नवी दिल्लीः दोन ट्विट्सच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात दोषी ठरवलेले ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ देशभरातू
नवी दिल्लीः दोन ट्विट्सच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात दोषी ठरवलेले ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ देशभरातून सुमारे १५०० हून अधिक विधिज्ञांनी आवाज उठवला असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे.
न्यायालयाच्या अवमान केल्याची भीती वकिलांवर दाखवली गेल्यास त्याने सर्वोच्च न्यायालयाची ताकद कमी होईल पण तिच्या स्वातंत्र्यावरही त्याचा खोलवर परिणाम होईल, असे या विधिज्ञांचे म्हणणे आहे.
या संदर्भात विधिज्ञांनी एक पत्रकही काढले असून सर्वोच्च न्यायालयाने सुधारात्मक पावले उचलून न्यायाचे होणारे पतन थांबवावे अशीही विनंती न्यायालयाला केली आहे.
या पत्रकावर श्रीराम पंचू, अरविंद दातार, श्याम दिवाण, मेनका गुरुस्वामी, राजू रामचंद्रन, बिस्वजीत भट्टाचार्य, नवरोज सिरवई, जनक द्वारकावास, इक्बाल छागला, डेरियस खंबाटा, वृंदा ग्रोवर, मिहिर देसाई, कामिनी देसाई व करुणा नंदी अशा मान्यवरांच्या स्वाक्षर्या आहेत.
प्रशांत भूषण खटल्याचा निर्णय हा जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयाविषयीचा आदर वाढवणारा नसून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्या वकिलांच्या प्रेरणेवर तो आघात करणारा आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकांपासून अन्य मुद्द्यावर वकिलांचा बार समर्थनार्थ उभा असून न्याययंत्रणेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी हा वकीलवृंद नेहमीच बाजूने उभा आहे. त्यामुळे वकिलांचा आवाज दाबण्याच्या निर्णयाने न्यायालय खंबीर आहेत असा निष्कर्ष काढता येत नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.
न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजे न्यायाधीशांवरची टीका व त्यांच्या चौकशीची मागणी इतके मर्यादित नसून वकिलांनी सुद्धा आपल्यातील मर्यादा जनतेच्या पुढे आणणे महत्त्वाचे आहे. प्रशांत भूषण यांच्या विचारांशी अनेक जण सहमत नसतील पण आम्ही सर्व वकीलवृंद असे म्हणतोय की, भूषण यांनी कोणत्याही परिस्थितीत न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करण्याचा वा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला नाही. प्रशांत भूषण यांचे ट्विट नवे काहीच सांगत नाही. उलट न्यायालयाच्या कार्यप्रणालीबद्दल समाजात ज्या चर्चा सुरू असतात, सोशल मीडियात त्या व्यक्त होत असतात त्याचेच ते प्रतिबिंब असल्याचे या वकिलांचे म्हणणे आहे.
देशातील अन्य ३००० मान्यवरही भूषण यांच्या मागे
१५०० वकिलांव्यतिरिक्त दोन दिवसांपूर्वी देशातील सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश, निवृत्त सनदी अधिकारी व विविध क्षेत्रातील कार्यरत असणार्या ३००० जणांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने देशाच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा उद्देश भूषण यांचा होता, तो कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा अवमान करणारा नव्हता असे या मान्यवरांचे म्हणणे होते.
मूळ बातमी
COMMENTS