‘चळवळींचा आधार गेला’

‘चळवळींचा आधार गेला’

न्या. पी. बी. सावंत यांचा अनेकांशी संबंध होता. अनेक कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा स्नेह होता. पुरोगामी परिवर्तनवादी चळवळींशी ते सक्रियपणे जोडले गेलेले होते. त्यांच्या निधनाने अनेकांना आपला पाठीराखा, आधार गेल्याची भावना निर्माण झाली.

सबकुछ प्वाटिए, टू सर विथ लव्ह
केजरीवालांचे तीर्थक्षेत्रांचे राजकारण
बेपत्ता परमबीर सिंग अखेर मुंबईत दाखल

चळवळींचा आधार गेला  

न्या. पी. बी. सावंत यांच्याशी पहिला संपर्क पुण्यातील माझ्या दीर्घ वास्तव्यात सुलभाताईंमुळे (सुलभा ब्रह्मे)  आला. पहिली भेट सुलभाताईंच्या घरी झाली होती. सावंत सर म्हणजे डाव्या आणि परिवर्तनवादी चळवळीतील एक प्रभावी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व! एक प्रसन्न माणूस! त्यानंतर अनेक वेळा सावंत सरांशी सुलभाताईंबरोबरच भेटीगाठी आणि सखोल चर्चा झाल्या. सुलभाताई अचानक गेल्यानंतर शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालयाची जबाबदारी विश्वस्त या नात्याने मी, सुहास परांजपे आणि अमित नारकर यांच्यावर येऊन पडली. त्याचबरोबर सुलभाताईंनी मला आणि अमित नारकरला त्यांच्या मृत्यूपत्राचे व्यवस्थापक नेमून एक महत्त्वाची कायदेशीर जबाबदारीही आमच्यावर विश्वासाने टाकलेली होतीच. त्याची माहिती सावंत सरांना होतीच. अर्थातच त्याबाबत काय पावले उचलावीत ह्यासाठी सल्ला घ्यायचा तर सावंत सरांशिवाय दुसरे कोणाचे नाव सुचण्य़ाचा प्रश्नच नव्हता. त्यात नातेवाईक कशाप्रकारे अडथळे आणू पाहात आहेत याची माहितीही त्यांना कळल्यावर तेही व्यथित झाले होते. त्यात भर पडली सुलभाताईंच्या बंगल्यातील काही भाग ब्रह्मे ग्रंथालयाच्या विश्वस्त आणि स्टाफ़ला हाणामारी करून बेकायदेशीररित्या बळकावण्याचा प्रयत्‍न करू पाहणार्‍या एका गटाची. त्याबाबत सत्य कथन करणारे पत्रक प्रसृत करण्याची जबाबदारीदेखील सावंत सरांनी एस. पी. शुक्ल, कॉ. शांता रानडे, कॉ, भालचंद्र केरकर आणि डॉ. अनंत फ़डके यांच्याबरोबर घेतली होती. सावंत सरांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळीचा एक खंदा आधार निखळला आहे. ब्रह्मे ग्रंथालयाने एक सल्लागार, खंदा पाठिराखा आणि अत्यंत विश्वासू, प्रेमळ मित्र गमावला आहे. ही पोकळी न भरून येणारी अशीच आहे. न्या. सावंत सरांना लाल सलाम!

अद्वैत पेडणेकर – पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते

..

विवेकवादी विचारविश्वाची हानी

न्या. पी. बी. सावंत यांचे निधन झाल्याची बातमी नुकतीच समजली. गेले काही दिवस सर आजारी होते, हे माहीत होते. पण ही बातमी ऐकण्याची मानसिक तयारी नव्हती, अजूनही नाही. त्यांना नुसतेच सावंत सर म्हणता येणार नाही. न्या. सावंत हे खरेच न्यायमूर्ती होते. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचीच नाही, तर विवेकवादी विचारविश्वाची भरून न येणारी हानी झाली आहे. न्या. सावंत सरांच्या मोठेपणाबद्दल, योगदानाबद्दल लिहिण्याचा माझा वकूब नाही. ते औद्धत्य मी करू धजणारही नाही.

सावंत सरांशी मला व्यक्तिगत पातळीवर अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या नवख्या, वयाने आणि अनुभवाने लहान कार्यकर्त्याशीही ते मोकळेपणाने संवाद करत. त्यांच्या घरातच अनेकदा त्यांचा स्नेहाचा लाभ मला मिळाला आहे.

सध्याच्या धर्मांध आणि अतिउजव्या राजकारणाला पर्याय निर्माण करण्याची, त्यासाठी पर्यायी आर्थिक-राजकीय कर्यक्रम ठरवण्याची निकड सावंत सर वारंवार बोलून दाखवत होते. या पर्यायी कार्यक्रमाची मांडणी करण्यासाठी त्यांनी श्री. एस. पी. शुक्ल सरांबरोबर अनेकदा चर्चा केल्या होत्या. या दोघांनी या पर्यायी कार्यक्रमाच्या आखणीसाठी एक छोटी टीम केली होती. त्या टीमचा मीही एक सदस्य होतो. या निमित्ताने झालेल्या सावंत सरांच्या घरातल्या चर्चा आजही लख्ख आठवतात. प्रत्येक भेटीच्या वेळी सावंत सर आणि शुक्ल सर आम्हा इतरांपेक्षा अधिक तयारी आणि अधिक काम करून आलेले असायचे. मूलभूत गोष्टींबाबत सखोल विचार करून, अंतिम उद्दिष्ट काय असले पाहिजे आणि त्या उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी पर्यायी कार्यक्रमाचे व्यावहारिक टप्पे कोणते असतील, याची विद्वत्तापूर्ण चर्चा हे दोघे करायचे. माझ्यासाठी तर ही चर्चा ऐकायला मिळणे हेच मोठे होते. या चर्चांसोबत दरवेळी खायला चांगले पदार्थ आणि चहा… आणि सावंत सरांचा प्रेमळ आग्रह

न्या. सावंत तरुणांशी संवाद साधायला नेहमी उत्सुक असायचे. मी नॅशनल सेंटर फॉर अॅ़व्होकसी स्टडीज या संस्थेचा कार्यकारी संचालक असताना तरूण कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी काही कोर्स तयार केले होते. त्या कोर्समध्ये भारतीय न्यायव्यवस्थेवर बोलण्यासाठी न्या. सावंतांना बोलावले, तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता, तब्येत फारशी बरी नसतानाही, ते आमच्या ऑफिसच्या पायऱ्या चढून आले, मुलांसमोर २ तास मांडणी केली, चर्चा केली. बरं वाटलं, असं निघताना म्हणाले, तेव्हा मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं होतं.

ब्रह्मे ग्रंथालयाला तर त्यांचं नेहमीच पाठबळ लाभलं. त्याबद्दल आम्ही विश्वस्त त्यांचे कायमच ऋणी राहू.

न्या. सावंत सरांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीचा खंदा पाठीराखा आणि मार्गदर्शक हरवला आहे. व्यक्तिगत पातळीवरही त्यांची उणीव कायमच भासत राहील.

न्या. सावंत सरांना आदरांजली.

अमित नारकर – पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते.

..

आधारवड हरपला

सावंत सर गेले .माझा व्यक्तिगत अनुभव .पुणे शहरातील बेकायदा बांधकामांची चौकशी करायला सर्वच राजकीय पक्षांनी नकार दिल्यानंतर मी आणि मेजर जनरल (रिटा) जटार यांनी नागरीकांचा चौकशी आयोग नेमला होता. परिस्थिती इतकी बिकट होती की या आयोगाच्या कामकाजासाठी कोणी जागा ही द्यायला तयार नव्हते. त्यामुळे माझ्या घरी चौकशी आयोगाचं कामकाज केलं गेलं. अशा स्थितीत जस्टिस सावंत यांनी या आयोगाचे आयोगाचे अध्यक्ष पद स्विकारले आणि कामकाजही पूर्ण केले. भावपूर्ण श्रद्धांजली.

विजय कुंभार – माहिती अधिकार कार्यकर्ते

..

राज्यघटनेचा पाठीराखा

राज्यघटनेवर ज्यांची अढळ निष्ठा होती असे न्या. पी.बी.सावंत सर आज अनंताच्या प्रवासाला निघून गेले, त्यांना विनम्र आदरांजली.

इंदिरा साहनी सारखा खटला असो की अन्य खटले, न्यायव्यवस्था ही अंततः राज्यघटना आणि भारतीय समाजाला बांधील आहे हेच त्यांच्या निकालांमधून दिसलं आणि व्यक्तिगत आयुष्यातून सुद्धा!

केवळ न्यायमूर्तीच नाही तर कायद्याचे भाष्यकार, चळवळींचे मार्गदर्शक, धर्मनिरपेक्षता- समता- न्याय-स्वातंत्र्य या घटनात्मक मुल्यांवर अव्यभिचारी निष्ठा असलेले विचारवंत, मार्गदर्शक अशा अनेक भूमिकांमध्ये ते आयुष्याच्या अंतापर्यंत वावरले.

त्यांची उणीव सतत भासत राहील.

विश्वंभर चौधरी – पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते

..

सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते

न्यायमूर्ती पी बी सावंतांचे ‘राज्यघटना हाच राष्ट्रग्रंथ’ या विषयावर रमाईनगर ताडीवाला रोड पुणे येथे मी व्याख्यान आयोजित केले होते .डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटना निर्मितीमध्ये केलेल्या योगदाना बाबत त्यांनी अत्यंत प्रभावी भाषण केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाने झोपडपट्टीतील जनतेसमोर मनापासून बोलावे याचा आम्हाला खूप अभिमान वाटला.

सामाजिक न्यायाचे व समतेचे खंदे पुरस्कर्ते न्या.सावंत यांना भावपूर्ण आदरांजली.

जयदेव गायकवाड – माजी आमदार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0