मला काही वेळा निराश वाटतं आणि एकाकीही!

मला काही वेळा निराश वाटतं आणि एकाकीही!

दिल्ली दंगलींप्रकरणी यूएपीएखाली सध्या तुरुंगात असलेले मानवी हक्क कार्यकर्ते उमर खालीद यांना रोहित कुमार यांनी १५ ऑगस्टला एक खुले पत्र लिहिले होते. त्याला उमर खालीद यांनी दिलेले हे उत्तर 'द वायर’ खालीद यांच्या संमतीने प्रसिद्ध करत आहे. खालीद यांच्या तुरुंगवासाला १३ सप्टेंबर २०२२ रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. खटल्याची सुनावणी अद्याप सुरूही झालेली नाही.

कोश्यारींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा
सार्वजनिक आरोग्य आणि कोकाकोलाचे हितसंबंध
मोदी सरकारचा रोजचा जाहिरात खर्च १ कोटी ९५ लाख

प्रिय रोहित,

वाढदिवसाच्या, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांबद्दल आणि मला पत्र लिहिल्याबद्दल थँक यू. या बंदिस्त परिमितीत तुझं पत्र उघडून वाचू शकलो हा आनंदही कमी नाही. आत्ता तुला उत्तर लिहायला बसलो असताना, आज रात्री ज्यांची सुटका होणार आहे, त्यांच्या नावांची घोषणा ऐकू येत आहे. सूर्यास्तानंतर थोड्या वेळातच रिहाई पर्चा म्हणजे सुटकेचा आदेश कोर्टातून तुरुंगात पोहोचतो आणि काही कैदी मुक्तीचा प्रकाश बघू शकतात. दोन वर्षांपासून मी रोज या नावांची घोषणा ऐकतोय. यात एक दिवस माझंही नाव ऐकू येईल या आशेने. हा अंधारा बोगदा आणखी किती लांब असेल? प्रकाशाचा किरण दिसणार तरी आहे का कधी? मी बोगद्याच्या अंताकडे आलोय की अजून मधेच कुठेतरी आहे? की ही तर सुरुवातच आहे?

आझादीचा अमृतकाळ सुरू झालाय असं म्हणतात. पण या स्वातंत्र्याची पाठराखण करणाऱ्यांच्या नशिबी आलेले भोग बघता, आपण पुन्हा ब्रिटिश राजवटीत गेलोय की काय अशी शंका येते. ब्रिटिशांच्या मनमानी कायद्यांवर झडझडून चर्चा केली जाते खरी, पण आम्ही ज्या यूएपीएखाली तुरुंगात खितपत पडलोय तो या कायद्यांहून वेगळा आहे का? जनतेच्या हक्कांवर, स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या ब्रिटिश कायद्यांचाच हा वारस आहे. आमच्यासारख्या कितीतरी जणांना, खटल्यांची सुनावणी सुरूही न करता, तुरुंगांमध्ये डांबून ठेवलंय या कायद्याखाली.

स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी मी तुरुंगातल्या कोठडीबाहेर काही जणांसोबत बसला होतो. तुरुंगाच्या भिंतींपलीकडून उडणाऱ्या पतंगांनी लहानपणीच्या १५ ऑगस्टच्या आठवणी जाग्या केल्या. आम्ही कसे पोहोचलो इथे? किती बदलला आहे आपला देश?

आमच्यावरील आरोप सिद्ध न करता आम्हाला तुरुंगात कुजत ठेवलंय आणि कोर्टात खटला उभा न करताच आमच्याविरोधात जनमत तयार करण्याचं काम बाहेर सुरू आहे. २०२० मध्ये मला जेलमध्ये बघितलं, तेव्हा माझ्यावरच्या आरोपांवर विश्वासच बसला नाही, असं एका जेल वॉर्डनने मला सांगितलं. हे सगळं राजकारण आहे आणि काही दिवसांत मला सोडतील असंही तो म्हणाला होता. पण २०२२ मध्येही मी इथेच आहे, माझ्या नावाची घोषणा होईल याची वाट बघत बसलोय. मला जामीन कसा मिळत नाही, असं वॉर्डनने विचारलं. मग मी यूएपीएचे बारकावे सांगायला लागलो, तसं त्याचं लक्ष उडालं. त्याला त्या तपशिलांत रस नव्हता. कायद्यांतल्या तपशिलांत रस कायदेतज्ज्ञांना असू शकतो किंवा आमच्यासारख्या कायद्याला बळी पडलेल्यांना.

बालंटाचं ओझं

सत्याच्या पलीकडच्या या जगात धारणा वास्तवाहून अधिक महत्त्वाच्या असतात. माझ्याविरोधात चाललेला प्रचार खोटा आहे हे सांगणं कठीण आहे. गेल्या दोन वर्षांत माझ्याबद्दलच्या बातम्या वृत्तपत्रांनी अधूनमधून दिल्या आहेत. इंग्रजी वृत्तपत्रं वस्तुनिष्ठतेचा आव तरी आणतात, हिंदी वृत्तपत्रांतील बहुतेक पत्रकारांना तेवढीही चाड नाही. ते केवळ गरळ ओकतात. माझ्या जामिनावरच्या सुनावणीबद्दलचं वार्तांकनही त्यांनी त्यांना हवं तसंच केलं. माझ्या वकिलांनी युक्तिवाद केला तेव्हा चुकीची शीर्षकं देऊन मागच्या पानांवर बातम्या छापल्या. सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला मात्र पहिल्या पानावर मानाचं स्थान दिलं. ‘खालीद ने कहा था भाषण से काम नही चलेगा, खून बहाना होगा’ हे शीर्षक एका वृत्तपत्राने दिलं होतं. मात्र, हा माझ्यावर झालेला आरोप आहे आणि तो न्यायालयात सिद्ध झालेला नाही हे स्पष्ट करण्याची तसदी घेतली नव्हती. साधं प्रश्नचिन्ह दिलं नव्हतं शीर्षकाला. खालीद चाहता है मुसलमानों के लिए अलग देशअसंही शीर्षक छापून आलं आहे. म्हणजे दिल्ली दंगली या मुस्लिमांसाठी वेगळा देश निर्माण करण्यासाठी होत्या असं याचं म्हणणं आहे की काय? दंगलीत मारल्या गेलेल्यांपैकी बहुसंख्य मुस्लिम असूनही? यावर हसावं की रडावं ते कळत नाही. आणि दररोज हे विष गिळणाऱ्यांना मी काय समजावून सांगू?

दिल्ली दंगलीतील सहभागाची कबुली’ मी पोलिसांकडे दिल्याचा दावाही एका हिंदी वृत्तपत्राने केला आहे. मी पोलीस कोठडीत कोणताही जबाब दिलेला नाही किंवा कुठेही सही केलेली नाही हे मी कोर्टात सांगूनही असे दावे कसे केले जाऊ शकतात? ते जे काही करत आहेत, त्याला वार्तांकन म्हणता येणार नाही, तो निव्वळ कल्पनाविलास आहे. युक्तिवादातला हवा तो मजकूर ते निवडतात, त्यांनी आधीपासून ठरवून ठेवलेल्या निष्कर्षाला आधार देण्यासाठी खोटे दावे करतात. जनतेच्या दरबारात मला अपराधी ठरवण्याचा हा प्रयत्न आहे. अनेकदा तर माध्यमांनी खोटं बोलण्याच्या शर्यतीत पोलिसांनाही मागे टाकलं आहे. मी दंगली घडवण्यासाठी शक्य ते सगळं केलं, १६ फेब्रुवारीला (२०२०) शार्जील इमामला गुप्तपणे भेटलो असे दावे एका ठळक हिंदी दैनिकाने केला आहे. प्रत्यक्षात त्या दिवशी मी दिल्लीपासून ११३६ किलोमीटर अंतरावर होतो, महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये. आणि शार्जील तेव्हा तिहार तुरुंगात होता. रोप करण्यापूर्वी आदरणीय पत्रकारांनी तथ्यं तर तपासून बघायची.

पण पुन्हा एकदा तथ्यांमध्ये आणि तपशिलांत रस कोणाला आहे? भारतात तर आज सत्य तेच आहे, जे लोकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. मी काय सांगतोय यापेक्षा वृत्तपत्राच्या मथळ्यांवर त्यांचा जास्त विश्वास बसणार.

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये, ‘संजू’मध्ये, अनेक दोष असतील पण त्यात मीडियाचं जे चित्रण केलंय, ते अगदी चपखल आहे. माध्यमं अमली पदार्थांसारखी आहेत, दररोज सकाळी लोकांचे मेंदू बधीर करून त्यांना पर्यायी वास्तवामध्ये नेण्याचं काम हे कागदाचे तुकडे करतात. जेव्हा असत्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर, नियमितपणे होते, तेव्हा सत्य व असत्य यांच्यात फरक करण्याची कुवतच सामान्य माणूस गमावून बसतो आणि एकदा हा स्तर गाठला की लोकांना खोटं समजावून सांगण्याची गरजही उरत नाही. ते अत्यंत खुळचट गोष्टी खऱ्या मानू लागतात. या असत्याच्या आणि खोटेपणाच्या राक्षसी यंत्रांविरोधात कसे लढणार आहोत आपण? द्वेष आणि असत्याच्या पुरस्कर्त्यांकडे संसाधनं खूपच आहेत- पैसा, आज्ञाधारक न्यूज चॅनल्स, ट्रोल्सच्या फौजा आणि पोलीसदेखील. खरं सांगायचं तर मला अनेकदा निराश वाटतं. कधी कधी एकटंही वाटतं. फॅसिझमविरोधातल्या, सीएए-एनआरसी/एनपीआरविरोधातल्या या लढ्यात माझ्याबरोबर लढलेल्या अनेकांची स्थिती माझ्याहून चांगली होती, मी एकटा लढण्याची किंमत मोजत असताना, ते आता मौन धरून बसले आहेत. मी नकोसा आहे असं वाटायला लावणारी परिस्थिती आहे. आपल्याच घरात परक्यासारखं वाटतं अशा वेळी. यात एकच समाधान आहे, ते म्हणजे यातलं काहीच व्यक्तिगत नाही. माझ्या नशिबी जो त्रास, एकटेपणा आला आहे, तो माझ्या आयुष्याहून अधिक मोठ्या गोष्टीचे प्रतीक आहे. आज भारतातला मुस्लिम समाज ज्या परिस्थितीत आहे, त्याचं हे प्रतीक आहे.

शांततेत दिलासा शोधणं

आता मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना वास्तवाबद्दल पटवून देणं सोडून दिलंय. शेवटी किती थापांचा मुखवटा मी फाडू? आणि किती जणांपुढे? त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून मला विचारावंसं वाटतं- यात केवळ जनतेची दिशाभूल होतेय असं आहे का? की लोकांनाही त्यांच्या सुप्त पूर्वग्रहांना खतपाणी घालणाऱ्या या असत्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा आत कुठेतरी आहेच?

दगडावर डोकं आपटून घेण्यापेक्षा मी तुरुंगात एकटा राहतो. एकटेपणामुळे काही वेळा खूप अस्वस्थ वाटत असलं तरी, हा गेल्या दोन वर्षांत माझ्यात झालेला सगळ्यात मोठा बदल आहे. शांतता आणि एकांतात दिलासा शोधण्यास परिस्थितीने मला भाग पाडलं आहे. सुरुवातीला मला तुरुंगात क्लस्टरोफोबिक वाटायचं, तसं आता वाटत नाही. कधी तरी कोर्टात जाताना लोकांचे आवाज आले, ते दिसले की माझी चिडचिड होते. वेडं करण्याऱ्या गर्दीपेक्षा तुरुंगातली शांतता माझ्यासाठी सवयीची झाली आहे. मी या बंदिवासाला सरावत चाललोय की काय अशी शंका येते.

रचलेल्या आरोपांवरून १४ वर्षं तुरुंगात राहिलेल्या एका व्यक्तीच्या आठवणी मी नुकत्याच वाचल्या. त्यात त्यांनी सामान्य आयुष्यात’ परत गेल्यानंतर जुळवून घेण्यात आलेल्या अडचणींचं वर्णन केलं आहे. मुक्तीची वाट बघण्यात अनेक वर्षं काढल्यानंतर अखेरीस ती व्यक्ती मुक्त झाली, तेव्हा या स्वातंत्र्याचं काय करायचं हे तिला कळतच नव्हतं. मी सामान्य आयुष्यात परत येण्यासाठी किती वेळ घेईन, असा विचार कायम छळत राहतो.

अर्थात या सगळ्या त्रासातही तुरुंगवासाने माझ्या आयुष्यात काही सकारात्मक’ बदल घडवून आणलेच आहेत. मी सिगरेट ओढणं सोडलं. दोन वर्षांपासून मी मोबाइल फोनशिवाय जगतोय, याचा अर्थ सोशल मीडिया नावाच्या अमली पदार्थाच्या व्यसनावरही मी मात केली आहे. इथे आलो तेव्हा माझी लक्ष केंद्रित करण्याची कक्षा ट्विटपुरती मर्यादित झालेली होती, आता मी एका महिन्यात अनेक कादंबऱ्या वाचून पूर्ण करतो. आणि अनेक वर्षं प्रयत्न करूनही वठणीवर न आलेलं झोपेचं वेळापत्रक इथे नीट बसलं आहे (हे वाचून माझी आई खूश होईल). दिवस उजाडताना झोपणारा मी आता  सुर्यासोबतच जागा होतो. सकाळ मला सुंदर वगैरे वाटायला लागली आहे.

मला वाटतं देशातल्या राजकीय कैद्यांची वाढती संख्या बघता तुरुंगाचे काही फायदे तरी सांगायलाच हवेत. लोकशाही, सेक्युलॅरिझम, सत्य व न्यायासाठी लढणाऱ्यांनी तुरुंगवासाची भीती बाळगण्याची गरज नाही. तुमच्यातल्या अनेक वाईट सवयी सोडवण्यात तुरुंग मदत करू शकतो. तुम्हाला शांत, संयमी आणि स्वयंपूर्ण करू शकतो. माझ्या बाबतीत तरी हे झालंय.

रोहित, तू कैद्यांचा समुपदेशक म्हणून काम करतोस हे मला माहीत आहे. मी दोन महिन्यांपूर्वी तुझं ख्रिसमस इन तिहार अँड अदर स्टोरीज हे पुस्तकही वाचलं. खूप छान आहे. या अंधारकोठडीत गोष्टींची वानवा नाही. संघर्षाच्या आणि चिकाटीच्या गोष्टी, इच्छांच्या आणि न संपणाऱ्या प्रतिक्षेच्या गोष्टी, गरिबीच्या व अन्यायाच्या हृदय पिळवटून काढणाऱ्या गोष्टी, मानवाने घेतलेल्या स्वातंत्र्याच्या शोधाच्या गोष्टी आणि मानवी दुष्टाव्याच्या काळ्याकुट्ट गोष्टी. एक मुक्त माणूस म्हणून, कॉफीचे घोट घेत घेत तुला या गोष्टी कधीतरी सांगता येतील अशी आशा मला आहे. तोवर काळजी घे आणि लिहित राहा.

तुझा

उमर खालीद

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0