हरियाणा, पंजाबात शेतकऱ्यांची पुन्हा निदर्शने

हरियाणा, पंजाबात शेतकऱ्यांची पुन्हा निदर्शने

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन शेती कायद्यांविरोधात शेतकर्यांचे आंदोलन सोमवारी अधिक संघर्षमय दिसले. सोमवारी एक दिवस शेतकर्यांनी उपवास केला. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पण या उपवासाच्या आवाहनात आपल्या संघटनेचे समर्थन नाही, असे भारतीय किसान युनियन (एकता उग्रहान)ने स्पष्ट केले. पण पंजाब व हरियाणामध्ये शेतकरी संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने केली.

लुधियाना, पतियाळा, संग्रुर, बर्नाला, भटिंडा, मोगा, फरिदकोट, फिरोजपूर, तरणतारण या पंजाबमधील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. तर हरियाणात फतेहबाद, जिंद, सिरसा, कुरुक्षेत्र, गुरगांव, फरिदाबाद, भिवानी, कैथाल व अंबाला या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आक्रमक दिसले.

दरम्यान केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सरकार शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या संपर्कात असून या कायद्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेची नवी फेरी घेण्याच्या तयारीत आहे, असे सांगितले. शेतकरी नेत्यांनी चर्चेची तयारी दाखवावी व तसे सरकारला सांगावे असेही ते म्हणाले.

COMMENTS