नवी दिल्लीः दोन ट्विटच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणातील दोषी विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यासंदर्भात सर्व वादप्रतिवाद संपले असून
नवी दिल्लीः दोन ट्विटच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणातील दोषी विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यासंदर्भात सर्व वादप्रतिवाद संपले असून सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. न्यायालयाने भूषण यांना माफी मागण्यास काय हरकत आहे, असा प्रश्नही विचारला. पण भूषण आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
या खटल्याची सुनावणी न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली होत असून त्यांच्या पीठात न्या. गवई व न्या. मुरारी हेसुद्धा आहे.
मंगळवारच्या सुनावणीत प्रशांत भूषण यांनी माफी मागणार नसल्याचे पुन्हा न्यायालयाला सांगितले. न्यायालय जी शिक्षा सुनावेल ती भोगण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर न्यायालयाने त्यांच्या विधानावर खंत व्यक्त केली. माफी मागण्यास काय हरकत आहे, असा सवाल करत न्यायालयाने तुम्ही माफी मागितल्यावर दोषी ठरत नाही, असा मुद्दा मांडला. माफी हा जादूई शब्द आहे. तो अनेक जखमा भरत असतो. आपण माफी मागितल्यास म. गांधींच्या श्रेणीत जाऊ बसाल. गांधी तसे करत होते. तुम्ही जर कोणाला दुखवत असाल तर त्याला मलम तुम्हीच लावले पाहिजे. असे करण्यात कोणताही कमीपणा वाटण्याची गरज नाही, असे न्या. मिश्रा म्हणाले.
या सुनावणीदरम्यान प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन यांनी, शिक्षा सुनावण्यापूर्वी भूषण यांची न्यायालयातल्या एकूण कारकिर्दीकडे व त्यांच्या कामगिरीवर नजर टाकावी अशी न्यायालयास विनंती केली. भूषण यांना सामाजिक हितासाठी अनेक संघर्ष केले आहेत, त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही मदत केली आहे, असे धवन म्हणाले.
त्यापूर्वी अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायव्यवस्थेवर यापूर्वी अनेक न्यायाधीशांनी टिपण्ण्या केल्याचे सांगत त्यांना कुणी सजा सुनावली नाही, असा मुद्दा मांडला. त्याला जोडून आपला मुद्दा मांडत धवन यांनी न्या. अरुण मिश्रा यांचाच दाखला दिला. न्या. मिश्रा कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायाधीश भ्रष्ट असतात असा आरोप केला होता. पण या विधानामुळे न्यायालयाचा अवमान झाला म्हणून न्या. मिश्रा यांनी कारवाई केली नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.
टीकेपासून न्यायालये अलिप्त राहू शकत नाही. भूषण यांनी केलेले विधान व्यवस्थित पाहिल्यास त्यांनी न्यायव्यवस्थेविषयी आपल्याला आदर असल्याचे त्यातून दाखवून दिले होते. आम्ही माफी मागत नसून न्यायालयाने आपला मोठेपणा दाखवून द्यावा असे धवन म्हणाले.
प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊन त्यांना शहीद करू नका, त्यांना शहीद व्हायचे नाही. त्यांना शिक्षा दिल्यास एक प्रकरण भूषण यांच्या शहीद व्हायचा होईल तर दुसरे प्रकरण न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत राहील. आम्हाला हा वाद संपवायचा आहे, आम्ही न्यायालयाकडून मोठेपणा मागत आहोत, असे धवन म्हणाले.
ही सुनावणी सुरू असताना न्यायालयाने भूषण यांना पुन्हा माफीचा विचार करावा म्हणून ३० मिनिटे दिली. पण भूषण आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
न्यायालय अवमानाचा २००९च्या खटल्याची सुनावणी १० सप्टेंबरला
दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण व तहलका या मासिकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील २००९ सालची सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणातील खटल्याची सुनावणी १० सप्टेंबरपर्यंत ढकलण्यात आली आहे. या खटल्यात अनेक मुद्द्यांचा उहापोह असून तो व्यापक असल्याने त्याची सुनावणी आपण २ सप्टेंबरला निवृत्त होत असल्याने, कमी कालावधीत होणे अशक्य असल्याने तो वेगळ्या पीठाकडे सोपवण्यात आल्याचे न्या. अरुण मिश्रा यांनी सांगितले.
२००९च्या खटल्यात प्रशांत भूषण व तरुण तेजपाल यांनी न्यायालयातील भ्रष्टाचारावर मत व्यक्त केले होते. २००९मध्ये प्रशांत भूषण यांनी तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल यांना एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून भूषण व मुलाखत प्रसिद्ध केली म्हणून तेजपाल यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप आहे.
मंगळवारी भूषण यांचे वकील राजीव धवन यांनी न्या. अरुण मिश्रा यांच्या पीठापुढे सांगितले की, भूषण यांनी मुलाखतीत उपस्थित केलेले मुद्दे घटनात्मक चौकटीत व्यक्त केले होते आणि त्यासाठी घटनात्मक पीठापुढे या खटल्याची सुनावणी होणे गरजेचे आहे. भूषण यांनी आपल्या अन्य एक वकील कामिनी जयस्वाल यांच्यामार्फत न्यायालयापुढे १० प्रश्न ठेवले व त्याचा निवाडा करण्याची विनंती केली.
मूळ बातमी
COMMENTS