रेल्वे, वाहन उद्योगातील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

रेल्वे, वाहन उद्योगातील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

रेल्वेमध्ये मोठी कामगार कपात शक्य

कर्मचाऱ्यांची संख्या १३ लाखांवरून १० लाख इतकी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे “शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, रोजच्या उपस्थितीचे रेकॉर्ड आणि शिस्त” यांच्या आधारावर ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याची शक्यता आहे. झी न्यूज च्या एका बातमीमध्ये असा दावा करण्यात आला आहे की “सर्व विभागीय व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे पुनरावलोकन करण्यास आणि त्या आधारे त्यांचा सेवा अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे.”

या बातमीनुसार, ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या, किंवा २०२० च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ज्यांची ३० वर्षे सेवा पूर्ण होईल अशा जवळजवळ तीन लाख कर्मचाऱ्यांना लवकर स्वैच्छिक निवृत्ती घेण्यास सांगितले जाऊ शकते.

“आम्ही नियमित कालांतराने करत असलेल्या पुनरावलोकनाचाच हा भाग आहे, ज्यामध्ये ज्यांची कामगिरी आवश्यक दर्जाची नाही किंवा ज्यांच्या शिस्तपालनासंबंधी समस्या आहेत अशांना लवकर निवृत्तीचा प्रस्ताव दिला जाईल. हे सरकार याबाबत खूपच गंभीर आहे,” असे एका सूत्राने पीटीआयला सांगितले.

या महिन्यात आधी, रेल्वेच्या सात उत्पादन विभागांचे खाजगीकरण करण्याच्या आणि खाजगी क्षेत्राचा हस्तक्षेप वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात देशभर आंदोलने करण्यात आली. द वायरने मोदी सरकारच्या रेल्वेसाठीच्या १००-दिवसांच्या कृती योजनेच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांबाबत यापूर्वी बातमी दिली होती.

वाहन उद्योग क्षेत्रातील मंदी : १८ महिन्यांमध्ये ३२,००० नोकऱ्या गायब

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) कडून मिळालेल्या माहितीनुसार देशभरात वाहन उद्योग क्षेत्रातील २८६ डीलरनी आपले कामकाज थांबवले आहे. यामुळे ३२,००० नोकऱ्यांवर परिणाम झालेला असू शकतो, असे बिझनेस स्टँडर्डच्या बातमीत म्हटले आहे. व्यवसाय चालवण्याच्या खर्चातील वाढ आणि कमी होत चाललेले नफ्याचे प्रमाण ही यामागची कारणे असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, उद्योग पुन्हा उसळी मारेल आणि “पुढच्या दशकात भारतीय वाहन उद्योगात वृद्धी पहायला मिळेल” अशी आशा FADA ला वाटते.

ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ACMA) यांनीही अलीकडेच या क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली. मंदी दीर्घकाळ राहिली तर दहा लाख नोकऱ्यांवर गदा येऊ शकते असा इशारा त्यांनी दिला.

COMMENTS