राज्यसभा मार्शलच्या नव्या गणवेशाच्या चौकशीचे आदेश

राज्यसभा मार्शलच्या नव्या गणवेशाच्या चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : लष्करातील अधिकाऱ्यांसारखा गणवेष राज्यसभेतील मार्शलांना दिल्यावर भारतीय लष्करातील काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर या निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश मंगळवारी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना द्यावे लागले.

सोमवारी संसदेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा राज्यसभेतले मार्शल नव्या गणवेशात आलेले दिसले. लष्करातील अधिकारी जी ‘पी कॅप’ वापरतात तशी ‘पी कॅप’ या मार्शलच्या डोक्यावर दिसत होती तसेच त्यांचा गणवेशही सुरक्षादल वापरतात तसा होता. या गणवेशाचा रंग गर्द हिरवा होता.

या बदललेल्या गणवेशावरून चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी या बदललेल्या गणवेशावर मत व्यक्त करताना हा महत्त्वपूर्ण बदल असल्याचे मत व्यक्त केले. त्यावर सभापतींनी, तुमचे म्हणणे ठीक आहे, तुम्ही महत्त्वाच्या वेळी महत्त्वाचा मुद्दा मांडता असे उत्तर दिले. तर माजी लष्करप्रमुख वेद मलिक यांनी एक ट्विट करून राज्यसभेतील मार्शलना लष्करासारखा गणवेश देणे हा कायद्याचा दुरुपयोग असून हा बदल राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक आणि तो योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. वेद मलिक यांनी राष्ट्रपती कार्यालय, संरक्षणमंत्री, उपराष्ट्रपती कार्यालय, राज्यसभेला मार्शलना दिलेला गणवेश बदलण्याची विनंती केली.

याच प्रकारची विनंती निवृत्त कर्नल रोहीत देव, निवृत्त लेफ्ट. जनरल एचएस पनाग यांनीही केली. मार्शलना दिलेला नवा गणवेश अयोग्य आहे व त्याचा दुरुपयोग होऊ शकतो असे सांगून हा गणवेश बदलण्याची विनंती या माजी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतीभवन, पंतप्रधान, वेंकय्या नायडू यांना ट्विटद्वारे केली.

मूळ बातमी

COMMENTS