जागतिक शांतता आणि सहिष्णुतेच्या धार्मिक श्रद्धेतून जो इस्लाम पुढे प्रसार पावला तो आज युद्ध आणि असहिष्णुतेला प्रोत्साहन देत आहे त्याचे कारण म्हणजे मूलतत्त्ववादी एखाद्या राष्ट्राची राजकीय शक्ती बनतात आणि त्यामुळे प्रगती होण्याला खीळ बसते. उदाहरणार्थ तालिबान पुरस्कृत अफगाणिस्तान.
इस्लाममध्ये सहनशीलता, तर्कबुद्धी आणि मानवतावाद याचा वारसा अभिजात असून आता ऱ्हास पावलेल्या या वारशाच्या नवनिर्मितीसाठी आणि त्यानंतर त्याच्या जतनासाठी लेखक मुस्तफा अक्योल आपल्या ‘रिओपनिंग मुस्लिम माईन्डस: अ रिटर्न टू रिझन, फ्रिडम,अँड टॉलरन्स’ पुस्तकाद्वारे एक तर्क वाचकांसमोर मांडत आहे. इस्लाम सभ्यतेचा ऱ्हास होण्यास कारणीभूत असणारे अनेक घटक आहेत. या पैकी अक्योल यांनी दावा केल्याप्रमाणे, सर्वात प्रमुख घटक म्हणजे धर्माचा राजकीय शस्त्र म्हणून आणि त्यातील नैतिक भागाचा सत्तेवर चिकटून राहण्यासाठी केलेला निरंकुश उपयोग. मुहम्मद पैगंबर यांच्या पहिल्या आयतानुसार, इस्लाम प्रत्यक्षात शांतीचा धर्म असून तो निश्चितपणे शांतीच्या मार्गावरच सुरू झाला परंतु त्यात सुरुवातीपासूनच राजकारण शिरले आणि नंतर भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आले. इस्लाम धर्म मुळातून एक प्रकारचे प्रबोधन असून नंतर मात्र प्रबोधनाच्या कल्पना युरोपमधून आयात केल्या गेल्या. इस्लाम धर्म जर युरोपच्या संपर्कात आला नसता तर यातील कल्पनांचा ऱ्हास झाला नसता असा युक्तिवाद अक्योल यांनी केला आहे.
खरं तर, इस्लामी विचारवंत धर्माच्या सुरुवातीलाच अधिक उदारमतवादी इस्लामी विचारांचा प्रचार करत होते, परंतु इतिहासाची पाने चाळली तर अशा प्रचाराच्या आणि विचारांच्या कथा याचा मागमूस उरलेला नाही. लेखकाने पुस्तकाच्या सुरूवातीला अल अँडलसचे रहिवासी इब्न तुफायल यांच्या प्राचीन काल्पनिक कथेचे पुनरावलोकन केले आहे. इब्न तुफायल यांनी खगोलशास्त्र आणि औषध निर्मिती यांवर देखील पुस्तके लिहिली आहेत. पुढील विभागात लेखकाने ग्रीक काळांपासून सध्याच्या कोरोना महामारीच्या काळापर्यंत एक धावता आढावा घेतला आहे.
मुहम्मद पैगंबर हे मक्का येथे असताना त्यांनी कुराणातील अनेक आयात विशद केले. तिथल्या स्थानिकांना त्यांच्या शेजाऱ्यांशी शांततेत राहण्याची विनंती केली. अविश्वास ठेवणार्यांना ठार मारणे, धर्मांतर करण्याची किंवा आपल्या धर्मात सामील होण्याची सक्ती करणे असा काहीही प्रकार नव्हता. मुहम्मद मदिनाला जाण्यासाठी निघाले तेव्हा मक्का इथल्या हल्लेखोरांनी मुहम्मद यांचा पाठलाग करताना मुसलमानांवर पहिला हल्ला केला, ज्यामुळे मुस्लिम स्वतःचा बचाव करण्यास प्रवृत्त झाले, परिणामी बिगर मुस्लिमांवर हल्ले करण्याचे आवाहन केले असा अर्थ घेतला गेला.
मुसलमानांमध्ये जो पहिला मोठा तर्कसंगत वादविवाद झाला त्यात मानवाचे जीवन पूर्वनिर्धारित आहे का? माणूस स्वतःचा मार्ग निवडू शकतो का? या प्रश्नावर चर्चा झाली. या वादविवादात मानवांचे वर्ग आणि त्यांचे विवक्षित स्थान अगोदरच दैवी इच्छेनुसार निश्चित केल्याचा दावा केला गेला, आणि त्याप्रमाणे पहिल्या खलिफांनी राज्य केले. तथापि, या वादविवादात मुस्लिमांच्या एका गटाने असा युक्तिवाद केला की एक चांगला धर्म, तर्कसंगत असणे आणि प्रत्येक प्रश्नाचे त्यात उत्तर असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच या गोष्टींची देखील तपासणी करण्यासाठी स्वतंत्र इच्छाशक्ती आवश्यक आहे. हा वादविवाद ‘अश्याराईट’ (ज्यांचा असा विश्वास होता की तर्क आणि कारण या गोष्टींना धर्मात स्थान नाही) आणि ‘मुतझिलास’ (जे तर्क आणि कारण ह्या दोन गोष्टी धर्मात असायला हव्यात या बाजूने होते) अशा दोन गटात झाला. या वादविवादात ‘अश्याराईट’ जिंकले आणि ‘मुतझिलास’ हरले. परिणामी, नवीन धर्मामध्ये राजकारण आणि कायदा अधिक महत्त्वाचा झाला.
मुळात, इस्लाम म्हणजे न्याय, समतावाद, स्वातंत्र्य आणि समता याविषयीचे प्रवचन आहे. सर्व धर्मग्रंथ आणि भूतकाळातील काही विद्वान संत (इमाम) यांनी अशा प्रवचनाचे समर्थन केले आहे, तसे संकेत दिले आहेत, असे लेखक म्हणतो. नैतिकता कशी असावी याचा निर्णय घेताना बरेच मुस्लिम धार्मिक विद्वानांवर विसंबून असतात, कारण बहुतेक लोक त्यांचे पवित्र ग्रंथ वाचत नाहीत. अशा ग्रंथाचा अर्थ लावणाऱ्या व्यक्तींवर विसंबून राहतात.
लेखकाच्या मते शरिया कायद्याची पुनर्व्याख्या करणे, शाब्दिक अर्थाऐवजी “दैवी हेतू” शोधणे, वैज्ञानिक तथ्ये स्वीकारणे आणि इतर संस्कृतींना आत्मसात करणे श्रेयस्कर आहे. हे सर्व लक्षात घेऊन कुराण पुन्हा वाचण्याचा सल्ला दिला जावा. शारीरिक शिक्षेचा विषय प्रवचनात समाविष्ट आहे परंतु अक्योलच्या मते त्याला काही अर्थ राहिला नाही. ऐतिहासिकदृष्ट्या, प्रवासी जमातींकडे शिक्षा करण्याची दुसरी पद्धत नव्हती, म्हणून पूर्वी शारीरिक शिक्षा न्याय्य होती. अक्योलने असेही नमूद केले आहे की कुराणातील लष्करी जिहादचा उल्लेख मक्केतील आक्रमणकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी नव्हते, तर परदेशातून होणाऱ्या हल्ल्यांपासून नवोदित धर्माचे रक्षण करण्यासाठी होते.
जागतिक दृष्टीकोन आणि आधुनिकीकरण यांच्यातील दुवा शोधून, मुस्लिम मानवतावाद पुन्हा निर्माण करण्यासाठी शास्त्रीय आणि समकालीन स्त्रोत यांचा वापर करावा आणि नवीन मिळालेल्या दृष्टिकोनातून नवजागरण करावे असा युक्तिवाद लेखक करतात. मुस्लिमांच्या विश्वासार्हतेचे घसरण केवळ त्यांच्या अनेक शतकांच्या मानसिक सवयींचे पालन करण्यामुळे झालेले आहे आणि ह्या सवयी आता उपयुक्त नाहीत. जागतिक शांतता आणि सहिष्णुतेच्या धार्मिक श्रद्धेतून जो इस्लाम पुढे प्रसार पावला तो आज युद्ध आणि असहिष्णुतेला प्रोत्साहन देत आहे त्याचे कारण म्हणजे मूलतत्त्ववादी एखाद्या राष्ट्राची राजकीय शक्ती बनतात आणि त्यामुळे प्रगती होण्याला खीळ बसते. उदाहरणार्थ तालिबान पुरस्कृत अफगाणिस्तान. स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेकडे परत या असे लेखक आवाहन करतो परंतु इस्लाममध्ये कुराण म्हणजे अल्लाहच्या इच्छेची थेट अभिव्यक्ती मानली जाते.
मग स्वातंत्र्य आणि सहिष्णुता बाळगावी म्हणजे धार्मिकपणा कमी करणे असा अर्थ निघू शकतो. प्रत्येक मशिदीत कुराण पूर्वीप्रमाणेच शिकवले जात असेल तर त्यातील कोणत्याही आयातीचा त्याग करणे केवळ अशक्य आहे.
जर लेखकाला पुस्तकाला दिलेल्या शीर्षकाप्रमाणे धर्माच्या आधुनिकीकरणासाठी तर्क, स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेकडे परत यायचे असेल, तर आधुनिकीकरणाची दोन प्रारूपे दिसतात पहिले प्रारूप ब्रिटन आणि अमेरिका या दोन देशात रुजलेली आहेत. सत्ता आणि संसाधने एकवटण्याचा एक प्रकार ज्यामध्ये सत्ता एखाद्या गटाकडे सामावलेली असते. संसाधनेचे आणि जनतेचे निर्दयी शोषण करून ते सत्ता राबवतात आणि मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करण्यास अनुमती देणारी संरचना अंमलात आणतात. अशा राजकारणांमध्ये, उदारमतवादी मूल्ये प्रबळ असल्याचे दाखवले जाते, काहींना अधिकार असतात आणि सत्ता शासक वर्गाच्या घटकताच फिरत राहावी अशी व्यवस्था राबविली जाते. लोकशाही असते पण ती केवळ कागदावर.
दुसरे प्रारूप म्हणजे जनतेला झेपेल अशी निरंकुश हुकुमशाही. ही एक अशी व्यवस्था आहे जिथे एक करिष्मा असलेला नेता सत्ता हस्तगत करतो आणि त्या अंतर्गत आमूलाग्र बदल घडवून आणतो. जसे आता पुतीन पुरस्कृत रशियामध्ये झालेले आहे. अलीकडे चीनमध्ये झाले आणि नुकतेच अफगाणिस्तानमध्ये झालेले आहे. थोडे मागे वळून इतिहासात डोकावले तर नेपोलियनचे फ्रान्स, जर्मनीमध्ये विल्हेल्मचा पदत्याग आणि जर्मनीचे एकत्रीकरण, सम्राट मेईजीने केलेले जपानचे पुनरुत्थान, आणि केमाल पाशा यांच्या तुर्कस्तानातील सुधारणा ही या निरंकुश प्रारूपाची थोडीशी कमी टोकाची उदाहरणे आहेत.
याउलट, समकालीन आणि आधुनिक इतिहासकारांच्या बखरीवर विश्वास ठेवला तर आधुनिकीकरणाची प्रक्रिया मोगलकालीन भारतात अधिक सहिष्णुतेने झाली. आधुनिक काळातील भारताचा शासक म्हणून, अकबराने सार्वत्रिक सहिष्णुता आणली, गैर-मुस्लिमांवरील मतदान कर रद्द केला, एक सर्व समावेशक असा पंथ (दीन-ए-इलाही) स्थापित केला आणि स्वत:ला दैवी अधिकार प्राप्त शासक म्हणून स्थापित केले. मुस्लिम साम्राज्यांमध्ये शाही आदेशांद्वारे असे कायदेशीर नियम प्रशासनासाठी कायदेशीर आधार म्हणून लागू केले गेले होते आणि हे अधिनियम मुख्यतः धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे होते.
या अशा काही त्रुटी पुस्तकामध्ये असल्या तरीही इस्लामच्या बौद्धिक वारशाचा शोध घेण्यात लेखक सफल झाला आहे. मानवतावाद आणि बुद्धिमत्तावाद ह्या दोन गोष्टी मुस्लिम परंपरेला नव्या नाहीत. इस्लामच्या सुवर्णयुगात उभ्या राहिलेल्या तत्त्वज्ञान आणि दृष्टीकोनांचे उत्तम असे वर्णन यात लेखकाने केले आहे.
लेखकाने इस्लाम धर्माची व्याप्ती आणि शास्त्र, इतिहास, साहित्यिक परंपरा आणि संस्कृतींच्या अंतर्निहित वैश्विक तसेच नैतिक तत्त्वे आणि मूल्यांच्या उत्पत्तीच्या कथा सांगितल्या आहेत. भूतकाळाबद्दल खेद न बाळगता त्याचे, एका चांगल्या भविष्यामध्ये रूपांतर करण्याचे आवाहन तो करतो. समारोप करताना, मुस्लिमांनी मनाची बंद केलेली कवाडे जर उघडली, मनन आणि चिंतन केले तर ते अतिशय उत्तम कामगिरी करू शकतात, असे लेखक सांगतो.
रिओपनिंग मुस्लिम माईन्डस: अ रिटर्न टू रिझन, फ्रिडम, अँड टॉलरन्स.
मुस्तफा अक्योल
सेंट मार्टिन इसेन्शियल्स
COMMENTS