राम जेठमलानी – निष्णात पण वादग्रस्त कायदेतज्ज्ञ

राम जेठमलानी – निष्णात पण वादग्रस्त कायदेतज्ज्ञ

ज्येष्ठ वकील, माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा लेख.

कॉलेजमध्ये असताना राम जेठमलानी यांच्या नावाची जादू आम्हा अनेकांवर होती. अनेक वादग्रस्त केसेस चालविणारे वकील नेहमीच आकर्षणाचा विषय असतात. मोठ्या गुन्हेगारांच्या केसेस चालविणारे हुशार असतात असाही समज असतोच. राम जेठमलानी खरोखरच हुशार होते. कायद्याच्या क्षेत्रात त्यांची दादागिरी चालायची, स्वतःबाबत आदर आणि वचक सुद्धा त्यांनी तयार केला होता. त्यांच्याबद्दल असलेल्या अनेक दंतकथांमुळे भारतातील अनेक न्यायालयांमध्ये व समाजात सुद्धा कुणी जास्त हुशारीने बोलायला लागला की, ‘ मोठा आला राम जेठमलानी’ किंवा ‘ तू काय स्वतःला राम जेठमलानी समजतो का? ‘ असे डायलॉग ऐकू यायचे. आपल्या सगळ्या क्षमतांचा व स्वतःभोवती तयार केलेल्या वादविवादांचा नेमका फायदा घेत, राम जेठमलानी यांनी कायदा, राजकारण व समाजकारण अशा सगळ्या क्षेत्रात उच्च पदे मिळवली.

साधारणतः १२-१३ वर्षांपूर्वी असेल. दिल्लीतील ‘इंडिया हॅबिटॅट सेंटर’ येथे सौम्या उमा यांनी ‘इंटरनॅशनल क्रीमीनल कोर्ट (ICC)’ याविषयावर चर्चा आयोजित केली होती. कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरू होणार होता. मला सकाळी लवकर उठायची सवय असल्याने, मी अगदी वेळेवर तिथे पोहोचलो. सौम्या तिथे बॅनर्स वगैरे लावत होत्या. तेवढ्यात अगदी वेळेवर राम जेठमलानी सर आले. अजून कुणीच इतर आलेले नव्हते. तिने त्यांचे स्वागत केले व माझी ओळख करून दिली. तिने मला त्यांच्याशी बोलत बसायला सांगितले. काही वेळ बोलल्यावर मी त्यांना सहज म्हणालो, की तुम्ही न्यायालयात इतक्या बदमाश, नामचीन, भ्रष्टाचारी लोकांची बाजू मांडता, त्याचा तुमच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम होतो, असे वाटत नाही का? आणि तुमच्या भूमिका संभ्रम निर्माण करणाऱ्या वाटतात. तर ते उसळल्यासारखे थोडे मोठ्या आवाजात म्हणाले, ‘ मला त्याची काळजी नाही आणि तुम्ही सुद्धा काळजी करू नका’. त्यावेळी त्याच्या चेहरा आणि गळा यांना जोडलेले मासाचे स्नायू हलत होते व त्यांचा चेहरा सुद्धा लगेच लाल झाला होता. कदाचित त्यांना राग आला होता माझ्या प्रश्नाचा. पण हेच होते राम जेठमलानी. लगेच चिडणारे, राग येणारे आणि राग व्यक्त केल्यावर स्वतःच शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न करणारे. ते म्हणाले की ‘let’s talk on some agreed points young man, it is nice morning today’. नंतर ते म्हणाले, की भारताने आंतराष्ट्रीय न्यायालयाचा सदस्य जरूर व्हावे. पण त्यासाठी योग्य वेळ निवडावी लागेल. ICC चा स्विकार करतांना भारताचा सामाजिक, राजकीय विचार करावा लागेल. भावनिक पद्धतीने केवळ पुरोगामी देश होण्याची घाई करून चालणार नाही. पण फौजदारी न्यायव्यवस्था व्यापक होण्यासाठी ICC सारख्या पर्यायांचा नक्कीच भविष्यात विचार करावा लागेल.

त्यानंतर अनेकदा त्यांच्याशी माझा खूप अल्प असा संवाद सुरू होता. एकदा पिंपरी- चिंचवड येथील एका कार्यक्रमात मला त्यांच्या हस्ते काहीतरी पुरस्कार मिळाला होता.

इंदिरा गांधींचा खून करणाऱ्या अतिरेक्यांची केस त्यांनी घेतली होती आणि शक्य तो सगळा युक्तिवाद आरोपींना वाचविण्यासाठी केला. लोकांच्या भावना अत्यंत नाजूक झाल्या होत्या आणि तरीही सगळ्यांना न्यायालयात आपली बाजू मांडायला संधी मिळाली पाहिजे, हे राम जेठमलानी यांनी ठासून सांगितले. सर्वोच्च व उच्च न्यायालयात हे सांगणे सोपे असते. पण स्थानिक सत्र न्यायालयात हे सांगणे व करणे सहज शक्य नसते. अजूनही अनेक बार असोसिएशन एखाद्या आरोपीची केस कुणीच चालवू नये, इत्यादी ठराव संमत करतात. आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलांना मारतात. तेव्हा आपण कधी विकसित होणार असा प्रश्न पडतो.

हर्षद मेहता, केतन पारेख व लालकृष्ण अडवाणी यांची हवाला केस, अशा मोठ्या आर्थिक गुन्ह्यांच्या केसेस राम जेठमलानी यांनी आरोपींना वाचविण्यासाठी चालविल्या. राजीव गांधी खुनाच्या केसमध्ये त्यांनी आरोपींची बाजू मांडली. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुच्या फाशीच्या प्रकरणातही ते बचाव करत होते.  वारेमाप व बेहिशोबी संपत्ती जमा करणाऱ्या जयललिता यांची केस असेल किंवा टू जी (2G) स्कॅम मधील कनिमोळी यांची केस किंवा लालूप्रसाद यादव चारा घोटाळा केस असेल. किंवा सोहराबुद्दीन खुनाच्या केसमध्ये अमित शाह यांची बाजू मांडणे असेल.

दरवेळी ती केस चालविण्याबरोबरच राम जेठमलानी राजकीय यशाची शिडी सुद्धा चढले आहेत. राज्यसभेत वारंवार निवडून येण्यापासून तर भाजपने त्यांना विविध मंत्रीपदांवर विराजमान करीत भारताचे कायदा मंत्री पद देण्यापर्यंतचा प्रवास आपण बघू शकतो. सहाव्या व सातव्या लोकसभेत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कायदामंत्री आणि नगरविकास विभागाचे मंत्रिपद भूषविले होते. असे असतांनाही जेठमलानी यांनी सन २००४ मध्ये लखनऊमधून अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. राजकीय जवळीकीमुळे एखाद्या वकिलाची थेट सर्वोच्च न्यायालयात नेमणूक होणे, उच्च न्यायालयातून लवकर सर्वोच्च न्यायालयात बढती मिळणे आणि अनुभव असला तरीही मोठ्या राज्याच्या उच्च न्यायालयातून छोट्याश्या राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी कुणाला तरी ढकलणे, हे आता सुद्धा वाढले आहेच व पक्षही तोच आहे. व्यवस्थेतील भ्रष्टाचार आपल्या फायद्यासाठी वापरण्यात वाकबगार लोक न्यायव्यवस्था व राजकीय हस्तक्षेप वाढवीत आहेत. यावरही राम जेठमलानी सुद्धा जाहिरपणाने बोलले हे विशेष. सतत भूमिका बदलणे व अगदी वेगळीच सोईस्कर भूमिका घेणे यासाठी सुद्धा राम जेठमलानी प्रसिद्ध होते.

उमेदीच्या काळात नानावटी खून खटला चालवून खळबळ उडवून देणाऱ्या राम जेठमलानी यांनी नंतर शेवटच्या काळात जेसिका लाल केस मध्ये आरोपींची बाजू मांडली तशीच सराईत आसाराम बापुची केस सुद्धा त्यांनी चालविली होती. लहान मुले व मुलीच आसाराम बापूला स्वतःकडे आकर्षित करतात व आसारामची जणू काहीच चूक नाही असा मनोरंजक युक्तिवाद सुद्धा याच राम जेठमलानी यांनी केला होता हे विशेष. तर नानावटी केसमधून क्षणार्धात येणारा राग (sudden provocation) म्हणजे काय यावर विस्तृत चर्चा घडवून आणत ‘अचानक येणारा राग’ म्हणजे काय, याची नवीन व्याख्या भारतीय कायद्यात प्रस्थापित करण्यात सहभाग असलेले सुद्धा हेच राम जेठमलानी आहेत हे लक्षात ठेवावे लागेल.

२०१७ साली आता मी कायद्याच्या क्षेत्रातून नियुक्ती घेत आहे आणि आता मला भ्रष्टाचारा विरोधात लढायचे आहे असे जाहीर करून, पुन्हा त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. ‘पवित्र हिंदुस्थान कझाकम’ नावाचा राजकीय पक्ष सुद्धा त्यांनी काढला होता. मोदींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी काही विधाने सुद्धा त्यांनी जाहीरपणे केली. त्याच वेळी संडे इंडियनमध्ये ते लिहीत असलेल्या त्यांच्या सदरातून मोदींच्या परदेश वाऱ्यांची मनभरून स्तुती करीत त्यांनी मोदींच्या सततच्या परदेश दौऱ्यांमुळे भारताची राष्ट्र उभारणी होते आहे, असे सुद्धा लिहिले. पण मंद होत जाणाऱ्या जीवन वाटेरील प्रवासी म्हणून नंतर त्यांच्या वक्तव्यांकडे गंभीरतेने बघणे समाजाने कमी केल्याचे दिसून आले. Concisenc of Maverick म्हणजे बेलगाम माणसाचा विवेक अशा नावाचे पुस्तकच राम जेठमलानी यांच्या जीवनावर काढण्यात आले आहे, इतके राम जेठमलानी त्यांच्या थेट आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.

सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक फी घेणारे म्हणून दबदबा निर्माण करणारे राम जेठमलानी एक निष्णात कायदेतज्ज्ञ म्हणून नेहमी अढळस्थानी राहतील. १७ व्या वर्षी कायद्याची डिग्री मिळवून कायद्याच्या क्षेत्रातील अनेक उच्च पदांवर विराजमान होण्यासाठी, त्यांनी केलेली मेहनत व निर्भयपणाने मत मांडण्याची शैली नक्कीच शिकण्यासारखी होती.

अॅड. असीम सरोदे, हे संविधान तज्ज्ञ असून, मानवीहक्क विषयक वकील आहेत.

COMMENTS