राज ठाकरे सीएएच्या समर्थनार्थ मैदानात

राज ठाकरे सीएएच्या समर्थनार्थ मैदानात

अखेर राज ठाकरे यांनी मोकळ्या झालेल्या हिंदुत्त्वाच्या जागेवर आपला दावा सांगितला.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर गेल्याने मोकळ्या झालेल्या हिंदुत्त्वाच्या जागेचा राज ठाकरे यांच्या मनसेने ताबा घेतला आहे. तसेच बांग्लादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्यासाठी ९ फेब्रुवारीला मुंबईमध्ये मोर्चा काढणार असल्याचेही राज ठाकरे जाहीर केले.

राज ठाकरे म्हणाले –

“मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन.”

“हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? अशी चर्चा सुरु आहे. मी पहिल्या सभेतच सांगितलय, की देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत. आम्ही अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांना नाकारु शकत नाही.”

“जे इथे येऊन धिंगाणा घालणार तर मी आडवाच जाणार. रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळी आमच्या पोलिसांवर हात टाकला होता त्यावेळी मोर्चा काढणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पक्ष होता. हिंदी सिनेसृष्टीत पाकिस्तानी कलाकार धिंगाणा घालत होते. त्यावेळी त्यांना हाकलण्याचे काम मनसेनं केलं. त्यावेळी कोणी मला हिंदुत्वाच्या मार्गाने चाललोय हे विचारलं नाही.”

“आपण ज्वालामुखीवर बसलेलो आहोत. त्यामुळे भारतात बेकायदारित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांना इथून हाकलून दिलचं पाहिजे. त्यासाठी मी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहे.”

“महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये बाहेरच्या देशांमधले मौलवी जातात आणि तिथे जाऊन काय करतात ते माहीत नाहे. पोलिसही आत जाऊ शकत नाहीत. तिथे काय शिजतय हे कळत नाहीय. पण पोलिसांच्या माहितीनुसार प्रचंड काहीतरी मोठं घडवण्याचं कारस्थान रचलं जातयं. ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळे हात देण्याची गरजेच आहे.”

“आमची आरती त्रास देत नाही, तर तुमचा नमाज का त्रास देतो?”

“बांगलादेश आणि पाकिस्तानातून येणारे घुसखोर हा मोठा धोका आहे. कुणीही यायचं आणि इथे यायचं आपला देश म्हणजे काय धर्मशाळा आहे का? बांगलादेशातून भारतात यायचं असेल तर फक्त अडीच हजार रुपये लागतात. पाकिस्तानातून येणारेही नेपाळमार्गे येत आहेत. माझं केंद्राला सांगणं आहे पहिल्यांदा समझौता एक्सप्रेस बंद करा.”

“असेच उभे राहिलेले अनेक मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर आपल्याला आतच लढावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयावर टीका केली मात्र जी गोष्ट योग्य वाटली तेव्हा मी अभिनंदनही केलं.”

“राम मंदिर, कलम ३७० या निर्णयांवर मी मोदी सरकारचं अभिनंदनही केलं आहे, कारण मी माणुसघाणा नाही. बाहेरुन आलेल्यांना का पोसायचं? हे लोक कोण आहेत? कुठे आहेत याची पूर्ण माहिती पोलिसांकडे आहे.”

“मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर माझा प्रचंड विश्वास आहे. एकदा ४८ तासांसाठी त्यांना मोकळा हात द्या बघा ते काय करु शकतात. सीएए, एनआरसी वरुन अनेक मुसलमान रस्त्यावर आले. या मुसलमानांच्या मनात राम मंदिर आणि कलम ३७० बाबतचा राग आहे. त्या मोर्चांमधून राग व्यक्त केला गेला. आता मी हे विचारतो आहे की त्यात इथले मुसलमान किती आहेत? बाहेरच्या मुसलमानांना इथले मुसलमान साथ देत असतील तर आम्ही का साथ द्यायची तुमची.?”

लवकरच देशाच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्याना भेटून त्याबद्दल माहिती देणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. बाहेरच्या देशातून आलेले मुस्लिम परत पाठवणं गरजेचं आहे. या देशात जे वातावरण मोर्चांनी उभं राहिलं. त्याला मोर्चाने उत्तर देणार, असे त्यांनी सांगितले. बांगलादेश, पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांना परत पाठवण्यासाठी नऊ फेब्रुवारीला मनसे महामोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS