श्रीनगर/नवी दिल्ली : संसदेत सरकारने काश्मीरमधील परिस्थिती बिघडलेली नसल्याचे व तेथील सार्वजनिक जीवन शांततामय असल्याचे कितीही दावे केले तरी द वायरला मिळ
श्रीनगर/नवी दिल्ली : संसदेत सरकारने काश्मीरमधील परिस्थिती बिघडलेली नसल्याचे व तेथील सार्वजनिक जीवन शांततामय असल्याचे कितीही दावे केले तरी द वायरला मिळालेल्या माहिती अधिकारातून ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०१९ दरम्यानच्या काळातील काश्मीरमधील पर्यटनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून या काळात काश्मीरमधील पर्यटकांची संख्या ८६ टक्क्यांनी घसरल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या ऑगस्टमध्ये काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या १०,१३० होती. तर २०१८च्या ऑगस्टमध्ये ती ८५,५३४ इतकी तर २०१७च्या ऑगस्टमध्ये ती १,६४,३९५ इतकी होती. गेल्या वर्षी ५ ऑगस्टमध्ये संसदेने ३७० कलम रद्द केले, त्यानंतर त्याचा परिणाम काश्मीरच्या एकूण पर्यटनावर होऊ लागला. ३७० कलम रद्द करण्याच्या काही दिवस अगोदर सरकारने दहशतवादी हल्ले होण्याची भीती व्यक्त करत अमरनाथ यात्रा मध्येच स्थगित केली आणि नंतर जम्मू व काश्मीरमध्ये फिरण्यास आलेल्या सर्व पर्यटकांना ताबडतोब काश्मीर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आजपर्यंत काश्मीरमधील कायदा –सुव्यवस्था अद्याप सुधारली नसली तरी सरकार तेथे सर्व आलबेल असल्याचे दावे करत आहे.
ऑगस्टमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर सप्टेंबरमध्ये केवळ ४,५६२ पर्यटक काश्मीरमध्ये आले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ९,३२७, नोव्हेंबरमध्ये १२,०८६ व डिसेंबरमध्ये केवळ ६,९५४ पर्यटक काश्मीरमध्ये आले.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट ते डिसेंबर २०१९ या काळात काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या ४३,०५९ इतकी होती. तर २०१८मध्ये ३,१६४२४ व २०१७ सालात ६,११,३५४ इतके पर्यटक काश्मीरात आले होते. .
गेल्या महिन्यात काश्मीर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष शेख आशिक यांनी काश्मीरमधील पर्यटन सुमारे ९० टक्क्याने घसरल्याची माहिती दिली होती. ती माहिती सरकारी आकडेवारीनुसार जवळपास खरी ठरलेली दिसते. या काळात काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान सुमारे १५ हजार कोटी रु.नी झाले आहे.
३७० कलम रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर व त्यानंतर सर्व राज्यात इंटरनेटबंदी व अन्य प्रकारचे निर्बंध घातल्याने काश्मीरची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे जात असल्याचे अनेक अहवाल विविध संस्था, संघटना, पत्रकारांनी, तथ्यशोधन समितीने दिले असूनही सरकारने त्याबाबत कोणतीही हालचाल केलेली दिसली नाही. उलट संसदेच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी काश्मीरचे पर्यटन थंडावल्याचा कोणताही डेटा सरकारकडे नसल्याची खोटी माहिती दिली होती. प्रत्यक्षात त्यांचेच मंत्रालय काश्मीरमधील पर्यटन ७१ टक्क्यांनी घसरल्याचे सांगत होते.
मूळ बातमी
COMMENTS