पूर्वीही गर्भवती महिलांना वेळीच उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एका घटनेत दोन गर्भवती महिलांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची वेळ आली होती. या स्थलांतरात योग्य उपचारही त्या महिलांवर झालेले नव्हते.
पोर्तुगालमध्ये आरोग्य सेवक विशेषतः स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञांची व आरोग्य सेवकांची कमतरता असल्याने तेथे परदेशातून तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींना आणण्याचा सरकारचा विचार आहे.
सरकारने काही प्रसुती केंद्रेही मनुष्यबळ कमतरतेमुळे बंद केल्याने बाळंतपणाच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. डॉक्टरांवर कामाचा दबाव वाढला आहे. याला कारण आरोग्य मंत्री टेमिडो जबाबदार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
वास्तविक टेमिडो यांनी कोरोना महासाथीत उल्लेखनीय काम केले होते, त्यामुळे त्या देशात लोकप्रियही झाल्या होत्या.
पण आता नव्या वादामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला व ३० ऑगस्टला राजीनामा पंतप्रधानांना सादर केला.
मूळ बातमी
COMMENTS