मुक्त आवाज

मुक्त आवाज

भारतीय राजकारण आणि समाजकारण, समाजमनाचे वास्तवापासून खंडित झालेले भान, भयाने दबलेले आवाज, आणि अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर छोट्या छोट्या वंचित समूहांवर होणारे अन्याय याची जाण असणारे, रवीश कुमार हे बहुधा एकमेव भारतीय पत्रकार असावेत.

सामूहिक पडझडीच्या काळात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनाही आपला आशावाद कायम ठेवत असतात. जगण्याची उमेद कायम ठेवायला मदत करतात आणि आपल्या सभोवतालचे जग कितीही वेगाने विच्छन होत असले तरी; जोवर कुठेतरी एक आवाज एका कोपऱ्यातून विवेकाचा आवाज जागवत ठेवत असतो, तो आवाज चांगुलपणावरचा आपला विश्वास कायम ठेवायला मदत करत असतो. आजच्या काळात असा आवाज आपल्याला रवीश कुमार यांच्या रूपात ऐकायला मिळतो. बहुसंख्य मीडिया चॅनेल्स सत्तेच्या वळचणीला बांधले जाण्याच्या काळात, सत्तेविरूद्ध लेखणी आणि आपला आवाज बुलंद करणाऱ्या या पत्रकाराला शुक्रवारी  ‘रेमन मेगसेसे’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अनेक भारतीयांना हा पुरस्कार जणू आपल्यालाच मिळाला आहे अशा भावनेतून विलक्षण आनंद झाला. जनसामान्यांच्या मनात अशी भावना निर्माण करू शकणारा पत्रकार आजच्या काळात फार विरळा म्हणावा लागेल.

रवीश कुमार यांच्याबाबत ज्येष्ठ हिंदी लेखक आणि कवी पंकज चतुर्वेदी लिहितात; “रवीश कुमार फार सर्जनशील, प्रयोगशील, संवेदनशील आणि मूल्याधिष्ठीत टेलिव्हिजन पत्रकारिता करतात. टीव्ही स्क्रीनवर बातम्यांचे विश्लेषण करत असताना, तिची रचना कशी करावी हे कुणीही त्यांच्याकडून शिकावं. त्यांना ऐकत आणि पाहत असताना असं वाटतं, जणू एक महान कवी पत्रकार बनला आहे. “निर्भीड आणि सखोल विश्लेषण करणारे पत्रकार अशी रवीश कुमार यांची ओळख आहे. व्यवस्थेने ज्या लोकांचे आवजच हिरावून घेतले आहेत, अथवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून एक प्रकारचा सांस्कृतिक बहिष्कार घातला आहे अशा अतिसामान्य घटकांचेही रवीश कुमार आवाज बनले आहेत. मात्र रवीश कुमार यांची ओळख केवळ एक निर्भीड पत्रकार एवढी मर्यादित नाही. त्यांच्या ‘प्राईम टाइम’ या कार्यक्रमात जेएनयू प्रकरणावर लाईव्ह चर्चा करताना, बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानांचे दाखले देणारे रवीश कुमार, नद्यांच्या स्वच्छतेसंबंधी बोलत असताना ‘काका कालेलकर’ यांचे ‘जीवनलीला’ हे भारतीय नद-नद्या, सरोवरे, प्रपात यांवर लिहिलेले पुस्तक वाचा अशी कळकळीची विनंती करणारे रवीश कुमार, श्रीलाल शुक्ल यांच्या ‘राग दरबारी’ या कादंबरीवर तळमळीने बोलणारे रवीश कुमार, जेएनयू प्रकरणात सारी माध्यमं कन्हैया कुमार, उमर खालिद यांना देशद्रोही ठरविण्यात व्यस्त असताना त्यांना स्पेस देणारे रवीश कुमार अशी त्यांची अनेक रूपं प्राईम टाईमच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. भारतीय साहित्याविषयी आणि भाषांविषयी त्यांना असणारे ममत्व तर विलक्षण सुखावणारे असे आहे.

रवीश कुमार टीव्ही पत्रकारिता कितीही उत्तमरीत्या करत असले तरी, त्यांचा मूळ पिंड हा श्रेष्ठ लेखकाचा आहे हे त्यांच्या शैलीतून सतत जाणवत राहते. ‘इश्क में शहर होना’ या कथा संग्रहातून त्यांनी आपले श्रेष्ठ लेखकत्व सिद्धही केले आहे. अवास्तव कथांपासून दूर मेट्रोच्या गर्दीत, मोहल्ल्यात उमलणाऱ्या रवीश कुमार यांच्या या प्रेमकथा आधुनिक काळच्या अस्सल प्रेमकथा आहेत.

रवीश कुमार हे केवळ वास्तवाचे प्रखर निरूपण करणारे पत्रकार नाहीत; त्यांचे सामाजिक विषयावरील चिंतन आणि त्यांचा वैचारिक पाया अतिशय मजबूत आहे. मागील वर्षी त्यांचं ‘The free voice’ हे पुस्तक प्रकाशित झालं, आणि एक पत्रकार आपल्या कामाशी किती खोलवर बांधिलकी बाळगू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आजच्या बिघडलेल्या राजकीय स्थितीची मुळं ही नागरिकांच्या मनात दडलेल्या भीतीत आहेत असं सांगताना ते लिहितात, “तुमचं भय जिथे संपतं तिथून सत्तेच्या उतरंडीवर उच्चस्थानी बसलेले लोक कामाला लागतात. तुम्ही एका भयातून मुक्त होता पण ते दहा भयांचे सापळे तुमच्या भोवती लावतात. धैर्य म्हणजे एका भीतीतून मुक्त होऊन दुसऱ्या भीतीच्या वर्तुळात शिरून तिथून पुन्हा तिसऱ्या भयातून मुक्त होण्याचा निरंतर संघर्ष असतो.’

या पुस्तकातील अशा अनेक ओळी आपल्याला विसाव्या शतकातील थोर विचारवंत ‘एरिख फ्रॉम’ यांच्या विचारांचं स्मरण करून देतात. तत्त्वचिंतक पत्रकार हे अभावानेच आढळणारे मिश्रण रवीश कुमार यांच्या रूपात आपल्याला गवसले आहे.

याच पुस्तकात रवीश कुमार यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे, ‘फेक न्यूज’. वरवर फेक न्यूज ही सामान्य बाब वाटत असली तरी व्यापक स्तरावर होत असलेल्या तिच्या दुरुपयोगाने सरकारे निर्माण करण्याची वा बदलण्याची ताकद तिला प्राप्त झाली आहे हे विसरून चालणार नाही असे ते म्हणतात. “फेक न्यूज हे सत्ताधाऱ्यांचे एक अवजार आहे. त्याचा वापर करून नागरिकांना एका वेगळ्या वास्तवात ढकललं जातं. तिथे त्यांना आपल्या अस्सल आणि तातडीच्या प्रश्नांचा विसर पडतो. रचलेल्या राष्ट्रीय चिंतांचा सामना त्यांना तिथे करावा लागतो. जे नागरिक या डावाला बळी पडतात, ते स्वतःचं मोठं नुकसान करून घेतात. त्यांचा भौतिक, बौद्धिक, नैतिक ऱ्हास होतो. वास्तवापासून तुटलेले लोक कमालीचे धोकादायक ठरू शकतात. त्यांचं झुंडीत रूपांतर होतं. एका खोट्या बातमीमुळे ही झुंड हिंसक बनू शकते.’

हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. वास्तवापासून तुटलेल्या व्यक्तींचं झुंडीत रूपांतर झालं की काय होऊ शकतं हे आपण आजकाल रोजच पाहतो आहोत. एका व्यक्तीने घरात गोमांस ठेवल्याच्या फेक न्यूजमुळे जमावाकडून त्या व्यक्तीची त्याच्या कुटुंबियांसमोर निर्घृण हत्या होते. त्या व्यक्तीचा मुलगा देशसेवेसाठी सैन्यात अहोरात्र काम करीत आहे, ही वस्तुस्थितीसुद्धा त्याचा बचाव करू शकत नाही. रवीश कुमार यांनी फेक न्यूज संदर्भात केलेलं विधान किती तंतोतंत खरं ठरतं आहे, यावरून काळाची पावले अचूक ओळखणारा हा पत्रकार आहे हे ध्यानी येतं.

रवीश कुमार केवळ वर्तमान वास्तवाचे निवेदन करून थांबत नाहीत. आजच्या तरुण पिढीच्या भवितव्याविषयी तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक विकासात होत असलेली सततची घसरण, बेरोजगारीचे वाढते प्रमाण यांविषयी तरूणवर्गात जागरूकता नसण्याविषयी त्यांनी वारंवार खेद प्रकट केला आहे. केवळ दीड-दोनशे रुपयांत मिळणाऱ्या रोज फ्री दीड जीबी इंटरनेट पॅकमुळे तरुण वर्ग इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांसारख्या गोष्टींच्या इतका आहारी गेला आहे की, समोर उभे ठाकलेल्या  भवितव्याची, पोटापाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक रोजगाराची चिंता त्याला वाटेनाशी झाली आहे. ही भयावह स्थिती आहे. इंटरनेटच्या आणि फेक न्यूजच्या अविरत माऱ्याने निर्माण केलेल्या आभासी वास्तवाने जणू एक समांतर आणि पर्यायी विश्व निर्माण केले आहे; आणि या समांतर विश्वातच आजचा बहुतांश तरुणवर्ग जखडला गेला आहे.

एखाद्या काल्पनिक भयपटाची स्क्रिप्ट वाटावी असे वास्तव आज आपल्या डोळ्यांदेखत घडत आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेत राज्यकर्त्यांनी बजावलेली भूमिका रवीश कुमार यांना संशयास्पद वाटते. फेक न्यूज सारख्या घातकी गोष्टींवर प्रतिबंधात्मक उपाय करण्यापेक्षा त्याला खतपाणी घालण्याचे काम राज्यकर्त्यांनी अधिक केले आहे असे रवीश कुमार सांगतात.

भारतीय राजकारण आणि समाजकारण, समाजमनाचे वास्तवापासून खंडित झालेले भान, भयाने दबलेले आवाज, आणि अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर छोट्या छोट्या वंचित समूहांवर होणारे अन्याय याची जाण असणारे, रवीश कुमार हे बहुधा एकमेव भारतीय पत्रकार असावेत. त्यांना जाहीर झालेला ‘रेमन मेगसेसे’ पुरस्कार त्यांच्या कार्याचा आणि सामाजिक भानाचा यथोचित सन्मान करणारा आहे. याआधी हा पुरस्कार विनोबा भावे, बाबा आमटे, जयप्रकाश नारायण, सत्यजित रे, वर्गीस कुरियन, कमलादेवी चटोपाध्याय, एम. एस. स्वामीनाथन, राजेंद्र सिंग, मंदाकिनी व प्रकाश आमटे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी इत्यादी भारतीयांना प्राप्त झाला आहे. या यादीत रवीश कुमार यांचे नांव जोडले जाणे निश्चितच अभिमानास्पद आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने सशक्त लोकशाहीच्या बळकटीसाठी रविश कुमार यांचा आवाज अधिक व्यापक पातळीवर पोहोचण्यास हातभार लागेल अशी आशा व्यक्त करायला जागा आहे.

अवतरणे: ‘द फ्री व्हॉईस’, रविश कुमार, अनुवाद-सुनिल तांबे, मधुश्री पब्लिकेशन, नाशिक

COMMENTS