नवी दिल्ली: एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या १६ आरोपींपैकी काही जणांनी त्यांच्या अटकेला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांनी हे खुले पत्र संयुक्तपणे प्रसिद्ध केले आहे. चार वर्षांच्या तुरुंगवासाने आपल्यातील आशा तसेच वंचितांसाठी लढण्याचा निर्धार ‘उद्ध्वस्त’ केलेला नाही असे या आरोपींनी पत्रात नमूद केले आहे.
यापैकी सेन या भायखळा तुरुंगात आहेत, तर अन्य सर्व तळोजा तुरुंगात आहेत. या सर्वांना ६ जून, २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.
देशातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारे कामगार, विद्यार्थी, लेखक, कवी, विद्वान, पत्रकार आणि सामान्य लोकही धोक्यात आहेत, याची नोंद या पत्रातून घेण्यात आली आहे. हक्कांसाठी चाललेल्या चळवळी दडपण्यासाठी दहशतवादविरोधी कायद्यांचा गैरवापर सुरू आहे यावर पत्रलेखकांनी प्रकाश टाकला आहे. या सर्वांना अटक झाल्यानंतर त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात कवी वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि व्हेरनॉन गोन्साल्विस यांनाही अटक झाली होती. त्यापैकी राव व भारद्वाज हे दोघेच सध्या जामिनावर सुटलेले आहेत, तर फादर स्टॅन स्वामींचा गेल्या वर्षी तुरुंगात मृत्यू झाला.
या पत्राचा सारांश:
आज ६ जून २०२२. भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात आम्हाला अटक होऊन चार वर्षे पूर्ण झाली. आमच्यानंतर आणखी काही जणांना अटक झाली. एकूण १६ जणांपैकी दोघांना जामीन मिळाला, फादर स्वामींचा तर व्यवस्थेने बळीच घेतला. आमच्यासोबत जे घडत आहे ते अपवादात्मक नाही. दलित, आदिवासी व वंचितांची बाजू घेऊन जे कोणी सत्ताधाऱ्यांशी लढतील, त्या सगळ्यांना लक्ष्य केले जात आहे, हे आम्हाला आज स्पष्ट सांगायचे आहे. अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. यासाठी दहशतवादविरोधी कायद्यांचा वापर केला जात आहे. या कायद्यांमध्ये व्यक्ती स्वत:चा बचाव करू शकत नाही. न्यायालये सरसकट जामीन नाकारतात. माणसाचे सामाजिक, आर्थिक, मानसिक व भावनिक आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी रचलेले हे कारस्थान आहे.
मात्र, आम्ही सर्व एकाच विचाराने व संवेदनशीलतेने बांधलेले आहोत. सत्ताधाऱ्यांप्रमाणे आम्ही आमची विवेकबुद्धी सोडून दिलेली नाही. तुरुंगातील काळोखातही ती जाही आहे, किंबहुना तिला अधिक धार आली आहे. आम्हाला चार्वाक, बुद्ध, कबीर, तुकाराम, शिवाजी महाराज, भगतसिंग, फुले, आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाचा अभिमान आहे. आम्ही ध्येयापासून दूर जाणार नाही.
हिटलरशाही आणि ब्राह्मणवादासाठी आम्ही काटे ठरलो नाही, तर त्यात नवल ते काय!
तुरुंगात टाकल्यामुळे आम्ही नाहीसे होऊ असे त्यांना वाटत असेल पण त्यात अर्थ नाही. चार वर्षांनंतरही आम्ही जिवंत आहोत आणि चैतन्याने भरलेले आहोत. आम्ही लिहित आहोत, आमची बांजू मांडण्यात व्यग्र आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही अन्य कैद्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
गेल्या चार वर्षांपासून आम्ही आमच्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमापासून, सहवासापासून वंचित आहोत. आमचे कुटुंबीयही तुरुंगाबाहेरही तुरुंगवासच भोगत आहेत.
आपण अंधारयुगात प्रवेश केला आहे हे तर सत्य आहे. तरीही दडपशाहीच्या जोरावर उभ्या राहिलेल्या साम्राज्यांची काही काळ भरभराट झाली पण नंतर ती कोसळलीच असे इतिहास सांगतो. म्हणूनच एक चांगले जग तयार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. एकीकडे आपण आपल्या मूलभूत हक्कांवरील अतिक्रमणाविरुद्ध लढत राहू आणि दुसऱ्या बाजूला अधिक चांगले, न्याय्य व अनुकंपापूर्ण जग निर्माण करण्यासाठीही लढू. साहीर लुधियानवींचे हे काव्य प्रत्यक्षात येईपर्यंत आपण लढू..
‘जब धरती करवट बदलेगी, जब कैद से कैदी छुटेंगे
जब पाप घरौंदे फुटेंगे, जब जुल्म के बंधन टुटेंगे
जेलों के बिना जब दुनिया की, सरकार चलायी जायेगी
वो सुब्ह कभी तो आयेगी, वो सुबह हमीं से आयेगी…’
COMMENTS