‘शाहीन बाग दादीं’कडून प्रजासत्ताक दिन साजरा

‘शाहीन बाग दादीं’कडून प्रजासत्ताक दिन साजरा

शाहीन बागमध्ये एक महिन्याहून अधिक काळ आंदोलक महिलांचे धरणे आंदोलन चालू आहे. पंतप्रधान अजूनही त्यांच्या भेटीला का आलेले नाहीत त्यांचा प्रश्न आहे.

ताहीर हुसेनच्या दाव्यावर दिल्ली पोलिसांत मतभेद
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचे विद्रोही संचलन?
बहुमताची वाटचाल सामाजिक वीण उसवण्याकडे

नवी दिल्ली: या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या‘शाहीन बागच्या दादी’ म्हणवल्या जाणाऱ्या तीन वृद्धा आणि जानेवारी २०१६ मध्ये हैद्राबादमध्ये आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आई राधिका वेमुला यांनी ७१ व्या प्रजासत्ताक दिनी आंदोलनाच्या जागी ध्वजारोहण केले.

या सर्वजणींबरोबर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालीदनेही ध्वजारोहणात भाग घेतला. त्यानंतर अनेक स्त्रिया आणि मुलांसहित जमलेल्या हजारो लोकांनी राष्ट्रगीत गायले. गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघातील आमदार जिग्नेश मेवानी हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.

वादग्रस्त कायदा सीएए आणि प्रस्तावित नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (NRC) यांच्या विरोधात हे आंदोलक आंदोलन करत आहेत. एक महिन्यापासून अधिक काळ शाहीन बाग येथे हे धरणे आंदोलन चालू आहे.

आंदोलकांनी म्हटले आहे, की सरकार CAA आणि NRC मागे घेत नाही तोपर्यंत त्यांचे हे आंदोलन चालू राहील. एकता, समता आणि धर्मनिरपेक्षतेची चेतना जागवण्यासाठी अनेकांनी राष्ट्रध्वज हातात पकडला होता आणि ते राष्ट्रभक्तीपर गाणी म्हणत होते. “सीएए से आजादी, एनआरसी से आजादी, बीजेपी से आजादी” अशा आणि इतर अनेक घोषणांनी परिसर दुमदुमलाहोता.

“आमच्या वेदना ऐकून न घेणारा आणि आमच्या प्रश्नांचे निराकरण न करणारा पंतप्रधान आम्हाला नको,” ७५ वर्षांच्या एक आजीबाई, सरवारी म्हणाल्या. “पंतप्रधान किंवा त्यांच्या कोणाही प्रतिनिधीने अजूनही आम्हाला का संबोधित केले नाही? ते आम्हाला भेटून CAA आणि NRC का स्पष्ट करून सांगत नाहीत?”

८२ वर्षांच्या बिल्किस म्हणतात, “हा आमचा देश आहे आणि आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला आहे. आज आम्ही राज्यघटनेचे आणि या देशातील धर्मनिरपेक्ष ताण्याबाण्याचे संरक्षण करू शकलो नाही, तर आम्ही आपल्या देशाचे भविष्य वाचवू शकणार नाही.”

जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराची आठवण करून देत त्या विचारतात, सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा हा अर्थ आहे का? आमचे विद्यार्थी त्यांच्या कँपसमध्येही सुरक्षित नाहीत? कँपसच्या आत घुसून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर हल्ला करणे योग्य होते का?

९० वर्षांच्या अस्मा खातून ह्या या त्रिकूटातील तिसऱ्या आजी आहेत.

“आम्ही इथे हे फोडा आणि झोडा धोरण अंमलात येऊ देणार नाही. आम्ही वर्षानुवर्षे सलोख्याने राहत आलो आहोत,” जामिया नगरच्या रहिवासी असलेल्या शाहीन म्हणाल्या. “आज ते धर्माच्या आधारे विभाजन करत आहेत, त्यानंतर जातीच्या आधारावर करतील. आम्ही हे होऊ देणार नाही. आणि सरकारला जर त्यांच्या CAA आणि NRC बद्दलच्या भूमिकेविषयी एवढी खात्री आहे तर ते आम्हाला इथे येऊन सांगत का नाहीत?”

१५ दिवसांपूर्वीच आंदोलनात सामील झालेल्या शाजिया म्हणतात सरकारकडून या कायद्याबद्दल काही आश्वासन मिळेपर्यंत त्या आंदोलन चालू ठेवतील. “आपण आज आपल्या अधिकारांसाठी लढलो नाही तर भावी पिढी उद्या आपल्याला प्रश्न विचारेल. हा लढा धर्माचा नाही. हा सरकारच्या विभाजनवादी धोरणांच्या विरोधात आपल्या देशाचा बचाव करण्यासाठीचा सर्वांचा लढा आहे,” त्या म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: