सत्तेचा ‘हूक अँड क्रूक’ पॅटर्न!

सत्तेचा ‘हूक अँड क्रूक’ पॅटर्न!

प्रशांत भूषण यांची अभिव्यक्ती गुन्हा आणि रिया चक्रवर्तीला न्यायालयाआधीच गुन्हेगार ठरवू पाहणारी अक्षम्य कृती अभिव्यक्तीचा खराखुरा अधिकार. थो़डक्यात, सगळे काही पॅटर्ननुसारच चाललेले.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?
महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन
जंगलांना लागणारे वणवे व त्यामागील कारणे

जन्माची अद्दल घडवणे, कायमस्वरूपी धडा शिकवणे, जनतेला धाकात ठेवणे, स्वप्नातल्या राष्ट्राची निर्मिती करणे, अशी ‘उदात्त’ उद्दिष्टे एका पाठोपाठ एक वेगाने पूर्ण करण्याच्या झटापटीत विद्यमान सत्ताधारी, सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसांपासूनच ‘फायर फाइटिंग मोड’मध्ये आहेत. याचाच परिणाम म्हणून आता देशातल्या घरादारांत राजकारण घुसले आहे. दिवसाचे २४ तास सत्ताधारी आपला अजेंडा दामटवताहेत. सर्व यंत्रणा ताब्यात, बाजारपेठा अनुकूल आणि सोशल मीडिया कंपन्या खिशात यामुळे अर्थातच सत्ताधारी वर्गाचा अजेंडा अधिक आक्रमक, अधिक विखारी होत चालला आहे. कोण पवित्र कोण अपवित्र, कोण लायक कोण नालायक, कोण देशभक्त कोण देशद्रोही याची सुस्पष्ट विभागणी झाल्याने अजेंडा मार्गी लावण्यास सत्ताधाऱ्यांना कुणाचीही अडचण राहिलेली नाही.

एकछत्री अंमल राबवण्याच्या या इर्षेतून प्रस्थापित व्यवस्थेचा ‘हूक अँड क्रूक पॅटर्न’ ही आता तयार झाला आहे नि सोशल मीडियामुळे राजकारण सर्वव्यापी झाल्याने, रस्त्यावरच्या भाजीवाल्यासदेखील प्रस्थापित व्यवस्थेची पुढची चाल परिचित ठरू लागली आहे.

म्हणजेच, ‘एव्हरीथिंग इज आऊट अँड ओपन’ असा हा आजचा मामला आहे. सत्तासमर्थक मीडिया, सोशल मीडिया – सीबीआयपासून ईडीपर्यंतच्या तपासयंत्रणा – सत्ताधारी पक्ष पक्षाशी संलग्न संस्था संघटना- न्यायव्यवस्था अशी या पॅटर्नला पूरक रचना आहे. म्हणजे, एखादी घडलेली – न घडलेली घटना सत्तासमर्थक मीडिया-सोशल मीडियाने आधी आपल्या अजेंड्यावर घ्यायची. त्यावर घमासान माजवायचे. जनमत पुरेसे ताब्यात आले की, सत्ताधारी पक्षाशी संबंधित संस्था संघटनेतल्या नेत्या-कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे अपप्रचार मोहीम चालवायची. ही मोहीम एकदा यशस्वी झाली की, थेट सीबीआय चौकशीची मागणी लावून धरायची. मग वेळ, काळ पाहून न्यायव्यवस्थेने या प्रकरणाची दखल घेत, ‘रुल ऑफ द लॉ नव्हे तर रुल बाय लॉ’ हे सत्ताधाऱ्यांचे तत्व शिरसावंद्य मानत निकाल-निर्णय द्यायचे.

एव्हाना, देशाचे पंतप्रधान, सीबीआय आदी तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था अपौरुषेय, ‘पवित्र’ आहेत, हे अशिक्षित-अर्धशिक्षित-उच्चशिक्षित-उच्चविद्याविभूषित अशा सगळ्यांनाच मान्य असल्याने या पॅटर्नविरोधात बुद्धी शाबूत असलेले, मुख्यतः ‘रोबोटिक’ न झालेले नागरिक वगळता जवळपास सगळ्यांचाच विश्वास बसतो. त्यामुळे मैदान मोकळे मिळते. वर्तमानाचाच हवाला द्यायचा झाल्यास, आणि तोही महाराष्ट्रापुरता द्यायचा झाल्यास, एप्रिल महिन्यात, पालघर झुंडबळी प्रकरणाच्यावेळी असाच परिचित पॅटर्न आक्रमकपणे राबवला गेला. या प्रकरणात दोन साधूंचा बळी गेल्याने, त्याला झटकन धर्म चिकटला. हे हिंदू धर्मावरचे आक्रमण आहे, अशी ओरड करत आधी काही सत्तासमर्थक न्यूज चॅनेल्सनी थयथयाट सुरू केला. मग केंद्रात सत्तेत, पण महाराष्ट्रात विरोधात बसण्याची नामुष्की ओढवलेल्या राज्य पातळीवरच्या नेत्यांनी ‘हिंदू खतरेमें है’चा नारा देत वातावरणात पेट्रोल ओतण्याचा जोरदार प्रयत्न केला. सध्याची हिंदुत्वाची धगधगती प्रयोगशाळा असलेल्या उ. प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी प्रकरण तापवण्याचा प्रयत्न केला. प्रकरण व्यवस्थित तापल्यानंतर सीबीआयची मागणी झाली. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचवले गेले. पण महाराष्ट्रात सत्ता सांभाळून असलेल्यांनी थेट झुंडबळी प्रकरणात सामील असलेल्यांची यादी जाहीर करून पॅटर्नला थोडाफार धक्का दिला, इतकेच.

मात्र, अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाने ही नामी संधी केंद्रातल्या सत्ताधारी आणि त्यांच्या समर्थकांना पुन्हा चालून आली. अर्थातच याही वेळी परिचित ‘पॅटर्न’ अधिक आक्रमकपणे राबवला गेला. म्हणजे, केस बॉलिवूडशी संबंधित, हायप्रोफाइल, ग्लॅमरस. त्यात मुंबई पोलिसांनी प्रसिद्धी लोलूपतेला हपापल्याप्रमाणे केलेली प्रकरणाची हाताळणी आणि मृत सुशांत सिंग राजपूतचे विधानसभेचा आखाडा होऊ पाहणाऱ्या बिहारमध्ये असलेले मूळ हे सगळे पोषक घटक पाहून ‘सूत्रबद्ध’ नियोजन झाले. याही नियोजनात सार्वजनिक सभ्यतेचे नियम, सभ्य समाजास अपेक्षित असलेली नीतीमूल्ये सर्रास पायदळी तुडवली गेली. आधी कंगना राणावत आणि तिच्या हल्लकल्लोळी समर्थकांना हाताशी धरून एकाचवेळी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यास ललकारण्याचा तसेच बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ते करताना खलनायक-खलनायिकांवर शिक्कामोर्तब केले गेले. पुढचा सगळा हल्ला या दिशेने होणार हे त्यातून स्पष्ट झाले. म्हणजे, संशयाची पहिली सुई मृत सुशांत सिंगची मैत्रीण/लिव्ह इन पार्टनर रिया चक्रवर्तीकडे रोखून खलनायिका निश्चित केली गेली. मग मुंबई पोलिसांना निकम्मा ठरवत, त्यांचे विद्यमान बॉस असलेल्या, आणि सत्येच्या खेळात, पुढे निघून गेलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रीपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे मिसाइल रोखले गेले. रोज नवा संशय, रोज नवे आरोप. ही योजना होती, कधी काळी ‘मिलिटंट ऑर्गनायझेशन’ अशी ओळख असलेल्या परंतु आता सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावण्यात गरम रक्ताच्या शिवसेनेला जाळ्यात ओढण्याची. एकदा ते जाळ्यात आले, म्हणजेच संयम सुटून दंगेबाजी करते झाले की, केंद्रातल्या हायकमांडच्या इशाऱ्याने राज्यातल्या विरोधी नेत्यांनी कर्तव्यदक्ष राज्यपाल महोदयांच्या दरबारी जावून राज्यातली कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास विद्यमान सत्ताधारी अपयशी ठरलेत सबब महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी लावून धरायची. पण काळानुरूप बदललेल्या शिवसेनेने संयम राखला. एक डाव फसला. तरीही संधी कुठे संपली होती. ती रिया चक्रवर्तीच्या रूपाने समोर दिसतच होती. बिहारची आगामी विधानसभा निवडणूक, बॉलिवूडला धाकात ठेवण्याची गरज आणि उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्याची आपसूक मिळालेली संधी या संभाव्य तिहेरी साध्यानुसार आधी, बिहारमधल्या पाटणा इथे गुन्हा नोंदवला गेला. त्यात खुद्द मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक पदावरचे अधिकारी अशांनी उडी घेतली. लगोलग बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धाडण्यात आले. त्याचाही पुरेपूर सीन क्रीएट केला गेला. मग एक निधड्या छातीचा पण, कवीचे मन असलेला बिहारी (खरेतर सत्ताभक्त) पोलीस अधिकारी स्पेशल मिशनवर पाठवण्यात आला. त्याला मुंबईत ‘करोना’चे कारण सांगून डांबण्यात आले. मग अपेक्षेप्रमाणे मुंबई पोलिसांची छी-थू करत आणि आरोपी रिया चक्रवर्तीची ‘औकात’ काढत सीबीआय चौकशीची केंद्राकडे मागणी केली गेली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असूनही, न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता, एका रात्रीत केंद्राने प्रकरण सीबीआयकडे देऊन टाकले. मग, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची केवळ औपचारिकता तेवढी शिल्लक राहिली. ‘जनमताच्या आदरा’चा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. समर्थक न्यूज मीडिया आणि सोशल मीडियावरच्या ट्रोल्सना हा मोठाच सत्याचा विजय भासला. पुन्हा मैदान मोकळे झाले.

आता सगळ्यांची एकच दुश्मन. एकच खलनायिका उरली. रिया चक्रवर्ती. तिच्या खासगी आयुष्याचे धिंडवडे काढण्यास सुरुवात झाली. तिच्यासोबत तिच्या कुटुंबियांनाही मिनिट टु मिनिट टार्गेट केले गेले. यातून रियाकडे खाण्याचे पार्सल पोहोचवणारा पोरगाही सुटला नाही. रियाला विषकन्या, चेटकीण, लुटारू, नशेबाज, वाईटचालींची…अशी बरीच काही दूषणे दिली गेली. गंमत म्हणजे, सुशांत जिवंत असताना त्याचं लिव्ह-इनमध्ये राहणे सुशांतच्या कुटुंबाला, हिंदू असण्याचा अभिमान असल्याच्या त्याच्या तमाम सहानुभूतीदारांना कसे खपून गेले. यावर कोणी चकार शब्द काढला नाही.

‘पवित्र’ सीबीआयची टीम दिल्लीहून निघाल्यापासून मुंबईत उतरेपर्यंत आणि रिया, शोमित त्यांचे आर्मी ऑफिसर राहिलेले वडील यांना सीबीआय-ईडी-नार्कोटिक्स आदींनी ‘ग्रील’ करेपर्यंतच्या प्रत्येक प्रसंगात सीन क्रिएट’ होईल, थरारकता निर्माण होईल, जनसामान्यात एकाचवेळी तपास यंत्रणाबाबत धाक-दहशत निर्माण होत राहील, असे पाहिले गेले. यात पत्रकारितेचे धिंडवडे निघत गेले. सत्तासमर्थक चॅनेल्सनी यथेच्छ धिंगाणा घातला. दोष सिद्ध होण्याआधीच रिया चक्रवर्ती गुन्हेगार ठरून तीळातिळाने बहुदा मरत अनुभवत राहिली. सत्ताधाऱ्यांच्या कृपाशिर्वादाने लोकशाही मूल्यव्यवस्थेची अशी हत्या होत असताना, अॅक्टिव्हिस्ट वकील प्रशांत भूषण यांचा जेमतेम २५०-३०० शब्दांच्या तथाकथित बदनामीकारक ट्विट्सवर शंभरहून अधिक पानांचे निकालपत्र लिहिणाऱ्या व त्यांना १ रुपये दंडाची शिक्षा सुनावणार्या सर्वोच्च न्यायालयाला सुशांत प्रकरणात विद्वेषाची आग ओकणाऱ्या न्यूज चॅनेलची जराशीही दखल घ्यावीशी वाटली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवणारे प्रशांत भूषण देशाला धोका आहेत आणि समाजमन कलूषित करणारे, मीडिया-सोशल मीडियावरचे विखारी लोक सच्चे देशभक्त, असा हा संदेश. म्हणजेच, भूषण यांची अभिव्यक्ती गुन्हा आणि रिया चक्रवर्तीला न्यायालयाआधीच गुन्हेगार ठरवू पाहणारी अक्षम्य कृती अभिव्यक्तीचा खराखुरा अधिकार.

थो़डक्यात, सगळे काही पॅटर्ननुसारच चाललेले. यात कुणाला संशय येऊ नये, कुणाच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये आणि झाला तरीही तो फार काळ टिकू नये, म्हणून देवासमान, खरा तारणहार, अशी उत्तुंग प्रतिमा निर्माण केलेल्या हळूहळू साधूमहाराजांच्या गेटअपमध्ये शिरणाऱ्या विद्यमान पंतप्रधानांचे बागेतल्या मोरांना दाणापाणी घालतानाचे फोटो आणि व्हिडियो व्हायरल झाले. नव्हे, योजनेनुसारच ते व्हायरल करण्यात आले. त्यातून – ‘बघा, केवढा हा संतमाणूस. त्याची अंगची भूतदया बघा. संशय कसला घेताय, मुर्खांनो.’ असे ठसवून त्यांच्या हाताखालच्या यंत्रणादेखील तितक्याच पवित्र आहेत, रिया प्रकरणात जे चालले आहे ते योग्यच आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.

बडेबडे धुरंधर असलेल्या बॉलिवूडमधला सुशांतसिंग राजपूत हा एक नट. त्याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी बड्या बड्या तपास यंत्रणा, त्याही जनतेचा कररुपाने जमा होणाऱ्या पैशांचा चुराडा करून वापरून घेतल्या जातात. तेव्हा, हेतू फक्त सुशांतसिंग प्रकरणापुरता मर्यादित असेल, यावर कोण शहाणा माणूस विश्वास ठेवील. परंतु आता देशातल्या बहुसंख्य शहाण्या माणसांचे रोबो झालेत. या रोबोटिक शहाण्यांना देशात, त्यातही सुशांत प्रकरणात जे काही चालले आहे, ते उत्तमच चालले आहे, याची शंभर टक्के खात्री आहे. अशा या राजकारणातला सुसंस्कृतपणा, सभ्यपणा वेगाने नामशेष होत चालला असतानाच्या काळात गुन्हेगार असो वा नसो, तरीही तुम्ही एक स्त्री असणे, त्यातही रिया चक्रवर्ती असणे यासारखा मोठा दोष नाही. आणि मोठे दुर्दैवही नाही. कारण, रिया चक्रवर्ती ( ती खरोखर गुन्हेगार आहे, हे गृहित धरले तरीही) विरुद्ध अदृश्य स्वरुपात सत्ताधारी, दृश्य स्वरुपात सीबीआय, ईडी, बिहार सरकार, बिहार पोलीस, सत्ता समर्थक न्यूज मीडिया, ट्रोल आर्मीवाला सोशल मीडिया आणि या सगळ्यांच्या दुष्प्रभावाखाली असलेला समाज असा हा कमालीचा अन्याय्य असमतोल आहे.

गुन्हा सिद्ध होण्याआधीच आज रिया चक्रवर्ती निर्दयी झुंडींची बळी ठरतेय. उद्या दुसरी कुणी असेल. परवा कुणी तिसरी. जन्माची अद्दल घडवणे, कायमस्वरुपी धडा शिकवणे, स्वप्नातल्या राष्ट्राची निर्मिती करणे…अशी उदात्त उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून सत्तेच्या निर्घृण खेळात उतरणारी धर्म आणि राजकीय व्यवस्था कुणातच फरक करत नाही, हे जसे शेजारच्या धर्माधारित राष्ट्रांमध्ये एव्हाना सिद्ध झाले, तसे ते इथेही कालांतराने सिद्ध होत जाईल.

शेखर देशमुख, हे पत्रकार, लेखक आणि ग्रंथसंपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0