फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत प्रसार भारती अंधारात

फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत प्रसार भारती अंधारात

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात शनिवारी मुंबईतील राजभवनात फडणवीस-अजित पवार यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाच्या झालेल्या शपथविधीची कल्पना प्रसार भारतीला देण्यात आलेली नव्हती असे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

राष्ट्रीय प्रसारणात असे सरकारचे कार्यक्रम दाखवण्याची मार्गदर्शक तत्वे आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबईतील राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनात गेल्या शनिवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार या दोघांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या कार्यक्रमाचे डीडी मुंबई व मुंबई दूरदर्शन या दोन वाहिन्यांवरून थेट प्रसारण करणे गरजेचे होते पण डीडी मुंबई व मुंबई दूरदर्शन केंद्राच्या कार्यालयाला या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली नाही त्यामुळे हे प्रसारण होऊ शकले नाही असा बचाव प्रसार भारतीने केला आहे.

नियमाप्रमाणे राज्यातील दूरदर्शनच्या केंद्रप्रमुखाने अशा कार्यक्रमाची माहिती केंद्रीय प्रसारण खात्याला द्यायची असते. ती दिली गेली नाही. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने राजभवनच्या कार्यालयाने तरी शपथविधी होणार आहे याची माहिती प्रसार भारतीला देणे गरजेचे होते ते दिले गेले नाही असे प्रसार भारतीचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांच्या प्रक्षेपणाची सक्ती

प्रसार भारतीने आखून दिलेल्या काही महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्याची सक्ती दूरदर्शन व ऑल इंडिया रेडिओवर आहे. त्यात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, कॅबिनेट शपथविधी सोहळा, सरन्यायाधीशांचा शपथविधी, राष्ट्रपतींचे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण, राज्यातल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, राज्यपालांचा शपथविधी, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांचा शपथविधी, राज्यपालांनी राज्य विधानसभेचे संयुक्त अधिवेशन बोलावल्यास, मुख्यमंत्र्यांचे मदत कार्यक्रमाचे दौरे अशा कार्यक्रमाचे प्रसारण करण्याचे आदेश आहेत.

मुंबई दूरदर्शनने वापरली एएनआयची दृश्ये

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सोहळ्याचे चित्रण करण्यास मुंबई दूरदर्शनचे पथक नसल्याने या वृत्तवाहिनीने त्या दिवशी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी प्रसारित केलेल्या बातम्यांमध्ये एएनआय या खासगी वृत्तसंस्थेची दृश्ये दाखवली. ही आमच्यावर आलेली नामुष्की असल्याची प्रतिक्रिया दूरदर्शनच्या एका वार्ताहराने दिली.

मूळ बातमी

COMMENTS