पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदी काय करत होते?

पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदी काय करत होते?

एका आत्मघातकी हल्ल्यात चाळीसहून अधिक सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झालेला असूनही पंतप्रधान मोदींनी जन-संपर्क उपक्रम सोडून येण्याचे टाळले असा त्यांच्यावर आरोप झाला. डिस्कवरी चॅनलच्या ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमुळे या आरोपांची पुन्हा उजळणी होत आहे.

कथा दहशतवाद्यांची
गोंधळ घातला म्हणून १९ राज्यसभा खासदारांचे निलंबन
न्यूझीलंडमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात?

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेल्या भीषण हल्ल्याला काही महिने लोटले आहेत, मात्र १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:१० वाजता हल्ले झाल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजता ते उत्तराखंडमधील कॉर्बेट नॅशनल पार्कमधून बाहेर पडताना दिसले त्या दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदी नेमके काय करत होते, आणि त्यांना या हल्ल्याबद्दलची माहिती नेमकी केव्हा देण्यात आली हे अजूनही एक कोडेच आहे.

डिस्कवरी चॅनलवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमामुळे त्या दिवशीच्या मोदींच्या दिनक्रमाबद्दलचे प्रश्न पुन्हा समोर येतील असे दिसते. आत्मघातकी हल्ल्यात चाळीसहून अधिक सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झालेला असूनही पंतप्रधान मोदींनी जन-संपर्क उपक्रम सोडून येण्याचे टाळले असा विरोधी पक्षांचा त्यांच्यावर आरोप आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींचा ठावठिकाणा आणि कृती हे खूपच महत्त्वाचे आहे कारण त्यांच्या सरकारने त्या हल्ल्याला नेहमीचा दहशतवादी हल्ला मानले नव्हते. सीआरपीएफ ताफ्यावरील आत्मघातकी हल्ल्यामुळे त्याच्या मागे कुणाचा हात आणि उद्देश होता याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यातूनच भारतीय विमानदलाने पाकिस्तानात खोलवर जाऊन बाँबिंग केले आणि दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या दिवशी तातडीने सर्व लक्ष पुलवामा घटनेवर केंद्रित करण्याऐवजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मोदी कॉर्बेट नॅशनल पार्कमध्येच का थांबले, असे तिथे काय चालू होते?

डिस्कवरीवरील या कार्यक्रमाच्या विशेष भागात पंतप्रधान मोदी “पर्यावरणीय बदलांशी संबंधित समस्यांना” अधोरेखित करण्यासाठी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये पाण्यातून चालताना दिसतात. यातून या प्रश्नाचे आंशिक उत्तर मिळू शकते.

हा कार्यक्रम १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाईल आणि १८० पेक्षा जास्त देशांमध्ये तो दाखवला जाईल. “मला जेव्हा राजकारणाच्या पलिकडच्या जीवनावर केंद्रित असलेल्या विशेष कार्यक्रमाबाबत विचारले गेले – आणि तेही निसर्गाच्या सान्निध्यात – तेव्हा मला कुतूहलही वाटले आणि त्यात भागही घ्यावासा वाटला,” असे मोदी एका निवेदनात म्हणाले.

पण त्याहून मोठा प्रश्न असा आहे की: त्या दिवशी त्यांनी पंतप्रधान म्हणून असलेल्या आपल्या कर्तव्याला डावलून “निसर्गाच्या सान्निध्यात” राहण्याची निवड केली का?

पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच – ज्यामध्ये ४८ केंद्रीय राखील पोलिस दलाचे जवान मृत्युमुखी पडले आणि बाकी अनेक जखमी झाले – पंतप्रधानांनी कॉर्बेटमधली आपली सहल आटोपती घेतली नाही म्हणून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

मोदी “पुलवामा हल्ल्यानंतर तीन तास” चित्रीकरण करत होते असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

बेअर ग्रील्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

बेअर ग्रील्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

डिस्कवरी चॅनलचे आभारच मानायला हवेत, आता किमान आपल्याला एवढे समजले आहे की मोदी त्या दिवशी “आयुष्यातल्या एका महान साहसी सफरीवर” होते, ब्रिटिश रिऍलिटी टीव्ही स्टार बेयर ग्रिल्सकडून जीव वाचवण्याचे धडे घेत होते.

कार्यक्रमाचा प्रोमो युनायटेड नेशन्सद्वारे पुरस्कृत केला जात आहे. या प्रोमोमध्ये कुर्ता, पायजमा, सफारी जॅकेट आणि स्कार्फ अशा वेषात मोदी निर्जन जंगलात, गुडघ्याइतक्या उंचीच्या गवतात फिरत आहेत, एका निळ्या राफ्टवर पाण्यात तरंगत आहेत आणि एक सुरा, दोर आणि लाकडाचा तुकडा यांचा वापर करून एक शस्त्रही तयार करत आहेत.

वेळ

पुलवामा हल्ला दुपारी ३:१० ते ३:१५ या वेळात झाला. काही टीव्ही चॅनल वरील व्हिडिओ फूटेश आणि स्थानिक वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांनुसार मोदी कॉर्बेट नॅशनल पार्कमधून संध्याकाळी ६:४० ते ७:३० दरम्यान बाहेर आले.

द वायर मध्ये यापूर्वी देण्यात आलेल्या बातमीनुसार हल्ला झाला त्या वेळी मोदींची कॉर्बेटमधील भेटीला उत्तराखंडमधील वाईट हवामानामुळे अगोदरच अनेक तास उशीर झाला होता.

त्यांच्या अधिकृत वेळापत्रकानुसार, पंतप्रधान कॉर्बेटमध्ये सकाळी ९ वाजता येऊन दुपारी २ वाजता जाणार होते. म्हणून आपल्याला असे गृहीत धरता येते की डिस्कवरी चॅनलच्या कर्मचाऱ्यांना हा कालावधी चित्रीकरणासाठी देण्यात आला होता. मात्र, देहरादून येथील पावसाळी हवेमुळे, पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरचे प्रस्थान चार तासांनी लांबले.

त्या दिवशीचा अधिकृत कार्यक्रम

त्या दिवशीचा अधिकृत कार्यक्रम

त्या दिवसातील एक व्हिडिओ क्लिप – ज्यामध्ये मोदी नुकतेच हेलिकॉप्टरमधून बाहेर पडलेले दिसतात – सुमारे सकाळी ११:१५ वाजता कालागढ येथे चित्रित केला असावी अशी शक्यता आहे. तिथून ते बोटीमधून ढिकाला फॉरेस्ट गेस्ट हाऊसकडे गेले. द वायर ने याआधी शक्यता वर्तवली होती की डिस्कवरी चॅनलचे कर्मचारी ढिकाला येथे त्यांची वाट पाहत होते आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या आधीच त्यांचे चित्रीकरण पूर्ण झाले असावे.

मात्र, जिल्हा आणि नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी डिस्कवरीच्या चित्रीकरणाबद्दल नेमके तपशील देण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे मोदींनी या माहितीपटासाठी चित्रीकरण केव्हा केले, पुलवामा हल्ल्याच्या आधी की नंतर, की त्यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर, हे सांगणे अशक्य आहे.

हल्ल्यानंतर साधारण एका आठवड्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या प्रोटोकॉलची माहिती असणाऱ्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने द वायरला सांगितले होते की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांनी ती मोदींपर्यंत पोहोचवली नसेल अशी कल्पना करणेही कठीण आहे.

म्हणून, पंतप्रधानांना ३:१५ च्या बाँबिंगनंतर साधारण ३० मिनिटांच्या आत पंतप्रधानांना माहिती दिली असली पाहिजे. दुपारी १२ वाजता ते कॉर्बेटमधील ढिकाला येथे होते, आणि नंतर ढिकाला गेस्ट हाऊसमध्ये दुपारी १ पर्यंत पोहोचले होते, त्यांनी रुद्रापूर येथील भाजप रॅलीला दुपारी ५:१० वाजता फोनवरून संबोधित केले तेव्हा ते कॉर्बेट पार्कमध्येच थोड्या अंतरावरच्या खिनानौली गेस्ट हाऊसमध्ये गेले होते. हे सगळे गृहीत धरून असे म्हणता येते की मोदींना या घटनेबाबत माहिती होती.

मात्र त्या भाषणामध्ये त्यांनी पुलवामा हल्ल्याचा कोणताही उल्लेख केला नाही – हे विचित्र आहे कारण प्रचंड बहुमताने त्यांना निवडून देणाऱ्या २०१९ च्या सर्वसाधारण निवडणुकांसाठी संपूर्ण मोहिमेमध्ये पंतप्रधानांनी सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूची वारंवार आठवण करून देण्यात काहीही संकोच केला नव्हता.

म्हणजेच एक तर मोदींना पुलवामा हल्ल्याबाबत माहिती नव्हती, किंवा त्यांना काय झाले ते माहित होते आणि तरीही त्यांनी कॉर्बेट येथे डिस्कवरी चॅनलच्या कर्मचाऱ्यांबरोबर वेळ घालवला याचा पुरावा विरोधकांना मिळेल म्हणून त्यांनी त्याबाबत बोलण्याचे नाकारले.

शक्यता आहे की आपल्याला याचे स्पष्ट उत्तर कधीच मिळणार नाही. मात्र आता आपल्याला किमान एवढे माहित झाले आहे की त्या जीवघेण्या हल्ल्याच्या दिवशी, ते “भारतीय निर्जन जंगलांमध्ये साहसी सफरी”वर होते.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1