औंधमध्ये कष्टकऱ्यांचं रक्षाबंधन!

औंधमध्ये कष्टकऱ्यांचं रक्षाबंधन!

पुणे: हातावर रक्षेचे बंधन बांधलेले नसतानाही जे समाजाच्या रक्षणाचे काम अविरत करत असतात अशा लोहिया नगर येथील साफसफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला, औंध जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, शिपाई यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

लोकायत नागरी समिती व सहकार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोहिया नगर  येथील आरोग्य कोठी, अंगणवाडी व औंध जिल्हा रुग्णालय येथील कष्टकऱ्यांचं रक्षाबंधन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

शहराला स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या साफसफाई कामाला नेहमीच खालच्या दर्जाचे म्हणून पाहिले जाते. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जावा या भूमिकेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बहीण भावाच्या नात्यापलीकडे समाजातील कष्टकऱ्यांबरोबर रक्षा बंधन साजरे केले याचा आनंद झाला असे स्थानिक रहिवासी असलेल्या प्रतीक याने सांगितले. तर साफसफाई काम करणाऱ्या चंद्रकलाताईं म्हणाल्या की आमच्या कामाची कोणीतरी दखल घेतली तसेच या समाजात काही प्रमाणात का होईना पण संवेदनशील मनाची माणसं आहेत याचा आनंद वाटतो. कारण आमच्याकडे आणि आमच्या कामाकडे नागरिक ज्या दृष्टीने पाहतात त्यावरून असे वाटते की आमचा काही आत्मसन्मान आहे की नाही.

तसेच औंध जिल्हा रुग्णालय येथील कार्यक्रमात महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन टीळेकर म्हणाल्या की आम्हाला फ्रंट वॉरियर्स म्हणून संबोधलं जातं पण कोविड दरम्यान आम्हा कर्मचाऱ्यांना घर मालकांनी घरे सोडायला सांगितली. संकटाच्या काळी समाजाने आम्हाला खूप ठिकाणी बहिष्कृतपणे वागवले. महिला कर्मचाऱ्यांच्या अडचणी तर बोलू तेव्हढ्या कमी आहेत.

यावेळी पोलीस कर्मचारी, साफसफाई-घरकाम करणाऱ्या महिलांनी एकमेकांना राख्या बांधल्या. समाजातील प्रस्थापित भाऊ बहिणीचे रक्षण करेल या अर्थापलीकडे जाऊन या सणाला व्यापक अर्थ देऊन प्रत्येकाने एकमेकांचे रक्षण करावे असा संदेश यावेळी उपस्थितांनी दिला.

‘आभाळाची आम्ही लेकरे’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागरी समितीच्या निमंत्रक ॲड. मोनाली अर्पणा यांनी प्रास्तविक केले. आरोग्य कोठीचे मुकादम संजय घोडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

COMMENTS