राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

‘देशाची संरचनात्मक उभारणी करणाऱ्या सर्व संस्थांवर संघपरिवाराचे नियंत्रण आलेले आहे आणि त्यांचे उद्धिष्ट्य साध्य झालेले आहे. आपली लोकशाही आता मुळापासून कमजोर झाली आहे. ज्या देशात निवडणूका देशाचे भविष्य उज्ज्वल असावेत म्हणून होतात त्या देशात निवडणूका या केवळ उपचार झाल्या आहेत. आता आपल्यापुढे खरा धोका उभा राहिला आहे,’ असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

सत्तेवर पकड
उ. प्रदेश विधान सभा निवडणूकः काँग्रेसचा स्वबळाचा नारा
काँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार?

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत दारुण अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या राहुल गांधी यांनी बुधवारी आपण राजीनामा परत घेणार नाही असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत पक्षाला जे अपयश पाहावं लागले त्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून मी स्वीकारत आहे. आपला राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीने स्वीकारावा, मी काँग्रेसचा अध्यक्ष आता राहिलेलो नसून कार्यकारिणीने नवा अध्यक्ष निवडावा, असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

आपल्याला विरोधकांचा पराभव करायचा असेल तर सत्ता व अधिकाराचा त्याग करण्याची गरज आहे. तो त्याग नसेल तर विरोधकांचा पराभव अशक्य आहे. ही वैचारिक लढाई असून ती निर्नायकी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी आपले मनोगत ट्विटरवर चार पानात मांडले आहे. त्यांनी ट्विटरवरचे आपले प्रोफाइलही बदलले असून ते आता लोकसभा सदस्य इतके ठेवले आहे.

ट्विटरवरच्या चार पानात राहुल गांधी यांनी काँग्रेसला भविष्यात प्रगती करायची असेल तर या पक्षाची कोणीतरी जबाबदारी घेण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. मी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेतली आहे. पक्षाला यापुढे कठोर निर्णय घेण्याची गरज असून २०१९च्या पराभवाची जबाबदारी काहींनी घेण्याची वेळ आली आहे. मी स्वत: जोपर्यंत जबाबदारी घेत नाही तोपर्यंत दुसऱ्यांकडून जबाबदारी स्वीकारणे योग्य वाटत नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

मी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीला नवा अध्यक्ष निवडण्यास सांगितले होते. आणि या कामात माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन मी पक्षाला दिले होते, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

आपला संघर्ष केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही. भाजपच्याविषयी मनात कोणताही विद्वेष, मत्सर वा संताप नाही पण त्यांचे राजकारण ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या विरोधातील आहे. हा संघर्ष काही नवा नाही. या देशाच्या जमिनीवर हजारो वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. भाजपला जेथे असमानता दिसते तेथे मला समानता दिसते. भाजपला जेथे विद्वेष, मत्सर दिसतो तेथे मला प्रेम दिसते. ते ज्याला घाबरतात त्यांना मी आलिंगन देतो. आपला देश व आपली राज्यघटना यावर सततचे हल्ले झाल्याने हा देश जोडणारे धागे कमकुवत झालेले आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही किंमत देऊन आपण ही लढाई लढू, पण मागे हटणार नाही, असा निर्धार राहुल गांधी यांनी या पत्रात व्यक्त केला.

‘निष्पक्ष वातावरणात निवडणुका होण्यासाठी व्यवस्था या स्वतंत्र व निष्पक्ष असल्या पाहिजेत. केवळ स्वतंत्र प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था व पारदर्शी निवडणूक आयोगामुळे निवडणुका पारदर्शी होत नाही. कोणत्याही आर्थिक संस्थांवरही कुणा एका पक्षाचा एकाधिकार असता कामा नये.

२०१९ची निवडणूक कोणा एका पक्षाविरोधात लढली गेली नव्हती. तर विरोधी पक्षांच्या विरोधात भारत सरकारची जी पूर्ण यंत्रणा उभी करण्यात आली होती त्याविरोधात आमचा संघर्ष होता. आता आरशासारखे स्वच्छ दिसतेय की या देशात निष्पक्ष, स्वतंत्र अशा संस्था राहिलेल्या नाहीत,’ असेही मत त्यांनी व्यक्त केले.

देशाची संरचनात्मक उभारणी करणाऱ्या सर्व संस्थांवर संघपरिवाराचे नियंत्रण आलेले आहे आणि त्यांचे उद्धिष्ट्य साध्य झालेले आहे. आपली लोकशाही आता मुळापासून कमजोर झाली आहे. ज्या देशात निवडणूका देशाचे भविष्य उज्ज्वल असावेत म्हणून होतात त्या देशात निवडणूका या केवळ उपचार झाल्या आहेत. आता आपल्यापुढे खरा धोका उभा राहिला आहे. आता सत्ता मिळाल्याने देशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होईल. शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक यांना याची अधिक झळ बसेल. त्याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावे लागतील व देशाची प्रतिमा खालावेल. पंतप्रधानांना मिळालेल्या विजयामुळे त्यांनी केलेला भ्रष्टाचार नाकारला जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

भारताने आता लोकशाही संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी, त्यांच्या पुनर्उभारणीसाठी सज्ज राहिले पाहिजे आणि हे साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. हे साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाने स्वत:च्या रचनेत पूर्णपणे बदल केले पाहिजेत. आज भाजप सामान्य लोकांचा आवाज दाबत आहे. आपले कर्तव्य हे आहे की सामान्य लोकांच्या आवाजासाठी आपण रस्त्यावर आले पाहिजे. भारत हा कोणा एकाचाच आवाज नाही तर अनेकांचा आहे. या अनेकांच्या आवाजात येणारी समता हेच भारत मातेचे सार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1